पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण १ लें.
भारतीय संस्कृतीचें आद्यवाङ्मय.

अठरा दिवसांचें भारती युध्द - दोन्हीहि सैन्यें आपापल्या पक्षाच्या मित्रसैन्यासंह कुरुक्षेत्रामध्यें एकमेकांसमोर तळ देतात. शत्रुमित्र कसे ओळखावे याबद्दलचे विशिष्ट शब्द निश्चित करण्यांत येतात. नंतर दोघांमधील युद्धाचे नियम ठरविण्यांत येतात. एकाच दर्जाच्या व एकाच प्रकारचीं शस्त्रें वापरणार्‍या सैनिकांनीं परस्परांशीं युध्द करावें, रथींनीं फक्त रथीशीं युध्द करावें, हत्तीवर बसणार्‍यांनीं हत्तीवर आरूढ झालेल्यांशीं, अश्वारूढांनी अश्वारूढांशीं, व पदातींनीं पदातींशीं युध्द करावें. शरण आलेला, निःशस्त्र, आश्रयार्थ आलेला यांस मारूं नये. वाहनें हांकणारे, ओझ्याची जनावरें, कवच व शस्त्रास्त्रें घेऊन बरोबर येणारे आणि वाद्यें वाजविणारें यांसहि मारावयाचे नाहीं असें ठरतें.

युध्द सुरू होण्यापूर्वी व्यास प्रगट होऊन धृतराष्ट्राचा सारथी संजय यास युध्दभूमीवर होणारी प्रत्येक गोष्ट पाहतां येण्याची दिव्यशक्ति देतात. तसेंच त्यास धृतराष्ट्रास दररोज युद्धाची हकीकत सांगता यावी म्हणून त्यास शस्त्रांनीं अभेद्य करतात. यापुढील युद्धाचें वर्णन संजयानें प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणें त्याच्या तोंडीं घातलें असून तें फारच बहारीचें आहे.

युद्धास आरंभ होण्यापूर्वीच येथें कृष्णार्जुनासंवाद रूपानें भगवद्गीता सांगितलेली आहे.

कौरव व पांडव यांचे पितामह वृध्द भीष्म पहिले दहा दिवस कौरवांचें सैनापत्य करतात. भीष्म मोठ्या आवेशानें भाषण करून सर्व योध्दयांना युद्धाकरितां प्रोत्साहन देतात. ते म्हणतात, वीरहो, स्वर्गाचें दार तुमच्यापुढें मोकळें आहे, त्यांतून तुम्ही इंद्रलोक, ब्रह्मलोक यांप्रत जा. एखाद्या रोगानें घरीं मरण येणें हें वीरास उचित नव्हे. रणांगणावर मृत्यु येण्याचा प्रयत्न करणें हें वीराचें कर्तव्य आहे. याप्रमाणें ते मोठ्या शौर्यानें रणांगणावर जातात व तीं दोन्हीं सैन्यें युद्धाकरितां एकत्र होतात, तेव्हां त्याची शस्त्रास्त्रें व कवचें सूर्यप्रकाशांत चमकत असतांना दिसतात.

