प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.
या गेल्या दोन हजार वर्षांतील सामाजिक आणि राजकीय इतिहासाचें अवलोकन केलें म्हणजे ज्या स्थूल गोष्टी आढळून येतात त्यांत समाज पूर्वींपेक्षां फार मोठे होत चालले आणि आतां सर्व जग म्हणजे सर्व देश हा अन्योन्याश्रयी व एकसंस्थाबद्ध समाज होऊं पहात आहे ही गोष्ट प्रथम लक्षांत येईल. समाज मोठा झाल्यानंतर त्यांत अंतर्गत फरक काय काय होतात आणि समाजविस्तार आणि सामाजिक दृढीकरण यांचें जगद्विकासांत स्थान काय आहे इत्यादि गोष्टींवर पहिल्या विभागांत चर्चा केली आहे (प्रकरण १४). प्रस्तुत विभागांत ज्या मोठमोठ्या व्यापक घडामोडींच्या व चळवळीच्या योगानें आजची परिस्थिति उत्पन्न झाली त्या घडामोडींची रूपरेषा दिली आहे. राज्यें उत्पन्न होतात, नष्ट होतात, नवीन उत्पन्न होतात हा केवळ मनुष्याचा एकांगी इतिहास आहे.
राज्यक्रांतीनें मनुष्याच्या आयुष्यक्रमांत किंवा सुखांत वृद्धि नेहेमींच होते असें नाहीं. परंतु पूर्वींपेक्षां अधिक मोठीं राज्यें उत्पन्न झाल्यानें मनुष्याच्या आयुष्यक्रमावर इष्ट परिणाम होतो. मनुष्याच्या आयुष्यक्रमावर ज्या गोष्टी परिणाम करतात त्यांत राज्यमर्यादा, राज्यस्वातंत्र्य, पारमार्थिक संप्रदाय, राजयस्वरूप, (लोकसत्तात्मक कीं राजसत्तात्मक) उत्पादन आणि दळणवळणविषयक नवीन फायदेशीर पद्धतींचा शोध आणि प्रचार, आरोग्यविषयक नवीन गोष्टींचा शोध, भौतिक गोष्टींचा उपयोग, भौगोलिक शोध या सर्व गोष्टी येतात. इतिहास म्हटला म्हणजे राजकीय घडामोडींवर भर देण्यांत येतो. पण राजकीय घडामोडींशिवाय मनुष्यहिवृद्धीच्या दृष्टीनें दुस-या अनेक गोष्टींचा इतिहास मनुष्याला समजल पाहिजे. त्यांतील अनेक गोष्टीचा इतिहास विज्ञानेतिहास नामक पांचव्या भागांत दिला आहे. परंतु अनेक शास्त्रीय शोधांनीं आयुष्यक्रमावर, विशेषतः मनुष्याच्या संपत्तीवर कसा परिणाम झाला; हें त्यांत दिलें नाहीं.