प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

एथिओपियन घराणें. - २४ व्या घराण्यांत एकच बोक्चोरिस नांवाचा सैते राजा होऊन गेला. त्याला शाबाको या एथिओपियननें जिवंत जाळलें म्हणतात. यावेळीं २५ व्या घराण्यांतील एथिओपियन सत्ता पूर्णपणें प्रस्थापित होऊन, सिरिया आणि फिनिशिया जिंकण्याच्या कामीं त्याचा बराच उपयोग झाला असावा. पण इकडे असुरी लोकांचे साम्राज्य लष्करी सामर्थ्यामुळें बरेंच पुढें येऊन, इजिप्तला दटावूं लागलें. तेव्हां सार्गन आणि सेन्नाचेरिब यांच्याशीं स्वातंत्र्याकरितां लढत असलेल्या सिरियनांनां मदत करण्याखेरीज दुसरें कांहींच एथिओपियनांनां करतां येणें शक्य नव्हतें. शाबाकोनंतर शेबिटकु आणि शोबिटकूनंतर तिरहाका गादीवर आला. तिरहाकानें असुरी लोकांनां पुढें न येऊं देण्याचा प्रयत्न चालविला पण ख्रि. पू. ६७० मध्ये इजिप्तच्या सरहद्दीवर एसरहडननें त्याच्या सैन्याचा पराभव केला व मेंफिस आणि राजाचा जनानखाना काबीज करून मोठी लूट मिळविली. इजिप्शियन लोकांचा असुरांनां होणारा विरोध पूर्ण अंत:करणापासून नव्हता असें दिसतें. उत्तरेकडे, विशेषत: एथिओपिअन सत्तेविरुद्ध एक प्रबळ पक्ष निर्माण झाला होता. तिरहाकानें एथिओपियनांचें राज्य इजिप्तमध्यें सर्वत्र मान्य व्हावें अशी खटपट चालविली. एसरहडननें थोडी पाठ फिरविली नाहीं तोंच तिरहाका दक्षिणेंतून परतला व असुरी लष्कराची कापाकाप सुरू झाली. एसरहडननें लवकरच दुसरी मोहिम तयार केली, पण वाटेंतच इ. स. पू. ६६८ त तो मरण पावला. त्याचा पूत्र असुर-बनिपाल यानें मोहिम पुढें ढकलली व तिराहाकाचा पराभव करून आपले सुभेदार पुन्हां नेमिले. साइस व मेफिस यांचा राजा नेको (निकु) हा त्यांचा मुख्य असून तो २६ व्या घराण्याचा संस्थापक जो सामेटिकस याचा पिता होता. पुढें नेकोवर तिरहाकाशीं पत्रव्यवहार ठेवल्याचा आरोप येऊन निनेव्हेला त्याला बांधून नेण्यांत आलें. तेथें काय झालें असेल तें होवो, पण एवढें खरें कीं त्याला परत सन्मानपूर्वक पाठविण्याचा मुत्सद्दीपणा दाखविण्यांत आला. तथापि उत्तर इजिप्त तिरहाकाशीं राजनिष्ठ होतें; मेफिस येथें एक अ‍ॅपिस बैल जो पुरण्यांत आला तोहि याच्याच कारकीर्दीत होय. असें पुरोहित म्हणतात. पुढें लवकरच तो वारला व त्याचा पुतण्या तांडमानें याला वरच्या प्रदेशांतील लोकांनी मोठ्या आनंदानें आपला राजा केलें. त्यानें मेफिसला वेढा देऊन तें काबीज केलें. नेको या चकमकींत ठार झालासा दिसतो. पण ६१६? ख्रि. पू. मध्यें असुर-बनि-पालनें एथिओपिअनांनां दक्षिण इजिप्त मधून हुसकून लाविलें व नाईलपर्यंत त्यांचा पाठलाग केला व थीबीज लुटलें. हें आलेलें असुरी अरिष्ट शेवटचें म्हणतां येईल.