प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
मनोऱ्यांचा काळ - या काळांत कलेच्या बाबतींत निराळेंच ध्येय दिसून येतें, पूर्वीच्या काळचा स्वभाविकपणा जाऊन त्याच्या जागी अधिक व्यवस्थितपणा, ठराविक पद्धत व आपण एका विशिष्ट संप्रदायाचे अनुयायी आहोत ही भावना शिल्पी लोकांत दिसून येते. या काळांतील सर्व कामांत भव्यपणा हा सर्वसाधारण गुण आहे. लहान किंवा मोठें कोणतेंहि काम पाहिलें तरी तें काळाचा किंवा श्रमचा विचार न करिता पूर्णत्वांस नेलेलें दिसून येतें.
चिआप्स किंवा खूफू याच्या लहानशा हस्तीदंती मूर्तीकडे पाहिलें तरी त्यावरून चिऑप्सचा उत्साह किती विलक्षण होता व इच्छाशक्ति किती प्रबळ होती हें दिसून येते. खाफरे किंवा चेफ्रेरेन याची मूर्ती भव्य व गंभीर आहे. साधारण माणसांच्या मूर्ति ज्याच्या त्याच्या स्थितीकडे लक्ष देऊन बनविलेल्या दिसून येतात. नेफर्ट व हेम्सेट यांच्या शांत मूर्तीकडे पहा किंवा कापरच्या लाकडी मूर्तीकडे पहा त्यांत तुम्हाला राजे लोकांची इभ्रत व रुबाब दिसून येणार नाहीं. तांब्याचें घडीव काम करण्यांत या काळचे शिल्पी किती तयार होते हें पहावयाचें असल्यास मरेन्राची मूर्ती पहावी.
मूर्तिकामाप्रमाणेंच उठावाच्या खोदीव कामांत सुधारणा झाली होती हें हेसीच्या लांकडी दरवाजावरील काम पाहिलें म्हणजे कळून येईल. यापुढें कबरस्थानावरचीं मनोवेधक व निरनिराळ्या तऱ्हेची कामें दृष्टीस पडतात.