प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
तिसरा अॅमेनोफिस - तिसरा टेथमॉसिस यानें आपल्या कारकीर्दीच्या शेवटीं शेवटीं दुसरा अॅमेनोफिस नांवाच्या मुलास आपल्याबरोबर गादीवर बसविलें होते आणि तोच त्याच्या मागून राज्यावर बसला. गादीवर बसल्यावर नव्या राजानें प्रथम सिरियावर स्वारी केली; कारण, तेथें बंडाच्या प्रवृत्तीस फिरून ऊत आला होता. त्यानें युफ्रेटिसपर्यंत जाऊन तिक्शीच्या सात राजांस कैद केलें व त्यांस बरोबर घेऊन व पुष्कळशी लूट गोळा करून तो थीबीज येथें परत आला. कैद करून आणलेल्या राजांचे त्यानें अॅमन देवास बळी दिले व त्यांपैकी सहांची धडे भिंतीवर लटकत ठेवून सातवें धड दक्षिणेस नपाता येथें नेलें व इथिओपिअन लोकांस वचक बसेल अशा ठिकाणी त्याची स्थापना केली. अॅमेनोफिसने सव्वीस वर्षें राज्य करून तें आपल्या चवथ्या टेथमॉसिस नांवाच्या मुलाच्या स्वाधीन केलें. या चवथ्या टेथमॉसिसनें “स्फिंक्स” नामक एका मोठ्या मनोऱ्याची साफसफाई केली व तसें केल्याबद्दल एक शिलालेखांत खोदून ठेवलें आहे. त्यानें उत्तर सिरियावर व कुश देशावर स्वाऱ्या केल्या. त्याचा मुलगा तिसरा अॅमेनोफिस हा बांधकामाविषयीं प्रसिद्ध आहे. त्यानें पुष्कळ देवळांची कामें केलीं. त्यांत लुक्सॉरचें देऊळ नवीन बांधलें व कर्णकच्या देवळास पुष्कळसे रस्ते व दरवाजे केले, त्यानें एका “तय्या” नांवाच्या बाईशीं लग्न केलें. ही बाई जरी अप्रसिद्ध कुलांतली होती तरी तिला तिचा पति व त्याच्या मागून तिचा मुलगा हे दोघेहि मोठ्या सन्मानानें वागवीत असत. तिसऱ्या अॅमेनोफिसनें इथिओपियामध्यें स्वाऱ्या केल्या परंतु नपातापासून युफ्रेटिसपर्यंत त्याची सत्ता दीर्घकाल अबाधितपणें चालू होती. मिसर देशांत व ग्रीसच्या बटांत त्याच्या तय्याच्या नांवाच्या लहान लहान वस्तू सांपडतात. तेल एल्अॅमर्ना येथील दफ्तरखान्यांत त्याच्या मुलानें जतन करून ठेवलेले कलाकृति शिलालेख सुदैवानें उपलब्ध झाले आहेत. त्यावरून मिटनी, असुरिया व बॉबिलोनियासारख्या मोठ्या प्रदेशांचे राजे सुद्ध अॅमेनोफिस याच्याशी पत्रव्यवहार, करण्यांत त्याच्याशी आपल्या मुलीची लग्ने लावून देण्यांत व त्याची मैत्री संपादन करण्यांत धन्यता मानीत होते असें दिसतें. सायप्रसचा राजाहि त्याची मजा संपादन करीत होता. शिवाय सीरियाचे राजे त्याच्या बापानें जिंकले असल्यामुळे त्यांच्या मुलांचे सर्व शिक्षण मिसर देशांत झालेले होतें व त्या कारणानें ते राज्यावर बसल्यानंतरहि अॅमेनोफिसशीं बंद्या गुलामाप्रमाणें वागत असत. या वेळीं मिसर देशांत जो चहूंकडून खंडणीचा प्रवाह चालू होता त्यानें तेथें चालू असलेल्या सर्व भपकेदार कामांचा खर्च भागत असे. अॅमेनोफिसनें आपल्या तय्या राणींचे नांव व वंशावळ खोदून व त्यापुढें आपल्या राज्याची मर्यादा मिटनीच्या राजाची मुलगी गिलुखिपा हिच्याबरोबर त्याचे दुसरें लग्न, थीबीज येथें पवित्र सरोवर बांधणें, रानटी पशूंची शिकार, आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षांत त्यानें मारलेल्या सिंहाची संख्या इत्यादि सर्व माहिती देऊन “स्कॅरॅब” नांवाच्या किडयांच्या आकाराचे अनेक पाषाण खंड तयार केले होते.ज्या भव्य पुतळ्यांस ग्रीक लोक होमर कवीच्या मेम्नन नायकाच्या नांवावरून ओळखीत होते व जे थीबीजच्या पश्चिमेकडील मैदानाकडे तोंड करून बसविले होते त्यांत या राजाची प्रतिमा आहे आणि ते याच्या कबरस्थानाच वेशीपुढें ठेवण्यांत आले होते. ती वेस खेरीज करून कबरस्थानाचा कोणताहि भाग हल्लीं शिल्लक नाहीं. त्याच्या कारकीर्दीच्या छत्तिसाव्या वर्षाच्या शेवटीं उत्तरेकडून हिटाइट लोकांनी व पूर्वेकडून खाबिरी लोकांनीं सिरियावर स्वारी केली. त्यावेळेस कांही किरकोळ राजांनीं स्वारी करणाऱ्यांनां मिळून मिसर देशाची सत्ता उलथून पाडण्याचा प्रयत्न केला व जे राजे मिसर देशाच्या राजांशी इमानानें वागले त्यांनीहि चिन्ताजनक स्थिती असल्याबद्दल त्यांस खबर दिली.
