प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

अठरा ते वीस राजघराण्यांचा काळ - मिसर देशांतील कलेसंबंधी हा काळ अत्यंत लोकप्रिय होण्याचें कारण अगदीं उघड आहे. भव्यपणा, पूर्णपणा व ठसठसितपणा इत्यादि ज्या गुणांनीं पूर्वकाळच्या लोकांनीं आपलीं कामें अजरामर करून ठेविली आहेत त्यांचा या काळांत लोप झाला होता. पूर्वी प्रचलित असलेल्या पद्धतीस जर चारित्र्यदर्शक कला असें नांव दिले तर हल्लीच्या पद्धतीस भावनादर्शक कला असें म्हटलें पाहिजे. भावनामय कामें बुद्धीला ग्रहण करण्यास सोपी असल्यामुळें अधिक लवकर लोकप्रिय होतात तरी प्रत्येक युगांत व प्रत्येक देशांत असा एक सर्वसामान्य नियम आहे कीं, क्षणिक भावनादर्शक कामापेक्षां कायमच्या चारित्र्यदर्शक कामास अधिक मान असतो. प्रस्तुतचा काळ भावनादर्शक कामांचा असल्यामुळें त्यांच्या सुबक रूपरेषा, त्यांतील उल्हसित पद्धति, त्यांची अद्भुत रस उत्पन्न करणारी ऐट व त्यांच्यांत मधून मधून दिसणारें व म्हणूनच मनोरंजक व मनोवेधक वाटणारें औद्धत्य इत्यादि गोष्टी आपणांस या काळच्या कामांत पहावयास सापडतात. इतर रेषा स्पष्ट दिसाव्यात म्हणून या काळच्या मूर्तीच्या अंगाचा इतर भाग अस्वाभाविक रीतीनें अगदीं गुळगुळीत केलेला आढळतो, अद्भुत रस उत्पन्न करण्याच्या अनावर इच्छेनें श्मशानयात्रच्या प्रसंगी पतिपत्नी हातांत हात घालून चालतांना दाखविलेले आढळतात. आणि ही इच्छा अखेनटॉनच्या वेळी इतकी अनावार झाली कीं तो आपल्या रथांत पत्नीचे चुंबन घेत आहे किंवा तिला आपल्या गुडघ्यावर नाचवीत आहे अशा प्रकारच्या त्याच्या मूर्ती पहावयास सांपडतात. कलाकौशल्याच्या कामांत कोणते प्रसंग दाखवावेत किंवा कोणते दाखवूं नयेत हा निर्बंध नाहींसा होऊन त्याच्या जागी जे पहावें तें मूर्तीत किंवा चित्रांत दाखवावें अशी पद्धत सुरू झाली. यामुळें त्या काळच्या मूर्तीव चित्रें जरी सुबक व मोहक आहेत तरी ही पद्धत म्हणजे त्या कलांची अखेरची मर्यादा होऊन यापुढें त्यांची प्रगति होण्यास जागा उरली नाहीं.

वरील म्हणण्याचा प्रत्यय तिसऱ्या अमेनोफिसच्या मूर्तीपासून यावयास लागतो. खाजगी व्यक्तांच्या मूर्तीत उदाहरणार्थ एका सिद्धीणीच्या लाकडी पुतळ्यांत तो त्याहूनहि अधिक स्पष्टपणें पहावयास सांपडतो. अखेनटॉनच्या वेळीं या कलेची मजल कोटवर गेली होती हें पहावयाचें असल्यास तय्या राणीच्या मुखवट्याचा जो एक अल्पसा भाग उपलब्ध आहे तो पहावा. त्यांत नाकाची व तोंडाभोवतालची वळणें ही हुबेहुब आहेतच परंतु जेथे दोन ओठ मिटतात तो भाग दाखविण्यांत तर शिल्पकारानें आपलें कमालीचें कसब दाखविलें आहे. एकोणिसाव्या राजघराण्याच्या वेळचें नावाजण्यासारखें शिल्पकाम म्हणजे टयूरिन येथें काळया पाषाणाचा घडविलेला दुसऱ्या रामेसीसचा पुतळा हें होय.