प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.
स्वातंत्र्याची दुसरी अंगें.- विचारस्वातंत्र्य हें स्वातंत्र्याचें केवळ एक अंग होय. वैयक्तिक स्वातंत्र्यास जे अनेक शत्रू होऊन गेले त्यांत ज्यांच्या हातीं सत्ता असेल त्यांनी वाटेल ती भयें आपल्या तावडींतील लोकांस दाखवावी आणि वाटेल तसें छळावें हा एक भाग होय. याशिवाय स्वातंत्र्याच्या दृष्टीनें दुसरी भयंकर उणीव म्हणजे गुलामगिरीची संस्था होय. जुलमी राज्यपद्धति जाऊन तिच्या ठायीं नियमांनी व कायद्यानें बद्ध अशी शासनपद्धति क्रमानें उत्पन्न झाली ही स्वातंत्र्याच्या दृष्टीनें व सामाजिक जीवनाच्या दृष्टीनें महत्त्वाची गोष्ट झाली. तर या दोहांचाहि इतिहास स्वातंत्र्याच्या इतिहासांत मोठा महत्त्वाचा आहे.