प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

अठरावें राजघराणें नूतन साम्राज्य - या युगास “नूतन युग” म्हणतात व “राज्य” या शब्दाच्या, ऐवजीं साम्राज्य हा शब्द वापरतात यावरून या काळीं राज्याचा विस्तार बराच झाला होता हें उघड दिसतें. वैभवशाली अठरावें राजघराणें याचा सतराव्या राजघराण्यांशीं निकटचा संबंध होता. या अठराव्या राजघराण्यांशीं राजांनीं नील नदीच्या मुखप्रदेशाच्या वायव्येकडील हिक्सॉस राजांची सत्ता उलथून पाडण्याचें कार्य प्रथम हातीं घेतलें व अव्हारिसचा किल्ला सर करून अठराव्या घराण्याचा संस्थापक “अह्योसी” यानें तें कार्य यशस्वी रीतीनें पार पाडलें. त्यानें फिरून पॅलेस्टाईन मध्यें त्यांच्यावर स्वारी केली व तींत शाहुरेन शहराला तीन वर्षे वेढा देऊन अखेर तें हस्तगत केलें. शिवाय, आपल्या राज्यांतील बंडाळी मोडून त्यानें सीरिया व न्यूबिया या देशांवरहि स्वाऱ्या केल्या. याच वेळेस कोणा एका अबाना नांवाच्या गृहस्थास  राजाच्या नांवाचा म्हणजे अह्योसी नांवाचा मुलगा होता. त्याच्या एल् काब येथील शिलालेखावरून या काळची पुष्कळशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध होते. अह्योसी नंतर पहिला अमेनॉफिस राज्यावर बसला. त्यानें लिबिया व इथिओपिया या देशांवर स्वाऱ्या केल्या. यानंतर पहिला टेथमॉसिस हा तिसरा राजा होऊन गेला. तो दुसऱ्या घराण्यांतील होता परंतु त्यानें आपल्या अह्योसी नांवाच्या बायकोकडून राज्यावर आपला हक्क लागू केला. अशा रीतीनें कांही एक दंगा धोपा नसतां जेव्हां तीस वर्षपर्यंत राजसत्ता नीट रीतीनें प्रस्थापित झाली तेव्हां दुसऱ्या देशावर स्वाऱ्या करून आपला राज्यविस्तार करण्याइतका मिसर देश धनाढ्य व बलाढ्य झाला. त्यांच्यांत आतां क्षात्रतेज चमकूं लागलें. राजा, त्याचा प्रधान व इतर  दरबारचे अंमलदार यांच्या हातांत सर्व राजसत्ता एकवटली होती व मध्यकालीन राज्याच्या वेळेस प्रचारांत असलेल्या सरंजामी पद्धतीचा मागमूसहि शिल्लक नव्हता. टेथमॉसिस यानें “कुश” प्रांत पूर्णपणें काबीज केला व तेथील राज्यकारभार चालविण्यास आपल्या प्रतिनिधीची नेमणूक केली. हा “कुश” प्रान्त दक्षिणेस चवथ्या धबधब्याच्या किंचित् खालीं असलेल्या नपाट्यापासून उत्तरेस एल्  काब पर्यँत विस्तृत झाला होता त्यामुळें वरच्या मिसर देशाचें पहिले तीन प्रांत त्यांत समाविष्ट होते. नंतर सीरियाकडे मोर्चा वळवून  टेथमॉसिस हा युफ्रेटिसपर्यंतचा मुलुख सर करीत गेला. कदाचित् त्याच्या पूर्वीचा राजाहि तेथवर गेला असेल परंतु तें सिद्ध करणारीं साधनें उपलब्ध नाहींत. वर दिलेल्या स्वाऱ्या खर्चाच्या दृष्टीनें नुकसानकारक नव्हत्या. उलट कैद्यांची वाढ, लुटालुट व खंडणी या योगांनी मिसर देशाची सांपत्तिक भरभराटच होत गेली. मिसर देशाच्या बादशहांनीं कर्णक येथील थीबीज शहरच्या अ‍ॅमन नामक देवाच्या देवस्थानाचा विस्तार करून, त्याच्या ऐश्वर्यात भर घालून जगांतील सर्व देवस्थानांमध्यें त्याला जें अत्यंत श्रेष्ठ स्थान प्राप्त करून दिलें यास प्रथम पहिल्या टेथमॉसिसनें सुरुवात केली असें म्हणण्यास हरकत नाहीं. डेर एल्  बाहरी येथील देवालयाच्या रचनेस त्याचीच कल्पकता कारणीभूत झाली. त्याच्या कारकीर्दीच्या अखेर त्याचे वडील मुलगे मृत झाल्यामुळें टेथमॉसिस यानें अह्योसी पासून झालेल्या हाटशेपसूत नांवाच्या आपल्या मुलीकडे राज्यकारभाराचा कांही भाग सोपविला. ज्या खिंडीत थीबीसच्या राजांची कबरस्थानें आहेत तेथें पहिल्या टेथमॉसिस यासच प्रथम मूठमाती देण्यांत आली होती. त्याच्या मागून त्याचा मुलगा हाटशेपसूतचा पति दुसरा टेथमॉसिस राज्यावर बसला परंतु त्यानें दोन तीन वर्षेच राज्य केलें. तेवढ्या अवधींत त्यानें न्यूबियावर स्वारी केली व आपल्या एसी नांवाच्या रखेलीचा मुलगा जो तिसरा टेथमॉसिस यास आपल्या बरोबर गादीवर बसविले. परंतु आपल्या पतीच्या निधनानंतर