प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

प्रागैतिहासिक शिल्पशान - मिसर देशांतील प्राचीन काळचे सुसंस्कृत लोक ठाकठीकपणा व हुबेहूबपणा इत्यादि शिल्पविषयक गुणांमध्ये बरेच निष्णात होते परंतु त्यांस निरनिराळ्या अवयवांचे आकार कसे दाखवावेत हे माहीत नव्हतें. असंस्कृत लोकांप्रमाणेंच ते आपल्या शिल्पकामांत अवयव किंवा त्यांचे अग्रभाग दाखवित नसत. आकृतीच्या रेखीवपणापेक्षां मनोविकारांचे स्पष्ट छायाचित्र उमटविण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होतें.

या युगांतील स्त्रियांच्या ज्या मूर्ती सांपडतात त्यांस पावलें नसून त्यांचा खालील भाग चिकटलेला व एका टोकापर्यंत निमुळता होत गेलला असतो. दोन हातांच्या जागीं दोन खुंटे असतात. नाकाचा भाग पक्षांच्या चोंचीसारखा असून  डोळे कसे तरी दाखविलेले दिसून येतात. पुरुषांच्या मूर्तीमध्यें फक्त शिरोभागच आढळतो. प्रथम त्या पशुदंतावर खोदलेले असत. नंतर फण्यांच्या अग्रभागावर खोदीत असत. त्या सर्व मूर्तीमध्यें उंच भालप्रदेश व अणकुचीदार दाढया दिसून येतात. चर्येवर रानटांपणाची छाप नसून एक प्रकारचा गंभीरपणा दिसून येतो. त्यांतील डोळे दोन भोके पाडून व त्यांत कंवटीचे मणी बसवून दाखविण्यांत येत असत. मानवी आकृतीप्रमाणे इतर प्राण्यांच्या आकृतीहि कशा तरी ओबडधोबड कोरलेल्या असत. त्या बहुधा फण्यांच्या किंवा टांचण्यांच्या डोक्यांवर दिसून येतात. सिंहाच्या बऱ्याच मूर्ती सांपडतात परंतु त्यांत पायांचा भाग नीटपणें दाखविलेला नसतो. श्येनांच्या मूर्तीत तर पायांचा मुळीच पत्ता लागत नाहीं.

या युगाच्या शेवटच्या भागांत उठावाचें खोदीव काम करण्यास सुरुवात झाली असावी असें उपलब्ध असलेल्या माहितीवरून दिसून येतें. या कलेची त्यावेळी नुक्तीच सुरुवात असल्यामुळें ती या कालीं प्रगल्भ दशेप्रत गेली नव्हती हें उघड आहे. अगदी अखेर अखेर या उठावाच्या कामांत प्राण्यांचे समुदायहि दखविण्यांत येऊं लागले होते.

तांबडया भांडयांवर पांढऱ्या रंगाचीं चित्रें काढण्याची कला फार प्राचीनकाळापासून चालू होती. या चित्रांत मानवी आकृती फार क्वचित काढलेल्या असत व त्या
काढण्याचा प्रकार म्हटला म्हणजे एक त्रिकोणाकृति दह, कटिभाग अगदी बारीक, व दोन पाय म्हणजे दोन उभ्या रेघा. पाय मागें पुढें होतात हें दर्शविण्याकरितां त्या उभ्या रेघा एका नागमोडी सारख्या रेघेनें जोडलेल्या असत. बकऱ्यांची व एक प्रकारच्या पाणघोडयाची चित्रें सामान्यतः चहूंकडे दृष्टीस पडतात. या युगाच्या उत्तरकाळांत प्राण्यांचे व मनुष्यांचे समुदाय व जहाजें यांची चित्रे आढळतात. जहाज शिडानें न चालवितां वल्ह्यांनीं चालविलेलें दाखविले आहे.