प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.
लोकसत्ता आणि ग्रंथकार.- वैयक्तिक सत्ता जाऊन लोकसत्ता स्थापन होण्याला जीं कारणें झालीं त्यांत लोकसत्तेचे प्रवक्ते ग्रंथकार यांचें कार्य विसरतां कामा नये. त्यामध्यें रूसो, लॉक, वगैरे अनेक महत्वाचे ग्रंथकार होऊन गेले. त्यांनीं लोकसत्तेच्या समर्थनार्थ निरनिराळीं आद्यस्थितिविषयक मतें पसरविली. त्या ग्रंथकारांचा परामर्ष पुढें योग्य प्रसंगीं घेण्यांत येईल. हीं सर्व मतें सत्याच्या पायावर उभारली गेलीं होती असें नाहीं.
मनुष्याला आपल्या हक्काची जाणीव करून देणा-या ज्या कांहीं गोष्टी झाल्या आणि त्यासाठीं जीं कांहीं तत्वज्ञानें पसरलीं त्यांत रूसोच्या ''सामाजिक ठरावा'' (सोशल काँट्रॅक्ट) चा उल्लेख केला पाहिजे. रूसोची सामाजिक ठरावाची कल्पना अशी होती कीं, आरंभीं माणसें स्वतंत्र होतीं, त्यास शासनसंस्थांची गरज भासूं लागली तेव्हां त्यांनीं आपापसांत ठराव करून एक सत्ताधारी निवडला. तो चांगल्या वागणुकीच्या अटीवर निवडला. रूसोची येणेंप्रमाणें व्यक्त केलेली सामाजिक ठरावाची कल्पना जरी केवळ काल्पनिक आहे तरी तिचा परिणाम जनतेवर मोठा झाला. राजत्व हें ईश्वरनिर्मित नाहीं किंवा अमर्याद नाहीं तर आमच्या इच्देवर आहे, आणि आम्ही ठरवूं त्या मर्यादेंत राजानें आपले अधिकार वापरले पाहिजेत अशी कल्पना झाली.
याशिवाय ''स्वाभाविक हक्कां'' चें एक तत्वज्ञान लोकांमध्यें कांहीं दिवस पसरलें होतें. मनुष्याला तो मनुष्य आहे म्हणूनच कांहीं हक्क आहेत असें ''स्वाभाविक हक्कां'' चे विचारप्रवर्तक लोकांस सांगत असत.
सध्यांच्या जगाच्या मनोवृत्तीत प्राचीन जगापेक्षां अधिक सुधारणा झाल्या असें म्हणतां येत नाहीं. आपल्या खेरीज इतरांनां नागरित्वाच्या हक्काच्या बाबतींत वगळावयाचें; दुस-या राष्ट्रास जिंकलें तर गुलाम करावयाचें; गुलामगिरी गैरफायदेशीर झाली तर आपल्या ताब्यांतील लोकांची प्राप्ति नियमित करून फायद्याचा मोठा वांटा आपल्याकडेसच ओढावयाचा; जिंकलेल्या किंवा तावडींत सांपडलेल्या लोकांच्या पैशावर चैन करावयाची व जिंकलेल्यांच्या शिक्षणाकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष करावयाचें; त्यांनीं फार तडफड केली तर कांहीं तुकडे टाकावयाचे हा मनुष्य स्वभाव बदलला नाहीं. जो काय फरक झाला तो श्रीमंतांनीं आपल्या योगक्षेम चांगला चालण्यासाठीं इतरांस कसें वागवावें याविषयींच्या कल्पनेंत होत चालला. तावडींत सांपडलेल्या लोकांनां नाडून आपली विशेष धन होत नाहीं तर काम करणारे व कामकरी, कर देणारे व कर घेणारे यांचा अन्योन्याश्रय असल्यामुळें कर देणारास किंवा काम करणारांस नाडणें फायदेशीर होत नाहीं हें वरच्या वर्गास समजूं लागलें. आणि खालचा नाडलेला आणि दुखावलेला वर्ग स्वहितसाधनक्षम अधिकाधिक होऊं लागला. जगांतील प्रत्येक कार्य अन्योन्याश्रयी आहे. एक बाजू अडून बसली तर दुस-या पक्षाचेंहि काम अडेल इत्यादि गोष्टी लोकांस समजूं लागल्या आहेत. यामुळें शासनसंस्था, मोठमोठे कारखानदार या सर्वांस सामान्य मनुष्याची किंमत अधिकाधिक वाटूं लागली आहे. सामान्य कामकरी अगर प्रजेंतील व्यक्ति यांचें वैयक्तिक महत्त्व नाहीं. तर सामुच्चयिक प्रयत्नानेंच परिणाम होतो ही गोष्ट देखील लोकांस अधिकाधिक समजूं लागली आहे.