प्रस्तावनाखंड
विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

ग्रंथप्रवेश.

ज्ञानकोशांतील अनेक विषयांकडे लक्ष गेलें तरच ज्ञानकोशाचा उपयोग होणार.  अनेक विषयांसंबंधानें जिज्ञासा उत्पन्न होण्यास वाचकांस अगोदर विविध माहिती असावी लागते. जर जिज्ञासा नसेल तर ज्ञानकोशाचा बराचसा भाग उपयोगांतच येणार नाहीं. आज अशी स्थिति आहे कीं, आपल्या देशांतील सामान्यतः सुशिक्षित समजला जाणारा वर्ग अर्वाचीन संस्कृतीच्या अनेक अंगांपासून दूर आहे एवढेंच नव्हे, तर भारतविषयक इतिहास, शास्त्र, कला, वाङ्‌मय, यांची सामान्य माहितीहि त्यास नाहीं. मंत्रद्रष्टे ऋषी, श्रौतधर्मांचे संस्थापक, संशयनिर्णायक ब्रह्मवादी आणि रहस्यांचे वक्ते, तसेच स्मार्तधर्मांचे आर्चाय यांची सामान्य माहिती देखील सुशिक्षित वर्गास नाहीं. निरनिराळ्या मतांचे, संप्रदायांचे व दर्शनांचे संस्थापक व प्रवक्ते, तसेंच वैद्यक, रसायन इत्यादि भौतिक शास्त्रांचे प्रर्वतक, धर्मशास्त्र व नीति अथवा अर्थशास्त्र यांचे आचार्य, वेदांगांचे प्रणेते या उत्तरकालीन भारतीय थोर पुरूषांचीं नांवें काय तीं थोडींबहुत परिचित असतील. काव्यनाटकादि ललितवाङ्‌मयाच्या इतिहासांतील प्रसिद्ध पुरूषांची माहिती आजच्या सुशिक्षितांस सामान्यतः बरी आहे, पण गीतनृत्यनाट्यादि कलांच्या शास्त्रीय नियमांच्या संशोधकांची माहिती त्यांस कितपत आहे ? अनेक प्रकारच्या पुरूषांच्या व स्त्रियांच्या कर्तृत्वानें भारतीय संस्कृतीचा इतिहास जगतास भूषणभूत झाला आहे. या सर्व प्रकारच्या पुरूषांच्या व स्त्रियांच्या नांवांची सामान्य कल्पना ज्यास असेल तो तें तें नांव उघडून पाहून अधिक माहिती मिळवील. तथापि ज्यास मुळांत नांवच परिचित नाहीं, त्यास जिज्ञासा तरी कोठून होणार ?  वाचकवर्गाचें जिज्ञासाक्षेत्र जितकें विस्तृत असेल त्या मानानें त्याला ग्रंथोपयोग करावासा वाटणार. यासाठीं त्याचें जिज्ञासाक्षेत्र मोठें केलें पाहिजे. ज्ञानप्रसाराच्या प्रयत्‍नांत जिज्ञासावृद्धि हें प्रथम कार्य होय.

आर्यसंस्कृतीचीं अनेक अंगें व त्यांचा इतिहास हे विषय सामान्य विद्यासंस्काराच्या क्षेत्रांत येण्याजोगे आहेत. तथापि आजच्या आयुष्यास अत्यंत अवश्य असें ज्ञान हें नव्हे. आजला अत्यंत अवश्य ज्ञान म्हणजे शास्त्रीय होय. पण त्या ज्ञानाविषयीं देखील समाजांत आस्था नाहीं. याचें कारण मनुष्याचे हितसंबंध प्रत्येक शास्त्राच्य़ा ज्ञानांत अडकले आहेत याची लोकांस कल्पना नाहीं. विवक्षित ज्ञानाविषयीं आस्था उत्पन्न होण्यास त्या ज्ञानाचा मनुष्यहिताशीं असलेला संबंध लक्षांत यावा लागतो. जेव्हां कोर्टांत एखादा प्रश्न येतो, तेव्हां तो सोडविण्यासाठीं हजारों रूपये खर्च करण्यास मनुष्य तयार होतो; तथापि केवळ त्या प्रश्नाचा खल व्हावा म्हणून एक पै देण्यासहि तो मनुष्य तयार होणार नाहीं. एखाद्या शास्त्रीय शोधाचा पैसे उत्पन्न करण्यास उपयोग होत असेल तर त्या शोधासाठीं पैसे खर्च करण्यास लोक पुढें येतात; तथापि केवळ शास्त्रीय शोधासाठीं पैसे द्यावायास लोकांची नाखुषीच असणार. शास्त्रीय शोध देशांत अधिकाधिक शक्य होण्यास सर्वसामान्य शास्त्रीय ज्ञान देशांत अधिक असलें पाहिजे आणि संशोधक वर्गहि तयार असला पाहिजे, पण शास्त्रीय शोध व्हावा अशी जेव्हां सरकारची किंवा शास्त्रीय शोधांवर पैसे मिळवूं इच्छिणार्‍या भांडवलवाल्यांची इच्छा होते तेव्हांच शास्त्रीय शोधांस उत्तेजन मिळतें. ज्ञानाचें स्तोत्र गाऊन जें काम होणार नाहीं तें काम पैसेवाल्याचा द्रव्यलोभ अधिक सुशिक्षित केल्यानें होतें.

ज्ञानकोशाचा उद्देश महाराष्ट्रीयांस अनेक शास्त्राचें ज्ञान करून देण्याचा आहे. प्रस्तावनाखंडाचे उद्देश
दोन आहेत. एक उद्देश जें ज्ञान गोष्टीच्या रूपानें मांडणें अधिक चांगलें तें त्या रूपांत मांडणें हा आहे, व दुसरा उद्देश प्रत्येक शास्त्राविषयीं जिज्ञासा उत्पन्न करून देण्याचा आहे.  भारतीयांचें जगांत स्थान, त्यांचें पूर्वींचें कार्य आणि भावी कार्य हा प्रस्तुत विभागाचा विषय आहे; आणि या स्थानाची व कार्याची व्यापक कल्पना येण्यासाठीं भारतीय संस्कृतीचा प्राचीन प्रसार बराच सविस्तर वर्णिला आहे; तसेंच परकीय संस्कृतीपासून भारतीयांनीं काय घेतलें हेंहि स्पष्ट दिलें आहे.