प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.

लोकशाही व समाजसत्तावाद - समाजसत्तावाद हा राजसत्तेच्या केवळ स्वार्थपरायणतेची भीति कमी झाल्यानंतरच उद्भवावयाचा. राज्यपद्धति जेव्हां लोकांच्या हितासाठीं चालली आहे असें लोकांत वाटत असेल तेव्हांच संस्थानाचें कार्यक्षेत्र व्यापक करण्याची बुद्धि लोकांस व्हावयाची. समाजसत्तावाद जेव्हां लोकांत पसरतो तेव्हां संस्थानाचा उपयोग आपल्या हितासाठीं करून घेण्यास लोक शिकलेले असावे लागतात. जेव्हां लोकराज्य उत्पन्न होतें तेव्हां समाजसत्तावादास कधीं कधीं अधिकाधिक जोर येतो. संस्थानाचें कार्यक्षेत्र अधिक व्यापक करून संस्थानास अधिकाधिक लोकोपयोगी करावें याबद्दल प्रयत्न चालतो.