प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
पहिलीं राजघराणीं - पहिल्या राजघराण्यांतील पुष्कळ राजांची नांवे अबिडॉस येथें असलेल्या त्यांच्या कबरस्थानांवरून समजतात. परंतु अबिडॉस येथील व मॅनेथो याच्या यादींत ज्याप्रमाणें त्यांचा व्यक्तिशः नामनिर्देश आहे तसा तेथें नसल्यामुळें व ‘होरस’ या विशिष्ट उपपदांनीं त्यांचा जेथें तेथें उल्लेख केला असल्यामुळें नामनिर्णयाचे कामी बराच घोटाळा उडतो. काहीं राजांची व्यक्तिशः नांवे सापंडतात, यावरून ‘नवीन राज्यांतील’ लेखकांस ती कशी वाचावींत हें नीट अवगत नव्हतें हें सिद्ध होतें. पहिल्या राजघराण्याच्या काळांतसुद्धां लेखनपद्धतीत महत्त्वाचे फरक व सुधारणा घडून आल्या. मेनीस हे वैयक्तिक नांव फक्त एकाच जागी दिलेलें आढळतें. त्याचें होरस-नांव ‘अहा’ असून त्याचा अर्थ ‘योद्धा’ असा होता. ‘अहा’ व मेनीस हीं नांवें एकाच व्यक्तीची असल्याबद्दल शंका घेण्यांत येते परंतु ज्या ठिकाणीं त्यांचा निर्देश केलेला आहे तेथील लिखाण इतक्या जुन्या पद्धतीचें आहे कीं, त्यावरून त्या शंकेचें निरसन होण्यासारखें आहे. अहा (मेनीस) हे नांव दोन कबरस्थानावर सांपडलें होतें. एक कबरस्थान थीबीजच्या उत्तरेस व तांबड्या समुद्रास जाणाऱ्या रस्त्यासमोर जें एक ‘नगाडा’ नांवाचें ठिकाण आहे तेथें होते आणि दुसरें अबिडॉस येथें होतें. मॅनेथो हा पहिल्या राजघराण्यास ‘थिनाईट’ म्हणतो; कारण, ‘थिनिस’ ही ज्या प्रांतांत अबिडॉस शहर होतें त्याची राजधानी होती. इजिप्तचा वरचा प्रदेश हा खालच्या प्रदेशापेक्षां नेहमींच वरचढ असे. मेनीस हा मूळ वरच्या प्रदेशांतला असून नंतर त्यानें खालचा प्रदेश पादाक्रांत केला होता.त्यानें ज्या प्रांतावर स्वारी केली त्याच्या सीमेवर असलेलें मेम्फिस शहर त्यानें वसविलें होतें अशी आख्यायिका आहे. तो तेथें व अबिडॉस या दोन्हीं ठिकाणीं राहत असावा. निदान पहिल्या राजघराण्यांतील पुढील राजांपैकीं एकाचें स्मारक अबिडॉस येथील विस्तीर्ण श्मशानभूमीत असल्याचें उघडकीस आलें आहे. पहिल्या राजघराण्यांतील आठ राजांपैकी तीन कोण होते हें अबिडॉस येथील कबरस्थानांच्या अविशिष्ट भागांवरून सिद्ध झालें आहे आणि इतरांचीहि त्याचप्रमाणें माहिती मिळालेली आहे. दोघांराजांनी सिनाइमधील वाडी मघारा येथल्या तांबे व वैदूर्य यांच्या खाणीमध्यें दोन शिलालेख खोदून ठेविले आहेत. बहुतेक राजांची कबरस्थानें विटांची बांधलेलीं आहेत परंतु युसफेस नांवाच्या एका राजाच्या कबरस्थानाची तक्तपोशी मात्र एलिफन्टाईन येथील ग्रनाइट दगडाची केलेली आहे. त्या कबरस्थानांत पुष्कळसे थाटमाटाचें सामान, इतर सर्व प्रकारचीं साधनसामुग्री व अब्नूस व हस्तिदन्त यांजवर कोरलेले राजांच्या कारकीर्दीचे प्रतिवार्षिक हकीकतीचे लेख ठेवीत असले पाहिजेत. पालेर्मो शिलेवरील लेखाच्या एका भागावरून असे दिसून येतें की दरवर्षी पुराचे वेळीं नीलनदीचें पाणी किती उंचीपर्यंत चढत होतें व राजांच्या कारकीर्दीचा प्रतिवार्षिक तपशील काय होता यावर टीप लिहिण्यास लागणारी साधनें पांचव्या राजघराण्यापर्यंत उपलब्ध होतीं.