प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

इजिप्तच्या प्राचीन दोन राज्यांचें एकीकरण - परंपरा, पुराणकथा व अलीकडे प्रचलित असलेल्या चाली रीती यांच्या योगानें त्या अतिप्राचीन काळच्या राजकीय इतिहासांत असलेली खिंड भरून काढता येते. पहिल्या राजघराण्याचा संस्थापक मेनीस यानें मिसर देशाच्या वरच्या व खालच्या भागांत असलेली दोन राज्यें एकत्रित केलीं. यावरून प्रागैतिहासिक कालांत ते दोन भाग निरनिराळ्या सत्तेखाली होतें हें उघड होते. जेथें हल्ली एल् काबचें खिंडार आहे तेथें पूर्वी वरच्या मिसर प्रदेशाची नेकेब नांवाची राजधानी होती आणि नदीच्या पलीकडे नेखेल (हिराकाँन्पोलिस) येथें राजवाडा होता. मिसर देशच्या खालच्या प्रदेशाची राजधानी तेथील पाणथळ प्रदेशांत ब्यूटो (प्यूटो किंवा डेप) येथें होती व “पे” नांवाच्या भागांत राजनिवासस्थान होतें. वरच्या किंवा दक्षिण दिशेकडील प्रदेशाच्या राज्यांत एल्काबची देवता “निखेबी” व “संथे” नांवाचा देव यांचे अधिष्ठान होतें व खालच्या प्रदेशाच्या राज्यांत “ब्यूटो” या देवतेचें व “होरस” या देवाचें अधिष्ठान होतें,. राजेलोकांकरितां प्रत्येकाच्या राजवाड्यांत “श्येन किंवा होरस” ही देवता होती. “नेखेन” येथें मृतराजांची पितरें शृगालशीर्ष होतीं असें मानीत तर “पे” येथें मृतराजाचीं पितरें श्येनशीषं होती असें मानीत असत. पुढील काळांत प्रागैतिहासिक राजे “होरस-पूजक” म्हणून मानण्यांत येत. या युगाची कालमर्यादा किती होती याचा अंदाज करितां येत नाहीं. वर सांगितलेलीं वरच्या व खालच्या प्रदेशांतील दोन राज्यें यांच्यांत केव्हांहि कांहीं बदल झाला नसेल हें संभवनीय दिसत नाहीं.

शरीरविज्ञान शास्त्रज्ञ इलिअट स्मिथ याच्या मतें मिसर देशाचा सर्व प्राचीन इतिहास धुंडाळला तर असें दिसून येईल की राजघराण्याच्या युगाच्या प्रारंभीच्या भागांत वरच्या मिसर प्रदेशांतील लोकांच्या शरीररचनेंत महत्त्वाचा फरक झाला आणि तो फरक मिसर देशाचे दोन्ही भाग एका राजाच्या सत्तेखालीं आल्यानें त्यांतील लोकांमध्यें  जो संकर घडून आला त्यामुळें झाला असें सदर शास्त्रज्ञानें स्पष्टीकरण केलें आहे. चवथ्या राजघराण्याच्या युगांतील उपलब्ध असेलल्या अवशेषांवरून इलिअट स्मिथनें असा सिद्धांत काढिला आहे कीं सीरियांतील देशांतर केलेल्या लोकांच्या आगमनामुळें मिसर देशाच्या   वरच्या प्रदेशांतील लोकांपेक्षां खालच्या प्रदेशांतील लोकांच्या मस्तकांतील कवटीची व स्नायूंची वाढ अधिक झालेली होती. राजघराण्यांच्या युगास प्रारंभ झाल्यामुळें संस्कृतीची पिछेहाट न होतां भरभराटच होत गेली.

प्रागैतिहासिक युगासंबंधी माहिती देणारें एखादें तरी लिखाण उपलब्ध आहे कीं नाहीं याविषयी शंकाच आहे. पालेर्मोशिलेच्या पहिल्या ओळीत खालच्या मिसर देशाच्या राजांची कांही नांवे दिलेली सापडतात परंतु तेथे त्यांचे शक किंवा इतर माहिती दिलेली नाहीं. पेट्रीच्या मतानें ज्या राजाला अबिडास येथें मूठमाती देण्यांत आली होती व खरें नांव “मर” किंवा “बेझा” असें असतां ज्याला “नरमेर” या नांवानें संबोधीत होते तो मेनीसच्या अगोदर होऊन गेला. त्याची  माहिती देणारे अनेक कोरीव लेख आहेत. त्यांत हिराकॉन्पोलिस येथें सापडलेला व ज्याच्यावर लेख खोदलेला आहे असा एक पाषाण-खंड फारच भव्य आहे. त्या पाषाणखंडावर राजा व त्याचा प्रधान, युद्धांत वापरण्यांत येणारीं निशाणें, कैदी वगैरे सर्व खोदलेले आहे. तो व दुसऱ्या राजघराण्यांतील बेझॉ (बाथॉस) हे एकच होते असें म्हणणें उपलब्ध असलेल्या माहितीशी विसंगत आहे. तो मेनीस नंतर झाला असें सेथे म्हणतो तर कांहीच्या मतानें तो व मेनिस हे एकच होत असें आहे. दुसराहि एक अंकित लेख असलेला पाषाणखंड सांपडतो व तो राजघराण्यांच्या काळाच्या पूर्वीचा असावा. त्यांत “वृश्चिक” नांवाच्या राजाचा उल्लेख आहे.