प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.

लोकप्रीतीशिवाय राज्य चालविण्याची अशक्यता.- जर राज्य संपन्न असेल तर सरकारास प्रजेकडे वारंवार कर्जाकरितां वगैरे जावें लागणार. लोक नाखूष असले तर कर्ज मिळणार नाहीं एवढेंच नव्हे तर वसुलहि नीट होणार नाहीं. जबरदस्तीनें वसूल कधीं कधीं करतां येईल. निव्वळ सैन्य खूष ठेवून कांहीं काळ लोकांत अप्रीति असली तरी शासनसंस्था चालवितां येते. पण सैन्यास खूष ठेवण्यास त्यांनां वेळच्या वेळीं पगार द्यावा लागतो. व ज्यांचें लोक खूष नाहींत त्यांचें सैन्यहि खूष रहात नाहीं असें म्हणण्यास हरकत नाहीं.