प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.

लोकशाही.- वैयक्तिक स्वातंत्र्य राजसत्ताक पद्धतींत देखील असूं शकते; पण जेव्हां लोकसत्ता असेल तेव्हां स्वातंत्र्याचा आणखी विकास होतो; आणि समाजामध्यें एकमेकांनां मदत करणें व अनेक लोकांनीं मिळून कार्य करणें इत्यादि गुणांची जोपासना होते.

जगामध्यें लोकसत्तात्मक राज्याची कल्पना ग्रीसपासून आतांपर्यंत एकसारखी चालू आहे. फरक झाला तो या गोष्टींत झाला कीं, प्राचीन काळीं मोठ्या क्षेत्रांत लोकराज्य शक्य नव्हतें. अनेक ठिकाणच्या लोकांनीं एकत्रित होऊन राज्य चालविणें ही गोष्ट ज्या कालांत दळणवळण कठिण त्या काळांत कठिण, किंबहुना अशक्य होती. मोठें राज्य व्हावयाचें म्हणजे राजसत्तेच्या साहाय्यानेंच व्हावयाचें. ग्रीसमधील लोकराज्यें म्हणजे शहरें व त्याच्या परिकरांतील भाग. राजसत्तेच्या मार्फत देशांत एकत्व झालें, निरनिराळ्या भागांतील लोकांची एकमेकांशी ओळख झाली म्हणजे तेथील राजसत्ता जाऊन तेथें हळू हळू लोकसत्ता स्थापन होत जावयाची हा विकासक्रम आहे. ग्रीसच्या राष्ट्रांसारखींच लहान लहान राज्यें पुढें इटालींत व ट्यूटॉनिक भागांत उत्पन्न झालीं. प्रथम जरासें मोठें लोकसत्तात्मक राष्ट्र तयार झालें, ते स्वित्झरलंड होय. पण ज्या वेळेस ते राष्ट्र झालें त्या वेळेस त्याला राष्ट्र म्हणण्यापेक्षां अनेक राष्ट्रांचा तात्पुरता संघ असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्या संघास पुढें चिरकालत्व येऊन पुढे त्याचें राष्ट्र बनले. स्वित्झरलंडच्याप्रमाणेचा अमेरिकेची स्थिति होती. आज अमेरिका मोठी दिसते तेवढी त्या वेळेस नव्हती तर त्या वेळेस तेरा संस्थानें मात्र होती. प्रत्येक संस्थान मोठें होतें. मोठें संस्थान असून तें शासिलें जाई याचें कारण त्याच्या पूर्वीं राजसत्तेनें तें बांधले गेलें आणि त्याची राज्यपद्धति त्या वेळेस तयार झाली तीच पुढील शासनविकासास प्रारंभ म्हणून उपयोगी पडली. अमेरिकेनंतर फ्रान्स लोकसत्तात्मक राष्ट्र झाले व त्याचीं पुढें अनेक स्थित्यंतरें होऊन पुन्हां तें लोकसत्तात्मक झालें. दक्षिण अमेरिकेंत, मेक्सिकोंत व मध्य अमेरिकेंतील बेटांत लोकसत्ता स्थित झाली. पण पुष्कळ ठिकाणीं नांवाला लोकांनी ''निवडलेला'' अध्यक्ष असे. पुष्कळ प्रसंगीं अध्यक्ष आपली निवडणूक सशस्त्र सेनेच्या साहाय्यानें करून घेई.

इसवी सन १९०० सालापासूनच लोकसत्तेची वाढ पाहूं लागलों तर असें दिसून येईल कीं, या कालांत कांहीं साम्राज्याचे अधिपती असलेल्या बादशहांचीं पदें नष्ट होत आहेत.

१९०० च्या सुमारास ज्या प्रसिद्ध बादशाही सत्ता होत्या त्यांत तीन सत्ता प्रमुख होत्या. त्या म्हटल्या म्हणजे रशिया चीन व तुर्कांचा सुलतान या होत. या जवळ जवळ स्वरूपानें बादशाह्या परंतु वस्तुतः नोकरशाह्या होत्या. आज या तीनहि बादशाह्या नष्ट झाल्या आहेत. चीनचें साम्राज्य नष्ट होऊन तेथें लोकसत्ताक राज्य झालें आणि रोमानाफ घराणें व रशियन बादशाहीची गेल्या महायुद्धानें उत्पन्न झालेल्या परिस्थितिज्वालेंत आहुति पडली. आणि खिलाफतीमध्यें खलीफाचे धार्मिक अधिकार जिवंत ठेवले पण राजकीय अधिकार नष्ट केले. क्षेत्रफळाच्या दृष्टीनें पोर्तुगालचें साम्राज्यहि लहान नाहीं. आफ्रिकेचा बराचसा भाग आशियाखंडांत कांहीं ठाणीं व खुद्द पोर्तुगाल हीं त्या साम्राज्यांत आहेत. त्या साम्राज्याच्या मध्यवर्ती संस्थानानें राजशासन टाकून देऊन लोकशासन पत्करिलें. त्यामुळें गोव्यांतील शासनपद्धतीवरहि परिणाम झाला. सर्वांत महत्त्व पावलेलें जुनें यूरोपीय बादशाही घराणें म्हटलें म्हणजे हाप्सबर्ग, तें नष्ट झालें. जर्मन कायसरचें पद नष्ट झालें एवढेंच नव्हे तर जर्मनींत जीं अनेक राजघराणीं होतीं तींहि नष्ट झालीं. आज जगभर लोकसत्ताच अधिकाधिक प्रबल होत चालली आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.