मेघगर्जनेप्रमाणें भासणार्‍या वीरांच्या गर्जना आणि काणठळ्या बसविणारीं रणवाद्यें युद्धाच्या आरंभाचा इशारा देतात. कौरव आणि पांडव यांमध्यें आतां मोठे घनघोर युध्द होतें. सर्व वीर आप्तसंबंध विसरून जातात. पिता पुत्रास ओळखीत नाहीं, भाऊ भावास ओळखीत नाहीं, मामा भाच्यास जुमानीत नाहीं किंवा मित्र मित्रास स्मरत नाहीं. रणांगणामध्यें हत्ती भयंकर नाश करतात. आणि रक्तपात सुरू होतो. आतां या वीराचें, तर नंतर त्या वीरांचे द्वंद्वयुध्द सुरू झालेलें दिसतें. केव्हां पांडव तर केव्हां कौरव विजयी होतात, परंतु रात्र पडली कीं सर्व वीर आपापल्या जागीं परत जातात आणि दुसर्‍या दिवशीं सकाळी युद्धाच्या तयारीनें दोन्ही सैन्यें एकत्र जमलीं म्हणजें पुन्हां युद्धास सुरवात होते. भीष्म आणि अर्जुन यांची अनेकदां अनेक वेळीं गांठ पडते व ते इतक्या शौर्यानें लढतात कीं, देव व असुरहि त्याचें युद्धकौतुक पाहत राहतात. परंतु प्रत्येक वेळी कौरवांचें कांही तरी नुकसान होतें, त्यामुळें दुर्योधन भीष्मास पांडवांस फारच सवलत दिल्याबद्दल दोष देतो. तसेंच पांडवांचा नाश झाला असतां कृष्ण अर्जुनास प्रत्यक्ष भीष्माशीं युध्द न केल्याबद्दल दोष देतो. दुर्योधनाचे बरेचसे भाऊ रणांगणांत पडतात. तेव्हां तो पांडवांवर दया दाखविल्याबद्दल पुन्हां भीष्मास दोष देतो. आणि शत्रूचा पराजय करण्यास किंवा कर्णास सैनापत्य देण्यास भीष्मास सांगतो. तेव्हां भीष्म क्रोध आणि दुःख यांनीं व्याप्त होऊन दुसर्‍या दिवशीं शिखंडीखेरीज सर्वांशीं मोठ्या निकरानें युध्द करण्याचें कबूल करतो. तो म्हणतो हे गांधारीपुत्रा, तूं आज सुखानें निद्रा घे. मी उद्यां असा विजय संपादन करतो कीं, जगाच्या अंतापर्यंत तो लोकांच्या स्मरणांत राहील. त्याप्रमाणें युद्धाच्या नवव्या दिवशीं पांडवांचा खरोखरच फार नाश होतो. भीष्म यमाप्रमाणें शत्रुपक्षाचा फडशा पाडीत जातो परंतु अर्जुन भीष्माला पितामह म्हणून मान देऊन युद्धामध्यें त्याबद्दल पुष्कळच आदर व पक्षपात दाखवितो. ही गोष्ट कृष्णाच्या नजरेस येऊन तो त्यास शस्त्र न धरण्याबद्दलच्या प्रतिज्ञेची आठवण करून त्याचें निवारण करतो. भीष्मानें पळवून लाविल्यामुळें पांडवांकडील योध्दे आपल्या शिबिरास परत येतात.

त्या दिवशीं रात्रीं पांडव एकत्र बसून विचार करतात. भीष्मानें शिखंडीबरोबर युध्द करावायचें नाहीं असें ठरविलें असल्यामुळें शिखंडीला भीष्मापुढें उभा करून अर्जुनानें त्याच्या पाठीमागें राहून भीष्मावर बाण सोडावे असें ते ठरवितात. अर्जुनास आपल्या बालपणीं आपण भीष्माच्या मांडीवर कसे खेळत असूं व त्यास तात म्हणून कशी हांक मारीत असूं याचें स्मरण होऊन तो फारच नाखुशीनें वरील गोष्ट कबूल करतो. तथापि कृष्ण भीष्मास मारण्यास फक्त तोच उपाय आहे व आपल्या शत्रूस ठार मारणें हें क्षत्रियाचें कर्तव्यच आहे असें सांगून त्याची समजूत करतो.

