प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

नववें व दहावें घराणें उर्फ मध्यकालीन राज्य - मिसर देशाच्या मध्यभागीं असलेल्या हिराक्लिओपोलिस येथील नवव्या व दहाव्या राजघराण्यांतील राजांच्या हातीं सत्ता गेल्यामुळें दीर्घकाल चालू असलेलें मेंफिस येथील राजांचे राज्य लयास गेलें. त्या राजांचें नांव खेती किंवा अखथोज असावें परंतु त्यांची विशेष प्रसिद्धी झाली नाही. मिसर देशाच्या वरच्या प्रदेशांत स्वारी करून व तेथें आपली राज्यस्थापना करून त्यांनीं मेम्फिस राजघराण्यांतील राजांवर स्वारी केली असावी. त्या काळचीं मुख्य स्मारकें म्हटली म्हणजे ज्यावर लेख लिहिलें आहेत अशी अस्यूत येथील कबरस्थानें होत. मिकेरे नांवाच्या राजास हिराक्लिओपोलिसमधून पळवून लाविलें असतां त्यानें वरच्या मिसर प्रदेशातून सैन्य व आरमार गोळा करून व विशेषेकरून अस्थूत येथील मांडलिक राजाची मदत घेऊन आपलें हिराक्लओपोलिस शहर हस्तगत केलें अशी माहिती मिळते. परंतु त्याचा मनोरा मात्र मेम्फिस येथील राजेलोकांच्या श्मशानभूमींत बांधला होता.