प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.
जुन्या लोकशाहींत आणि अर्वाचीन लोकशाहींत फरक - लोकसत्ता अनेक गोष्टींत प्राचीन भारतांत होती यांत शंका नाहीं. पण ती देखील कांहीं जातिविशिष्ट असावी असें वाटतें. लिच्छवि हें लोकसत्तात्मक राष्ट्र होतें. पण त्या राष्ट्रांत जे इतर लोक असत त्यांस राज्यकारभारांत कितपत स्थान असे याविषयीं शंका आहे. राज्यकर्त्री जात पुष्कळ गोष्टी बहुमतानें ठरवीत असेल पण तींत ब्राह्मण किंवा अंत्यजवर्ग यांस दूरच ठेवीत असावी असें वाटतें. लोकसता आणि समानता यांची जोडगोळी ही नवीनच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
ग्रीसमधील लोकसत्ताक राज्यें पाहून समतेचें तत्त्व ही केवळ अर्वाचीन गोष्ट नाहीं असें कित्येकांस वाटेल. पण खरें पाहतां ही अर्वाचीनच गोष्ट आहे. ग्रीसमध्यें लोकसत्ताक राज्य होतें. पण तेथें जनतेपैकीं फारच थोडक्यांस नागरिकांचे हक्क होते. ग्रीक लोकांमध्यें जे हेलाट म्हणून होते त्यांस साधारण मनुष्याचेहि हक्क नव्हते, आणि गुलामगिरी ही स्वाभाविक संस्था आहे असें ग्रीसमधील सर्वांत प्रसिद्ध तत्त्ववेत्ता जो आरिस्टाटल त्यालाहि वाटत असें. जनतेपैकीं सर्व लोकांचा दर्जा एकच आहे अशी परिस्थिति उत्पन्न करण्याचें श्रेय कांहीं अंशीं ख्रिस्ती संप्रदायास दिलें पाहिजे. जो नागरिक नव्हे तो गांवढळ, तो पेगन, अशी लोकांची कल्पना होती ती कालांतरानें जो ख्रिस्ती नसेल ती पेगन अशी कल्पना झाली. मुसुलमानी जगांत मुसुलमान म्हणजे नागरिकाचे हक्क असलेला, क्षत्रियवर्गतुल्य वर्ग अशी कल्पना होती. सर्व जनता पुढें मुसुलमान झाल्यामुळें विशिष्ट अधिकारानें युक्त असा वर्ग मुसुलमान देशांतून नाहींसा झाला. येणेंप्रमाणें खिस्ती व मुसुलमान संप्रदाय हे समतास्थापक झाले. यूरोप जरी ख्रिस्ती झाला तरी त्याच्यामध्यें जातिभेदसदृश संस्था होत्याच. रोमन राज्याच्या अंतिम काळांत इटालींत अशी आर्थिक परिस्थिति उत्पन्न झाली कीं, जीवनकलह फार कठिण होत गेला; आणि प्रत्येक व्यक्ति आपला धंदा हेच आपलें पिढीजाद वतन होय असें समजूं लागली आणि धंद्यांत परक्याचा प्रवेश होऊं नये म्हणून नियम झाले होते. जो सुतार घराण्यांतील किंवा कोष्टी घराण्यांतील आईपासून जन्मला नसेल त्याला सुताराचें किंवा कोष्ट्याचें काम शिकवूं नये म्हणून त्या देशांतील श्रमजीवीच्या श्रेणींनीं नियम केले; आणि त्यामुळें एक त-हेचा भारतसदृश जातिभेद तेथें सुरू झाला होता. त्याचें स्वरूपवर्णन प्रो. डिल यांनीं आपल्या ग्रंथांत मोठ्या मार्गिकतेनें केलें आहे.