याप्रमाणें दहाव्या दिवशीं सकाळी पांडवांच्या सैन्याच्या अग्रभागीं शिखंडीस उभें करण्यांत येतें व कौरवांच्या सैन्याच्या अग्रभागीं भीष्म उभा असतो. भीष्माच्या सभोंवती कौरव व पांडव यामध्यें सर्व दिवसभर युध्द चालतें. दोन्ही पक्षांचे हजारों लोक युद्धांत पडतात. अखेरीस पाठीमागें लपून बसलेल्या अर्जुनासह शिखंडी भीष्मापुढें प्राप्त होतो. तेव्हां भीष्म कोणताहि प्रतिकार न करतां शिखंडीचे बाण हास्यमुखानें आपणाकडें येऊं देतो; परंतु शिखंडीनें कितीहि जोरानें बाण सोडले तरी भीष्मास इजा होत नाहीं. तथापि शिखंडीच्या मागें लपलेला अर्जुन लवकरच भीष्मावर एकामागून एक बाणांचा वर्षाव सुरू करतो तेव्हां शेजारी असलेल्या दुःशासनाकडे वळून भीष्म म्हणतो कीं, यमदूताप्रमाणें माझे प्राण आकर्षण करणारे हे बाण शिखंडीचे नव्हते. हे विषारी सर्पाप्रमाणें माझ्या गात्रांमध्यें जोरानें प्रवेश करणारे बाण शिखंडीचे नसून अर्जुनाचे असले पाहिजेत. तो आपली शक्ति एकवटून अर्जुनावर एक बाण सोडतो, तों अर्जुन त्यास पकडून त्याचे तीन तुकडे करतो. नंतर भीष्म आपलें रक्षण करण्याकरितां ढाल व तलवार घेतो. परंतु अर्जुन त्या ढालीचेहि शतशः तुकडे करून टाकतो. इतक्यात युधिष्ठिर आपल्या सर्व सैनिकांस भीष्मावर हल्ला करण्यास सांगतो. तेव्हां त्या एकाकी उभ्या असलेल्या योध्दयाकडे पांडवांचे सर्व सैनिक जोरानें पुढें सरसावतात. अखेरीस सायंकालच्या सुमारास सूर्य अस्तास जाण्यापूर्वी थोडा वेळ अनेक जखमा होऊन भीष्म आपल्या रथांतून खाली पडतो. तेव्हां त्याच्या अंगाला इतके बाण लागलेले असतात कीं, त्याच्या शरीराचा जमिनीस स्पर्श न होतां तो तसाच शरपंजरी पडतो.

त्यावेळीं पांडवपक्षीय वीरांनां अतिशय आनंद होतो. उलट कौरव सैन्यांत हाहा:कार उडतो. भीष्माच्या मृत्यूमुळें युध्द तहकूब करण्यांत येतें. आणि कौरव व पांडव सर्व मोठ्या आदराने व दुःखानें भीष्माभोंवतीं जमतात. तो त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचें डोकें खालीं लोबत असतें म्हणून तो उशी मागतो. तेव्हां सुंदर सुंदर उशा आणण्यांत येतात परंतु भीष्म स्मितमुखानें त्या नाकरतो. तेव्हा अर्जुन आपल्या भात्यांतून तीन बाण काढून त्यांवर भीष्माचें शिर तोलून धरतो आणि भीष्महि वीरास अशा प्रकारचीच शय्या योग्य असें म्हणून समाधान झाल्याचें दाखवितो. मृत्यूच्या द्वारीं असलेला भीष्म दुर्योधनास मोठ्या कळकळीनें संधि करण्यास सांगतो. तो म्हणतो, माझ्या मृत्यूबरोबर या युद्धाचा शेवट होऊं दे आणि पांडवांबरोबर सख्य कर. परंतु निश्चयानें मृत्यु पावणार्‍या रोग्यास ज्या प्रमाणें औषध आवडत नाहीं त्याप्रमाणें दुर्योधन भीष्माच्या या म्हणण्यास रुकार देत नाहीं.