चवथा अॅमेनोफिस - तिसरा अॅमेनोफिस व तय्या यांचा मुलगा चवथा अॅमेनोफिस हा मिसर देशीय राजांच्या मालिकेंत विशेष सुप्रसिद्ध राजा होऊन गेला. तो धर्मवेडा असून हेलिऑपोलिस येथील सूर्य देवतेचा मुख्य उपाध्याय होता आणि म्हणून सूर्य हा जीवन, उत्पादन, वर्धन आणि चलन या सर्वांचे प्रत्यक्ष मूळ कारण आहे आणि मिसर देशाप्रमाणेंच इतरत्र त्या देवतेची सत्ता एकसारखी अबाधित चालते अशी त्या देवतेसंबंधी त्याची भावना होती. मिसर देशांतील अनेक देवतांस व हिलिऑपोलिस येथील सर्व पौराणिक कथांस फाटा देऊन त्यानें आपल्यास दृश्य सूर्यबिंबोपासक पंथास वाहून घेतले. आतापर्यँत अप्रसिद्ध असलेला सूर्यवाचक “अटॉन” हा शब्द त्यानें प्रचारांत आणला. परंतु हिलिऑपोलिसच्या श्येनशीर्ष सूर्यदेवाचें परंपरागत चालत असलेलें “हरख” हें नांव त्यानें तसेंच पुढें चालू ठेवलें व कर्णक येथें त्या देवाचें एक देवालय बांधलें. त्याच्या कारकीर्दीच्या पांचव्या वर्षापर्यंत इतर देवतांचीहि पूजा करण्यास सरकारी रीत्या परवानगी होती परंतु तदनंतर इतर सर्व उपासना बंद करून फक्त एकच पंथ कायम करण्यांत आला. सर्व जुन्या देवतांमध्यें सत्तेच्या व उत्पन्नाच्या दृष्टीनें अॅमन देवाचें बडें प्रस्थ होतें म्हणून या दीर्घकाल सर्वमान्य झालेल्या देवाविरुद्धच राजानें मोठ्या निकराचा हल्ला चढविला. त्यानें आपलें “अमेनहॉट” (अॅमन संतुष्ट आहे) हें नांव टाकून देऊन “अखेनटॉन” (अटॉनचा पवित्र) हें नांव धारण केलें, सर्व स्मारकांवरून अॅमनचीं नांवे व मूर्ती नाहीशा केल्या व जेथें अॅमनचें स्थान होतें तें भव्य थीबीज शहर सोडून त्यानें हॅर्मापोलिसच्या मैदानांत एल् अॅमर्ना येथें आपली नवीन राजधानी बांधली. त्यानें आपल्या कारकीर्दीच्या सहाव्या वर्षी ती राजधानी व तिच्या भोंवतालचा बराचसा मुलूख अटॉन देवास अर्पण केला. तेथें भव्य देवळें, राजवाडे, घरें व कबरस्थानें बांधण्यात आली. पुष्कळ स्मारकांवर अनेकेश्वरी मत दाखविणारें “देव” शब्दाचे अनेकवचनी रूप नाहींसे केल्याच्या खुणा आहेत.
