प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
एकोणिसावें घराणें - पहिला रामेसीस हा या घराण्याचा संस्थापक होय. आपल्या दोन वर्षाच्या छोटयाशा कारकीर्दीत त्यानें कर्णक येथील भव्य दिवाणखाना बांधण्याचें योजून त्याला सुरूवात केली त्यायोगें त्याच्या मोठमोठ्या कल्पना लोकांच्या नजरेस आल्या, तथापि त्या पार पाडण्याला त्याचें वार्धक्य आड आलें असावें. त्याचा मुलगा पहिला सेती हा आपल्या बापाच्या मृत्यूनंतर, पॅलेस्टाइनवर चालून जाणाऱ्या बेदुइन शसू याला नामोहरम करण्यास एकदम सिद्ध झाला. पुढें तो लेबाननपर्यंत सरकला. त्यावेळीं त्यास, लिबियन लोकांचाहि समाचार घेणें अवश्य होतें. तसें करून नंतर सेती पुन्हां पॅलेस्टाइनमधून पुढें जाऊन अॅमोराइट लोकांचा प्रदेश त्यानें उध्वस्त केला. व हिटाईट लोकांबरोबर त्याचें भांडण सुरू झालें. खेताच्या राजाशीं तह होऊन सेतीच्या लढायांचा निकाल लागला. गादीवर आल्यानंतर ९ वर्षांनीं त्याचे लक्ष न्युबियाच्या अरण्यांतील सोन्याच्या खाणीकडे गेलें व त्यानें तेथपर्यंत रस्ता दुरुस्त केला. या अवधींत त्याच्या बापानें सुरू केलेल्या कर्णक देवळाचें जंगी काम पुढें चालू होतेंच. व अखेनटॉनच्या स्मारकांची इजिप्तमध्यें जिकडे तिकडे झालेलां दुर्दशा त्यानें नाहींशीं करण्याचा सतत उद्योग चालविला. अॅबिडॉस येथील सेतीचें मंदिर आणि राजांच्या कबरी असलेल्या दरींत बांधलेली त्याची कबर, कारागिरी आणि सौंदर्य या दृष्टीनें त्या काळचे अत्युत्कृष्ट शिल्पाचे नमुनेच म्हणतां येतील. दुसरा रामेसीस लहानपणींच गादीवर आला. त्यानें ६७ वर्षे राज्य केलें. आपल्या कारकिर्दीत सेतीनें आरंभिलेलीं पुष्कळशीं कामें त्यानें तडीस नेलीं. व इजिप्त आणि न्युबिया या ठिकाणीं जिकडे तिकडे आपलीं स्वत:चीं स्मारकें करून ठेविलीं. अबूसिंबेल या दगडी देवस्थानाची खोदणी आणि कर्णक येथील भव्य दिवाणखान्याच्या बांधकामाची परिसमाप्ति हीं वास्तुशास्त्राच्या क्षेत्रांत त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरेल. गादीवर आल्यानंर दुसऱ्या वर्षी त्याच्या लढायांस सुरुवात झाली. न्युबियन, लिबियन, सिरियन, आणि हिटाइट हे त्याचे प्रतिस्पर्धी होत. पांचव्या वर्षी कडेशजवळ त्याचें सैन्य हिटाइट व त्यांचे दोस्त यांकडून पराभव पावण्याच्या अगदीं बेतांत होतें. पण रामेसीसच्या आंगच्या मर्दुमकीमुळें तो प्रसंग टळला. त्याच्या देवळावरील मूर्तिशिल्पांत हा प्रसंग उत्तम रेखाटला असून त्यावर काव्येंहि रचलेली होतीं. कारकीर्दीच्या २१ व्या वर्षी रामेसीस आणि हिटाइट राजा खत्तुशील यांच्यामध्यें तह झाला. ३४ व्या वर्षी म्हणजे सुमारें इ. स. पूर्वी १२५० व खत्तुशील हा आपला मित्र किंवा मांडलिक जो कोडेचा राजा याच्या समवेत आपल्या दूर असलेल्या राजधानींहून जातीनिशीं इजिप्तमधील चमत्कार पाहण्यास आला. दुसऱ्या रामेसीसनें नीलमुखाकडें बरेंच लक्ष पुरविलें. तानीसचें देवालय वाढवून जें मोठें शोभिवंत केलें गेलें तेंहि याच्याकडूनच. या ठिकाणीं उभारलेला राजाचा पुतळा ९० फुटांवर उंच होता. त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस त्याची करडी नजर व उत्साह कमी झाल्याकारणानें इजिप्शिनय राष्ट्रांतला लष्करी जोम नाहींसा झाला. सूदन, लिबिया आणि उत्तरेकडील राष्ट्रें यांतील भाडोत्री शिपाई आणून सैन्यांत भरती करावी लागली. तेथेंच नीलमुखाच्या सुंदर बनांत परकीय लोकांनीं ठाणें दिलें. दुसऱ्या रामेसीस नंतर त्याचा मुलगा मिनेप्टाह सुमारें इ. स. पूर्वी १२२५ त गादीवर आला. आपलें राज्य व एकंदर साम्राज्य राखण्यासाठीं त्याला बऱ्याच लढाया कराव्या लागल्या. त्याच्या कारकीर्दीच्या ५ व्या वर्षाच्या सुमारासच हें युद्ध थांबलें. लिबियन व त्यांचे दोस्त यांचा पूर्ण पराभव होऊन इजिप्त पुन्हा निर्धास्त झालें. मिनेप्टाह हा आपल्या बापाप्रमाणेंच आपल्या पूर्वजांच्या स्मारकांचा अपहार करणारा होता. रामेसीसच्या मोठ्या घराण्यांतील मिनेप्टाह हा १३ वा मुलगा असून गादीवर आल्यावेळीं तो म्हातारा असला पाहिजे. त्याच्या कारकीर्दीची पहिलीं काहीं वर्षे सोडून पुढें त्याच्यानें कांही काम होईना. त्याच्या मागून लवकर लवकर एकामागून एक असे अपेशी राजे होऊन गेले.