उध्दट परंतु उदार असा कर्णहि त्या मृत्युशय्येवर पडलेल्या वीरास अभिवादन करण्यास येतो. भीष्महि एका हातानें त्यास आलिंगन देऊन तो कुंतीचा पुत्र व पांडवांचा भ्राता असल्यामुळें त्यास पांडवांशीं संधि करण्यास सांगतो, परंतु कर्ण आपणांस दुर्योधनाशीं निष्कपट राहून रणांगणामध्यें पांडवांशीं वीरास उचित असेंच वर्तन करणें योग्य होय असें म्हणतो व या विरुध्द आपणांस वर्तन करणें अशक्य आहे असें सांगतो. आपले संधि करण्याचे सर्व प्रयत्न निष्फल झालेले पाहून भीष्मास फार दुःख होतें. तथापि कर्णाचें म्हणणें योग्य वाटून तो त्या शूर योध्दयास युद्धाची अनुज्ञा देतो.

भीष्म पतन पावल्यामुळें यापुढें कर्ण युद्धांत सामील होतो, व त्याच्या सूचनेवरून द्रोणास सेनापति नेमण्यांत येतें. त्याच्या धुरीणत्वाखालीं अकराव्या पासून पंधराव्या दिवसापर्यंत युध्द चालतें.

युध्दच्या तेराव्या दिवशीं पांडवांचे एक मोठें नुकसान होतें. अर्जुनाचा तरुण परंतु शूर पुत्र अभिमन्यू शत्रूसैन्यांत फार दूरवर जातो आणि सिंधुराज जयद्रथ याच्यामुळें अभिमन्यु व त्याचे रक्षक यांमध्यें फार अंतर पडतें व दुःशासनाचा पुत्र त्याचा वध करतो. अर्जुन आपल्या पुत्राच्या मृत्यूबद्दल जयद्रथावर सूड उगविण्याचा निश्चय करतो. त्याप्रमाणें चवदाव्या दिवशीं मुख्यतः अर्जुन व जयद्रथ यांचें युध्द होतें व तें सर्व दिवस चालून अखेरीस जयद्रथ मृत्यु पावतो व अर्जुन सूर्यास्तापूर्वी त्याचा वध करून आपली प्रतिज्ञा पूर्ण करतो. याचवेळीं भीम कौरव सैन्यांत धुमाकूळ उडवून धृतराष्ट्राचे अनेक पुत्र ठार मारतो.

परंतु या दिवशीं सूर्यास्त झाल्यानंतरहि युध्द थांबत नाहीं. या दिवशीं दोहोंकडील वीरास इतका त्वेष आलेला असतो कीं काळोख पडला तरी ते दिवे व मशाली यांच्या साहाय्यानें युध्द करीतच राहतात. या दिवशीं अनेक योध्दे मोठमोठे पराक्रम करतात परंतु विशेषतः कर्ण पांडवसैन्यांत फारच प्रलय करतो. अखेरीस कृष्णाच्या सूचनेवरून घटोत्कच राक्षसास कर्णावर पाठविण्यांत येतें. कर्ण त्याबरोबर मोठ्या शौर्यानें युध्द करतो. घटोत्कचहि कौरव सैन्याचा पुष्कळ नाश करून अखेरीस कर्णाच्या हातून मृत्यु पावतो. परंतु मरतांनाहि तो राक्षस कौरवांच्या पुष्कळशा सैन्यास जमिनीवर पडतांना चिरडून टाकतो. भीमपुत्र घटोत्कच याच्या मृत्यूमुळें पांडवांस फार दुःख होतें, परंतु कर्णानें इंद्रापासून प्राप्त झालेली व अर्जुनाकरितां राखून ठेवलेली शक्ति घटोत्कचास मारण्यासाठी उपयोगांत आणल्यामुळें कृष्णास आनंद होतो कारण त्याला हीच गोष्ट पाहिजे होती.