हाटशेपसूतनें सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. तिच्या पुतळ्यांत तिचा पेहेराव व स्वरूप जरी मर्दानी व पुरुषासारखे आहेत तरी शिलालेखांत तिचा उल्लेख स्त्रिलिंगातच केलेला आढळतो. या काळच्या कांही स्मारकांत तिचेंच नांव फक्त आढळतें तर कांहीत तिचें व तिसऱ्या टेथमॉसिसचें जोडीनें आढळतात व कांहीत फक्त टेथमॉसिसचें आढळते; परंतु, या अद्वितीय बाईचें आपल्या सावत्र मुलावर पुष्कळच वर्चस्व असलें पाहिजे, कारण मिसर देशाची सर्व राजसत्ता तिच्या हाती असल्याबद्दल तिची प्रसिद्ध आहे. टेथमॉसिसच्या ममीवरून (त्याच्या जतन केलेल्या शवावरून) किंवा त्याच्या कारकीर्दीच्या शकावलीपरून पाहूं गेले तर तो उतारवयाचा दिसून येतो. तथापि त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात दिसून येणारा त्याचा प्रभाव तो ज्यावेळी हाटशेपासून बरोबर जोडीनें राज्यकारभार चालवीत होता त्यावेळी दृष्टीस पडत नाहीं. शांततेच्या काळांत ज्या कलांची अभिवृद्धि करणें शक्य असतें त्यांची अभिवृद्धि हाटशेपासून हिनें केली. हिक्सॉस घराण्यांतील राजांच्या जुलमामुळे व अनास्थेमुळें ज्या वरच्या व खालच्या मिसर देशांतील देवस्थानांची अव्यवस्था झाली होती तेथील पूजाअर्चा तिनें पूर्ववत सुरू केली. डेरएल्बाहरी येथील देवालयाचें काम पुरें करून व त्यास उत्तम तऱ्हेनें शृंगारून तिनें त्याच्या भिंतीवर आपली दैवी उत्पत्ति अंमनच्या देखरेखालीं आपले संगोपन व आपल्या पित्याबरोबर जोडीनें राज्य चालविणें इत्यादि गोष्टींची चित्रें काढविलीं. प्यूओनीवर जलमार्गानें केलेल्या स्वारीचीं व इतर अन्य प्रसंगांची सुप्रसिद्ध शिल्पकामें येथे पहावयास सांपडतात. पहिल्या व दुसऱ्या टेथमॉसिसच्या कारकीर्दीत कर्णक येथें सुरू केलेली कामें पुरी करण्यांत हाटशेपसूत हिनें फार मेहनत केली व तेथील वेशीजवळ तिनें दोन चौकोनी मनोरे उभारले. त्यांपैकी एक अद्याप उभा आहे व तो त्या नमुनेदार देवालयास विलक्षण प्रकारची शोभा देतो. जेव्हां हाटशेपसूत ही पहिल्या टेथमॉसिस बरोबर राज्यकारभार चालवीत होती तेव्हांपासून बाविसाव्या वर्षाचा सन सिनाइ येथें सांपडला आहे. त्यानंतर थोडयाच अवधींत तिसरा टेथमॉसिस हा आपल्या कारकीर्दीच्या बाविसाव्या वर्षी मोठ्या जोमानें राज्यकारभार चालवीत आहे असें दिसून येतें. हाटशेपसूत हिच्या ठिकाणीं असें कांही तेज होते की ती असेपर्यंत तिच्यावर सर्व सेवकांची निष्ठा होती व कोणाची वर मान करण्याची छाती होत नव्हती. परंतु तिच्या मृत्यूनंतर थोड्याच अवधींत प्रतिक्रियेला सुरुवात झाली. स्त्रीप्राबल्यासंबंधानें तिटकारा, त्यांत दुसऱ्यांवर छाप ठेवण्याची त्या स्त्रीची तऱ्हा व आपल्या सावत्र मुलाचा वास्तविक हक्क असतां तो तिनें बळकावणें इत्यादि गोष्टी त्या प्रतिक्रियेस कारणीभूत झाल्या असाव्या. त्यामुळें तिच्या खोदीव मूर्ती छिन्नभिन्न करण्यांत आल्या व तिचीं स्मारकें नष्ट करून त्यावर नवीन इमारती होऊं लागल्या आणि कबरस्थानांत कायमची विश्रांति घेत पडलेल्या तिच्या एकनिष्ठ सेवकांचाहि तसाच सूड घेण्यांत आला. तदनंतर अखेनटान यानें आपल्या धर्मवेडामुळें अ‍ॅमनदेवाच्या सर्व मूर्ति आणि त्याचें नांव ज्यावर आहे असे सर्व कोरीव लेख छिन्नविछिन्न करून टाकले. यांत हाटशेपसूत हिची सर्व उत्तम उत्तम स्मारकें नष्ट झाली. एकोणिसाव्या राजघराण्याच्या संस्थापकांनीं तर तिला राज्य करण्याचा हक्कच नव्हता म्हणून तिची नांवे खोडून त्याजागीं पहिला, दुसरा व तिसरा टेथमॉसिस यांची नांवे घातलीं. ही कलाकौशल्याविध्वंसकबुद्धि सर्व मिसरदेशभर त्यावेळीं दिसून आली परंतु सिनाइच्या दूरदूरच्या खाणींत असलेल्या हाटशेपसूतच्या मूर्ती मात्र अभंग राहिल्या. पहिल्या सेतीनें व दुसऱ्या रामेसीसनें केलेल्या राजांच्या यादीमध्यें हाटशेपसूतचें नांव नाहीं व यापुढील कोणत्याहि स्मारकांत तिच्या कारकीर्दीचा उल्लेख नाहीं.