प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

अठराव्या राजघराण्याचा काळ - अठराव्या राजघराण्याच्या प्रारंभींची उठावाचीं खोदिव कामें मनोऱ्याच्या काळांतील त्या कामासारखींच होती व पुढें चित्रकला जसजशी स्वस्त होत गेली तसतशीं खोदीव कामे मागे पडत चाललीं. अशा प्रकारची खोदिव कामें फक्त देवळांत करीत असत व या देवाल्यांचा पुढें ऱ्हास होत गेला. या काळचीं हीं कामें मजबूत व सुमर्यादित आहेत परंतु तीं अगदींच ठराविक पद्धतीची असून त्यांत स्नायू, शिरा वगैरे कांही दाखविलेले नाहीं. शिवाय या काळच्या कामांत पूर्वीच्या काळच्या कामांतील पुष्कळशा कल्पनांची नक्कल केलेली आढलते. तिसऱ्या अमेनोपिसच्या काळच्या खाएमहातच्या सुंदर मूर्तीत पूर्वीच्या कल्पनांचे प्रतिबिंब आहे. मागें वर्णन केलेली अखेनटॉनच्या वेळची विशिष्ट पद्धत या प्रकारच्या कामांतहि दिसून येते. एकोणिसाव्या व विसाव्या राजघराण्यांच्या देवळांतील असंख्य उठावाची खोदिव कामें फक्त इतिहासदृष्टया महत्त्वाचीं असून त्यांत पूर्वीच्या कामांच्या मानानें कोणतेच कौशल्य दिसून येत नाहीं.

चित्रकलेच्या अभिवृद्धीस मात्र प्रस्तुत काळ फार अनुकूल होता; हाताचा हलकेपणा, वृत्तांताची विविधता व आनंदाचें पर्यवसान इत्यादि गोष्टींची रेलचेल त्या काळच्या चित्रांत दिसून येते. अधिक कष्टसाध्य शिल्पकामाचा ज्या मानाने ऱ्हास होत गेला त्या मानानें चित्रकलेचा अधिकाधिक उत्कर्ष झाला. त्या काळच्या एका कोल्हाटउडी मारणाऱ्या मुलीच्या चित्रावरून त्या वेळी होणारे शरीराचे संकोच व विकास तत्कालीन चित्रकारांस किती शिताफीनें दाखवितां येत होते हें लक्षांत येण्यासारखें आहे.

यापुढील काळांत या कलांचा एकसारखा ऱ्हास होत गेला म्हणजे वर दिलेल्या तीन भागांपैकी (१) मूर्तिकरण (२) उठावाचें खोदिक काम व (३) चित्रकला यापैकी कोणत्याहि भागाचा विचार केला तरी पुढें येणाऱ्या प्रत्येक राजघराण्यांत त्या कलांचा उत्तरोत्तर अपकर्ष होत गेल्याचें दिसून येतें.

इतिहासलेखनास ज्याप्रमाणें शिल्प कामें हें एक उपयुक्त साधन आहे त्याप्रमाणेंच मनुष्यानें निरनिराळ्या काळीं वापरलेली उपकरणें व हत्यारें हीं त्याच्या निरनिराळ्या सांस्कृतिक अवस्था बोधितात तेव्हां आतां प्राचीन मिसरी लोकांच्या हत्यारासंबंधी येथें थोडी माहिती देतों.