प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.

शास्त्रीय शोधाचा व व्यापारी दळणवळणाचा परिणाम.- गेल्या शंभर वर्षांत शास्त्रीय शोधांचा परिणाम जगावर मोठा झाला आहे. उत्पादनाच्या आणि व्यापाराच्या पद्धती अगदीं पालटून गेल्या आहेत. संस्कृतीचा प्रसार त्यामुळें अधिक होत आहे आणि त्याचा संस्कृतिस्थानांवरहि परिणाम झाला आहे. पूर्वीं संस्कृतीचें केंद्र म्हणजे राजधान्या असत. आतां तसें नाहीं. पूर्वीं शहरें केवळ राजधानीमुळें प्रामुख्यास येत. आतां राजधानीपेक्षां नगरविकासाला पोषक अशीं कारणें म्हणजे व्यापार, माल तयार करण्यास व वाहून नेण्यास सोयी या गोष्टींचा अधिकाधिक परिणाम होऊं लागला आहे. जेथें मालाचें रूपांतर करावयास शक्ति स्वस्त मिळते, जेथें चोहोंकडचा माल आल्यामुळें कारखान्यास माल ताबडतोब मिळतो, तेथे उद्योगधंदा एकवटतो आणि मोठी लोकसंख्या पसरली जाते. न्यूयॉर्क शहर हें अमेरिकेंतील सर्वांत मोठें शहर आहे आणि जगांत लोकसंख्येनें दुस-यां प्रतीचें शहर आहे आणि संस्कृतिविषयक अनेक बाबतींत जगांतील पहिल्या प्रतीचें शहर आहे. पण हें शहर आहे. पण हें शहर अमेरिकेची राजधानी नाहीं एवढेंच नव्हे पण न्यूयॉर्क संस्थानाची देखील राजधानी नाहीं. बफलो शहर हें केवळ नायगाराची वीज तेथें फार थोडक्या पैशांत मिळते व त्यामुळें कारखाने काढण्यास मदत होते यामुळें वसलें आहे. खुद्द मुंबई शहराची गोष्ट घ्या. येथें हिंदुस्थान सरकारचें स्थान नाहींच पण मुंबई सरकारचें शासनयंत्र देखील अर्धेमुर्धेच आहे. मुंबई शहराचें वैभव व्यापारावर आणि गिरण्यांवर अवलंबून आहे. जगांत दिवसानुदिवस या कारणांमुळेंच नगरवृद्धि विशेष होईल असें भाकीत करण्यास हरकत नाहीं.

मानवी आयुष्यक्रमाचा विकास पहावयाचा झाल्यास तो अनेक अंगांनीं पाहिला. येथें कोणत्याहि विकासाकडे पूर्ण लक्ष देणें शक्य नाहीं व अवश्यहि नाहीं. पुढील पंधरा भाग सविस्तर विवेचनासाठीं आहेतच आयुष्यक्रमाच्या विकासाचीं अनेक अंगें व त्या अनेक अंगांचा अन्योन्याश्रय व त्यांचें अगदीं सामान्य स्वरूपवर्णन एवढेंच येथें पुरे.