प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.

राज्यपद्धति व रीतीभातींचा व नीतींचा विकास.- सामाजिक आयुष्यक्रमाचा रीतीभातींच्या विकासाशीं बराच संबंध आहे. लोकराज्यांत प्रत्येक मुनष्यांचा मोठेपणा त्याच्या शेजा-यांच्या चांगल्या मतावर अवलंबून असतो आणि त्यामुळें मोठ्या पदवीला चढलेला मनुष्य विनयादि गुणानें आणि भलेपणानें युक्त असतो. नोकरशाहीमध्यें मनुष्याचा मोठेपणा त्याविषयीं असलेल्या त्याच्या वरच्या लोकांच्या चांगल्या मतावर अवलंबून असतो. त्यामुळें जनतेशीं उन्मत्तासारखें वागणारा आणि वरच्याशीं तोंडपुजेपणा करणारा असा अधिकारी वर्ग निवजतो. अधिकारी वर्गाचें अनुकरण जनतेचा बराच भाग करीत असल्यामुळें सामान्य जनामध्यें आपण मोठे आहों असें समजलें जाण्यासाठीं इतराशीं गुर्मीनें रहाणें वगैरे प्रकार सुरू होतात. लोकशाहीचा परिणाम मनुष्याच्या वागणुकीवर व नीतिमतेवर अधिक चांगला होतो यांत शंका नाहीं. पूर्वीं प्रत्येक राजघराण्याशीं संबंध असलेल्या लोकांची नीति खराब होत चालली असे. कारण अनेक सरदारांच्या बायका राजघराण्यांतील पुरूषाशीं गुप्त व्यवहार करीत आणि त्यावर त्यांच्या नव-याची किंवा आप्ताची बढती किंवा संपन्नता अवलंबून असे कित्येक सरदार तर आपली बायको राजाला किंवा प्रिन्स ऑफ वेल्सला फार पसंत पडते म्हणून अभिमान बाळगीत. लोकशाहींत असे प्रकार फारसे ऐकुं येत नाहींत. पण लोकशाही म्हणने निर्दोष आहे असेंहि नाहीं. सार्वजनिक कामांत पडणा-या व्यक्तीचें नांव बद्दू कसें करावें याविषयीं प्रयत्न एकसारखा विरूद्ध पक्षाकडून होतो आणि त्यामुळें उखाळ्यापाखाळ्या काढणें, खोटे आरोप करणे किंवा विपर्यास करणें ही एक कला झाली आहे.

लोकशाही येथें स्थापन होण्याची खटपट चालली आहे. तिच्या योगानें राष्ट्राचा विकास होतो की राष्ट्र गचाळ व पाजी पुढारी मिळून पिच्छेहाटीच्या मार्गास लागतें हें भवितव्य सांगण्यास आज कोण समर्थ आहे ?