प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
पहिलीं चार राजघराणीं - मॅनेथोप्रमाणें पालेर्मो शिलालेखांत सुद्धां पहिल्या राजघराण्यापासून दुसरें राजघराणें निघालेलें दाखविलें आहे. दुसरें राजघराणेंहि थिनाइट होतें आणि त्याच्या नऊ (?) राजांची कवरस्थानें अबिडॉस येथें सांपडत होती. मॅनेथोच्या मतानें तिसरें राजघराणें मेंफाईट होतें म्हणजे त्यांतील राजांची राजधानी मेफिस ही होती या घराण्यांतील दोन राजांनी अबिडॉसच्या नजीक असेलल्या ‘बेट खलफ’ येथें मनोऱ्याच्या आकाराची भव्य कबरस्थानें बांधलीं. परंतु त्यावेळचा सुप्रसिद्ध शिल्पकार व विद्वान लेखक “इम्होप” यानें त्या दोन राजांपैकी “झोसर” राजाच्या सन्मानार्थ सक्कारा येथील चौफेर पायऱ्या असलेला दुसरा एक भव्य मनोरा बांधला. या राजघराण्यांतील शेवटचा राजा जो स्नेफ्रू त्याच्यापासून हल्लीच्या शोधांपूर्वी माहीत असलेल्या मिसरदेशाच्या इतिहासात प्रारंभ होतो. यापुढें स्मारकें काय लेखी टिपणें पुष्कळशीं विपुल व महत्त्वाचीं आहेत आणि पालेर्मो शिलालेखांवरूनहि भरपूर माहिती उपलब्ध होते. स्नेफ्रूच्या कारकीर्दीतील तीन वर्षाची उपलब्ध असलेली माहिती म्हटली म्हणजे त्यानें शिद्दी लोकांवर यशस्वी स्वारी केली आणि लेबानानच्या जंगलांतून आणलेल्या देवदारूचीं जहाजें व दारें केलीं ही होय. सिनाइमध्यें असलेल्या वाडी मघारा येथें स्नेफ्रूनें एक शिलालेख स्थापन केला होता. मेंफिस व फायूम या दोन शहरांमध्यें असलेले, एक मेड्यूम येथील पायऱ्यांचा मनोरा आणि दुसरा दाशूर येथील संपूर्ण मनोरा असे दोन मनोरेहि त्यानें बांधलें.
“नवीन राज्य” स्थापन होईपर्यंत मिसर देशांत मनोरे बांधण्याचा क्रम अव्याहत सुरू होता. विशेषेंकरून तिसऱ्या राजघराण्यापासून तो सहाव्या राजघराण्यापर्यंत प्रत्येक राजानें दगडी मनोऱ्याच्या रूपानें आपले स्मारक करून ठेविलें आहे. त्यांतील झोसर व स्नेफ्रू यांच्याबद्दल उल्लेख केलेलाच आहे. चवथ्या घराण्यांतील सुप्रसिद्ध राजे म्हटले म्हणजे चिऑप्स, चेफ्रेन व मायसरिनस, यांनीं अनुक्रमें गिझा येथील “श्रेष्ठ” (ग्रेट) “दुसरा” व “तिसरा” असे मनोरे बांधले. त्या काळच्या कलाकौशल्याच्या कामांत जो एक भव्यपणा दृष्टीस पडतो तो तदनंतर कोठेहि दिसून येत नाहीं. “स्फिंक्स” (स्त्रीमुखीसिंह) च्या देवाल्यांत मेरिएट यास जे अनेक पुतळें सापडलें त्यात चेफ्रेन राजाचा डायोराईट नांवाच्या पाषाणाचा केलेला पुतळा हा मिसरदेशीय लोक शिल्पकलेंत किती निष्णात होते याचा उत्कृष्ट दाखला आहे. स्फिंक्सचे देवालय म्हणजे स्मारकाकरितां बांधलेली एक वेस आहे. ही वेस ज्या पठारावर मनोरे बांधलेले आहेत तेथवर जाण्याकरितां जो एक चालचलाऊ पूल आहे त्याच्या पायथ्याशी आहे. चिऑप्स व चेफ्रेन या दोन राजांच्या दरम्यान होऊन गेलेला डेडेफ्रे राजा यानें अबुरोश येथील मनोरा बांधला. शोप्सस्काफ हा त्या घराण्यांतील शेवटचा राजा होता. या बहुतेक राजांचे शिलालेख वाडी मघारा येथील खाणीमध्यें सांपडले आहेत. मनोऱ्यांच्या आसपास पुष्कळ राजदरबाराच्या सरदारांचे मुस्ताबे (विशिष्ट प्रकारची कबरस्थानें) आहेत. त्यांचे शिल्पकाम वाखाणण्यासारखें आहे. वर सांगितलेल्या चवथ्या राजघराण्यांतील अनियंत्रित सत्ताधाऱ्यांच्या काळांत तर कांही नक्षीची कबरस्थानें मिसर देशाच्या वरच्या प्रदेशांत सांपडतात. स्फिंक्सच्या देवाल्यासभोवार असलेली अनेक देवळें चिऑप्स राजानें बांधली होती असें दाखविणारा शिलालेख उपाध्याय वर्गातील लोकांनीं बनावट केला होता असें सिद्ध करण्यांत आलें आहे; तथापि, स्फिंक्सचे देवाल्यच या चवथ्या घराण्यांतील अत्यंत वैभवशाली राजांच्या कारकीर्दीत खडक फोडून तयार केलें असावें असें म्हणण्यास पुष्कळ जागा आहे.