प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

इराणीकाल, २७ वें घराणें. - कँबिसेसनें प्रथम इजिप्शियन लोकांशी समेटाचें वर्तन ठेविलें होतें व तो त्यांच्या धर्माचा मान ठेवी; पण एथिओपिआमधील त्याची मोहीम अयशस्वी झाल्यानंतरच बहुधां त्यानें आपलें संबंध धोरण बदललें व आपलें नांव बद्दू करून घेतलें. त्यानें परत जातांना इजिप्तला इतकें चिरडून टाकिलें होतें कीं, लगेच पुढें इराणची गादी दुसऱ्या कोणीं बळकावली असतांहि या बाजूला दंगाधोपा वगैरे कांहीएक घडून आलें नाही. डरायस (इ. स. पू. ५२१-४७६) हा चांगला राजा निघाला व तो इजिप्तला आला त्यावेळीं तेथील धर्माविषयीं त्यानें बरीच आस्था दाखविली. ''ग्रेट ओअ‍ॅसिस'' (मोठी ओलवण) मध्यें त्यानें एक अ‍ॅमॉनकरितां देवालय बांधिलें. इजिप्त आणि सायरेने यांच्या अधिपतींवर बरीच वार्षिक खंडणी लादली गेली होती तरी ती वसूल करण्यास फारसा त्रास पडत नसे. नाईलपासून तांबड्या समुद्रापर्यंत जाणारा कालवा पुरा होऊन व्यापार वाढला. त्याच्या कारकीर्दीच्या शेवटीं इजिप्त बंड करण्यास उद्युक्त झालें. हें बंड मोडणारा क्सक्सींझ (इ. स. पू. ४८६-४६७) व त्याच्या मागून आलेला अर्टाक्सक्सींझ (इ. स. पू. ४६६-४२५) हे कँबिसेस प्रमाणेंच इजिज्शियनांनां अप्रिय झाले होते. अर्टाक्सक्सींझ गादीवर बसण्याच्या वेळीं माजलेल्या अराजकतेमुळें इजिप्शियनांनां बंड करण्याची पुन्हां संधी आली पण त्यांनां यश आलें नाहीं. दुसरा क्सक्सींझ व दुसरा डरायस यांच्या कारकीर्दीत इजिप्तमध्ये विशेष कांहीं घडलें नाहीं. शेवटीं इ. स. पू. ४०५च्या सुमारास त्या ठिकाणीं एक यशस्वी बंड होऊन इराणी वर्चस्व नाहींसें झालें.

इजिप्तमध्यें इराणी सत्तेचे अवशेष फारच थोडे आहेत. साइस येथील नीथचा उपाध्यय पेफ्टुऔनीट याच्या लेखांवरून त्याचा कँबिसेस व डरायस व्या राजांशीं असलेला संबंध व्यक्त होतो. अरेमाइक भाषेमध्यें लिहिलेले कांहीं पपायरसवरील हस्तलेख एलेफंटाईन व मेफिस येथें सापडलें आहेत. त्यांवरून पुढील राज्यांची थोडीबहुत माहिती मिळते. इ. स. पू. ४४० च्या सुमारास, म्हणजे अर्टाक्सक्सींझच्या अमदानींत हिरोडोटस इजिप्तला आला होता. त्याच्या ग्रंथांवरून सैते राजांच्या इतिहासाची व त्या काळच्या चालीरीतींची माहिती मिळतें. पण ही माहिती फारशी विश्वसनीय म्हणतां येणार नाहीं.