सर्व स्थानिक देवालयांतून अटॉनची पूजा सुरू करण्यांत आली. अमॉनचें जप्त केलेलें उत्पन्न आणि सिरिया व कुश मधून आणलेली खंडणी यांचा उपयोग एखटनला अटॉनचा मुलूख नवीन राजधानी सुशोभित करण्याचें कामीं व ज्यांनी अटॉन पंथाची शिकवण मोठ्या उत्साहानें स्वीकारली त्यांना पारितोषिकें देण्याच्या कामी करण्यांत आला. परंतु दरम्यान साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीनें अवश्य करावयाच्या गोष्टींची हेळसांड झाली. तिसऱ्या अमेनोफिसच्या कारकीर्दीच्या शेवटीं देशावर जे संकट आलें होतें त्याचा पूर्णपणें मोड करण्यांत आला नव्हता. सिरियांतील राजे कधी हिटाइट लोकांची तर कधी खाबिरी लोकांची मदत घेऊन आपआपसांत लढत होते.त्यांपैकी जे राजे आपल्या पूर्वजाप्रमाणें मिसर देशाच्या राजाशीं एकनिष्ठपणें वागत होते. त्यांनी त्या राजांस शत्रूंपासून संरक्षण करण्याविषयी पत्रावर पत्रें धाडलीं. त्या कामावर कांही फौज घेऊन जरी एका सरदारास पाठविलें होतें तरी त्यानें भांडणाचा निवाडा नीट न केल्यामुळें त्यापासून फायद्याऐवजी तोटाच अधिक झाला. शेवटी त्या राजांची निराशेची पत्रें येऊं लागलीं व त्या मिसर देशाभिमानी राजांस मिसर देशांत पळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाहीं. या राजाची कारकीर्द संपण्यापूर्वी सिरियांतील मिसर देशाची सत्ता संपुष्टांत आली होती. अखेनटॉन हा आपल्या कारकीर्दीच्या सतराव्या वर्षी म्हणजे इ.स. पूर्वी १३५० व्या वर्षी मरण पावला. त्याच्या पोटीं पुत्रसंतान नव्हतें. त्यास सर्व मुलीच झाल्या व त्या सर्व समारंभात त्याच्या बरोबर असत. त्याच्या मागून त्याचे दोघे जांवई एकामागून एक गादीवर बसले परंतु त्यांनी फार वेळ राज्य केलें नाहीं. त्यांपैकी तुतेनखातन यांनें आपल्या नांवाचा त्याग करून “तुतेनखामन” हें नवीन नांव धारण केलें आणि एखटनचा सर्वस्वी त्याग न करतां कर्णकच्या देवालयास त्याचें पूर्वीचें वैभव प्राप्त करून दिलें. त्यांत त्यानें नवीन स्मारकें करून अॅमन देवास अर्पण केली. याच्चा कबरस्थानाचा नुकताच शोध लागला असून त्यांत अगणित संपत्ति व स्मारक वस्तू सांपडल्या आहेत अखेनटॉननें केलेला बदल सामान्य जनतेस मान्य झाला नव्हता. सामान्य लोकांनीं आपल्या जुन्यापुराण्या धार्मिक चालीरीति व कल्पना तशाच उराशीं बाळगून ठेवल्या होत्या आणि उपाध्ये मंडळी जरी त्या राजाच्या जिवन्तपणीं धाकानें किंवा लांच घेऊन स्तब्ध बसली असली तरी ती त्या पाखंडवाद्याच्या मनापासून विरोध करीत असली पाहिजेत हें उघड आहे. तदनंतर अखेनटॉनच्या पंथाचा अभिमानी ‘ए’ नांवाचा उपाध्याय यानें काही काळ राज्य केलें तथापि “अटॉन” यास अनेक देवतांपैकी एक यापेक्षां अधिक महत्त्व उरलें नव्हतें. शेवटीं अखेनटॉनच्या हाताखालचा हर्माहिब नांवाचा एक सरदार गादीवर बसला व त्यानें जुन्या पंथाचा उघड उघड पुरस्कार केला. त्यामुळें अॅमन देवाची पूर्वी जी गति झाली तीच आतां अटॉन देवाची व त्याच्या उपासक राजांची झाली. त्यांची स्मारकें उध्वस्त करण्यांत आली, त्यांची नांवे खरडून टाकण्यांत आली व त्यांच्या मूर्ती छिन्नभिन्न करण्यांत आल्या व अॅमनची स्मारकें, नांवे व मूर्ती पुनः प्रस्थापित करण्यांत आल्या. दुसऱ्या रामेसिसपासून हर्माहिबपर्यँत पाखंडी राजांच्या कारकीर्दीची जी सनावळ करण्यांत आली त्यांत अखेनटॉन यास “गुन्हेगार अखेनटॉन” असें वर्णिले आहे. राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शासन पद्धतींत अनेक दोष शिरले होते. हर्माहिबची दृष्टि व्यावहारिक होती. त्यानें ते सर्व दोष काढून टाकून राज्यामध्यें शिस्त उत्पन्न केली. अधिकाऱ्यांच्या लाचलुपतीच्या प्रकारांस कडक उपायांनी आळा घातला. एतद्विषयक त्याचे कायदे कर्णकच्या देवालयांतील विजयस्तंभावर खोदलेले आहेत व त्या खोदीव कामाच्या अवशिष्ट भागावरून त्याचे हेतू किती उच्च होते हें कळून येण्यासारखें आहे.त्याच्या मागून गादीवर बसलेल्या राजांच्या कारकीर्दीत जी देशाची भरभराट झालेली दिसून येते तीवरून त्याला राष्ट्राच्या गरजा किती उत्तम रीतीनें समजत होत्या हें स्पष्ट होतें. शिवाय त्यानें आसपासच्या प्रदेशांवर स्वारी करून मिसर देशाचा दरारा चहूंकडे पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.