प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

आरंभीच्या राजांचा काळ - या काळांत कलांची वाढ फार झपाटयानें झालेली दिसून येते. पूर्वीच्या ओबड धोबड मूर्तीच्या जागी सुबक आकृतीच्या, स्वभावाची कल्पना करून देणाऱ्या व शरीराचे सर्व भाग हुबेहूब दर्शविणाऱ्या मूर्ती दृष्टीस पडूं लागतात.

या काळचें अगदीं प्रारंभीचें शिल्प काम म्हटलें म्हणजे कॉप्टस येथील मिना देवाच्या भव्य मूर्ती हें होय. परंतु या काळचें मुख्य शिल्प काम एका राजाच्या चुनखडी सारख्या दगडावर कोरलेल्या मुखवट्यांत पहावयास सापडतें. हा मुखवटा पाहून प्रो. मिखेलिस म्हणतो “हें काम अत्यंत काळजीपूर्वक केलेले आहे व त्यावरून तें करणाऱ्याची विलक्षण अवलोकनशक्ति व डोळ्यांची ठेवण दाखविण्याची अप्रतिम हातोटी उत्तम रीतीनें व्यक्त होते”. ही प्रतिमा बहुतेक नार्मर नांवाच्या राजाची असावी. हा नार्मर राजा पहिल्या राजघराण्यांतला होता. यानंतरची प्रतिमा हस्तिदंतावर खोदलेली एका वृद्ध राजाची आहे. ही प्रतिमा तर फारच सुबक असून राजाचें  चारित्र्य कसें होतें हें पहाणाऱ्याच्या लक्ष्यांत आणून देणारी आहे. नेखेन (हिराकान्पोलिस) व अबिडॉस येथें पुरुष, स्त्रिया व इतर प्राणी यांच्या पुष्कळ हस्तिदंती मूर्ती सांपडतात. दुसऱ्या राजघराण्यांतील राजा खासेखेम याच्या मुखवटयांत शिल्पकामाची एक ठरीव पद्धत दिसूं लागते; तथापि याच्यांतहि जो मोहकपणा दिसून येतो तो या पुढील शिल्पकामांत दृष्टीस पडत नाही.

उठावाचें खोदीव काम करण्याची कलाहि या काळांत फार झपाटयानें वृद्धिंगत झाली. या कामाचे नमुने काप्टसच्या भव्य मूर्तीवर पहावयास सांपडतात. यांतील सांबराच्या मुखवट्याचं काम अप्रतिम आहे. यापुढचें काम म्हणजे एका तालवृक्षासमोर हरणाची जोडी उभी आहे हें होय. यांत विलक्षण नैपुणय दिसून येतें. यानंतर नार्मर राजाचे इतिहास प्रसिद्ध कोरीव काम लक्षांत घेण्यासारखें आहे. यांत पायाच्या शिरा व स्नायू, डाव्या हाताची पकड व उजव्या हाताचा ताण इत्यादि सर्व इतक्या उत्कृष्ट रीतीनें दाखविलें आहे कीं त्यावरून या कलेचें ज्ञान त्या काळी पूर्णावस्थेस पोंचलें होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं.