प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

मातीची भांडी - फार प्राचीन काळी चाकावर गति दिल्यावाचून फक्त हातांनीं हीं मातीची भांडी तयार करीत असत. भांडयास आकार येण्याकरितां आंतून एक चपटी पट्टी धरून वरतून हात फिरवीत. अशा प्रकारें कांहीसा आकार आल्यानंतर शेवटी त्यांस घासून गुळगुळीत करीत. चंबूच्या आकृतीच्या भांड्याचा गळा तयार करण्याच्या कामीं प्रथम चक्राचा उपयोग करण्यांत आला. बाराव्या राजघराण्याच्या काळापर्यंत लहान लहान भांडयांची बुडें चाकूनें कापून रेखिव केलेलीं दिसून येतात. भांड्यावर पांढऱ्या मातीचे पट्टे,  पशूंच्या व क्वचित, प्रसंगी मानवी आकृती अशा प्रकारची नक्षी काढीत असत. ही भांडी हातांनीं घडवीत असल्यामुळें त्यांस निरनिराळे आकार देण्याचें काम कठिण नव्हतें. अठराव्या राजघराण्याच्या वेळी भांड्याचे कांठ तांबडे असत किंवा त्यांच्या गळ्याभोवतीं पट्टे असत. तिसऱ्या टेशमॉसिसच्या वेळी काळ्यां व तांबड्या रेघा काढण्याचा प्रघात असल्याचें दिसून येतें. तिसऱ्या अमेनोफिसच्या काळीं भांड्याच्या गळ्यांभोवती निळ्या रंगाच्या रेघा व पट्टे काढण्याची चाल होती. अठराव्या व एकोणिसाव्या राजघराण्याच्या उत्तर काळांत ओबडधोबड परंतु हलकीं भांडीं व त्यांजवर पांढरे ठिपके आणि गुळगुळीत व भुऱ्या रंगाचे कांठ असलेले आढळतात.

आतापर्यंत जे कलाविषयक विवेचन करण्यांत आलें त्यावरून इजिप्तमधील कलेचा इतिहासशोधनाकडे कसा उपयोग करता येईल याची कल्पना झाली असेलच. गृह्यवस्तूंमध्यें, नवीन नवीन आकार, गृह्यवस्तु ज्या साहित्याच्या बनवीत त्या साहित्यामध्यें फरक आणि चित्रकलेचा अतिशय साध्या रेघोटयापासून अधिक सूक्ष्म विकास या सर्व गोष्टींचें सातत्य आपणांस इजिप्तच्या इतिहासांत जसें आढळून येतें तसें दुसरें कोठेंहि येत नाही. हें सातत्य इतकें आहे कीं त्यामुळे वस्तु कालानुक्रमानें लावतां येतात. आणि त्यामुळें इजिप्तच्या इतिहासांत जीं राजघराणीं होऊन गेली त्यांची आणि विशिष्ट कलाविकासाची अगर संस्कृतिविकासाची संगति लावण्यांत येते.