प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.
लोकशाही आणि शिक्षण व कला.- लोकशाहीबरोबर कलेचा विकास कितपत होतो हा मोठा प्रश्न आहे. कित्येकांचें असें म्हणणें आहे कीं ज्या देशांत सरदार वर्ग व राजघराणें आहे अशा ठिकाणींच कलेस आश्रय मिळतो. या त-हेचीं मतें व्यक्त करणारी मंडळी हें विसरतात कीं, ज्या देशामध्यें सर्वसामान्य जन कलेचे ग्राहक होतात, त्या देशामध्येंच कलेवर मनुष्य दोन पैसे मिळवील. आज जे छापखानदार चित्रे छापून विकतात किंवा जाहिरातीसाठीं चित्रें खरेदी करतात त्यांच्या सारखें चित्रकारांस उत्तेजक कोणीहि नाहींत. श्रीमंत वर्ग आपल्या घराण्यांतील व्यक्तींची चित्रें काढवून घेईल पण त्यासारख्या वर्गाकडून प्राप्ति थोडकीच व्हावयाची. सामान्य मनुष्य लोकशाहींत सुशिक्षित अधिक असतो एवढेंच नव्हे तर त्याच्या गरजा वाढलेल्या असतात. जेथें सामान्यवर्ग अधिक सुशिक्षित असतो त्या प्रकारच्या समाजापासून जी ग्रंथकार, चित्रकार यांस प्राप्ति असेल ती केवळ सरदार वर्गाकडून व्हावयाची नाहीं. युद्धापूर्वींच्या जर्मनींत सामान्य वर्गांत देखील वाङ्मय वगैरेचा विकास राजसत्तेचें महत्त्व लोकांत असतां झाला पण त्या विकासास कारण राजसत्तेपेक्षां सुशिक्षित राष्ट्रांच्या वाढत्या गरजा होत असें म्हटले असतां अधिक बरोबर होईल. जर्मनींतील राजसत्ता केवळ सार्वजनिक पैशाचा अपहार करण्याकडेसच प्रवृत्त झाली नसून लोकांची सर्व त-हेनें प्रगति व्हावी याबद्दल प्रयत्न करणारी होती. म्हणजे लोककल्याणासाठीं आणि आपल्या राष्ट्रास इतरांपेक्षा बलाढ्य करण्यासाठीं खटपट ती राजसत्ता करीत होती. लोकशाहीमध्यें सामान्यतः सार्वजनिक गोष्टींत मन घालणारा वर्ग अधिक मोठा असावा लागतो आणि अनेक सार्वजनिक प्रश्नावर जनता अधिक सुशिक्षित करावी लागते. यामुळें सार्वजनिक व राष्ट्रीय हिताहिताचे प्रश्न यांवर अधिकाधिक वाङ्मय उत्पन्न होऊं लागतें. वर्तमानपत्रांचा धंदा व मुद्रकांचा धंदा हे धंदे कितीतरी अधिक भरभराटीस येतात. आपणांस नुकता जो निवडणुकींचा अनुभव आला त्यांत आपणांस असें दिसून आलें कीं, छपाई व पोस्टेज या बाबतींतच लोकांनीं किती तरी खर्च केला. निवडणुकीच्या वेळेस उमेदवार प्रातांच्या गरजांविषयीं आपलीं मतें वगैरे सांगतात आणि त्यामुळें जनता राज्य कारभाराविषयीं अधिक सुशिक्षित होते.