याप्रमाणें दोन्हीहि पक्षांचे सैनिक झोपनें व्याप्त होईपर्यंत युध्द चालू राहतें. फारच थोडे निश्चयी वीर सावधपणें युध्द करीत असतात. पुष्कळसे निद्रा व श्रम यांनी व्याप्त होऊन हत्ती किंवा रथावरच निद्रित होतात. कांहीं झोपेच्या भरांत आपल्या पक्षाकडील लोकांसच मारतात. तेव्हां अर्जुनास दया येऊन तो सर्व योध्दयांस मोठ्या गंभीर आवाजांत निजावयास जाण्याची आज्ञा करतो. त्याचे शत्रूहि ही आज्ञा मोठ्या आनंदानें मान्य करतात आणि याबद्दल देव व मनुष्य त्याचें अभिनंदन करतात, आणि तसेच रणांगणांत हत्ती, घोडे योध्दे वगैरें झोंपी जातात.

याप्रमाणें पहाट होईपर्यंत युध्द चालतें व युद्धाचा पंधरावा दिवस उजाडतो, त्यावेळीं सर्व योध्दे हत्ती, घोडे, रथ यांवरून खालीं उतरून उगवणार्‍या सूर्याची प्रार्थना करतात. याप्रमाणें कांहीं क्षण युध्द थांबून लागलींच पुन्हां सुरू होते. द्रोणाच्या हातून द्रुपद व विराट हे दोन महावीर पडतात. पांडवांकडील वीर द्रोणास मारण्याचा पुष्कळ प्रयत्न करतात परंतु कोणासहि यश येत नाहीं. द्रोण व अर्जुन या गुरुशिष्यांचें मोठें चुरशीचें युध्द होतें परंतु अर्जुन आपल्या गुरूपेक्षां कोणत्याहि बाबतींत कमी नसल्यामुळें या युद्धांत कोणीच हार जात नाहीं. यावेंळी कृष्ण एक युक्ति योजतो. तो भीमाकडून अश्वत्थामा या नांवाच्या एका हत्तीचा वध करवितो आणि द्रोणाजवळ येऊन मोठ्यानें अश्वत्थामा मरण पावला असें पुकारतो. अश्वत्थामा हें द्रोणाच्या पुत्राचेंहि नांव असल्यामुळें त्यास भीति वाटते परंतु त्याचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नाहीं. अखेरीस सत्यवादित्वाबद्दल प्रसिध्द असलेला युधिष्ठिरहि कृष्णाच्या सांगण्यावरून तीच गोष्ट सांगतो. तेव्हां त्यांस तें खरें वाटतें. तो आपलीं शस्त्रास्त्रें टाकून देऊन विचारमग्न स्थितींत उभा राहतो. त्याच क्षणी द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न त्या पंचायशीं वर्षाच्या वृध्द वीराचें शीर धडापासून वेगळें करतो. अर्जुन आपल्या वृध्द गुरूस मारूं नये म्हणून मोठ्यानें ओरडतो परंतु त्याचा कांही उपयोग होत नाहीं., यापूर्वीच धृष्टद्युम्न द्रोणाचें शीर कौरव सैन्यांत फेंकून देतो तेव्हां कौरव वीर भिऊन पळून जातात. अश्वत्थाम्यास आपल्या पित्याच्या मृत्यूची वार्ता यानंतर कळून येते, तेव्हां तो पांचाल व पांडव यांचा सूड घेण्याचा निश्चय करतो.

द्रोणाच्या मृत्यूनंतर कर्णास सैनापत्य मिळतें परंतु त्यास त्या पदाचा फक्त दोनच दिवस उपभोग मिळतो. युद्धाच्या सोळाव्या दिवशीं भीम आणि अश्वत्थामा, अर्जुन व कर्ण हे फार मोठे पराक्रम करतात; परंतु त्यांचा युद्धाचा शेवट लावण्याचा कामीं फारसा उपयोग होत नाहीं. सतराव्या दिवशीं कर्ण मद्रदेशाचा राजा शल्य यानें आपलें सारथ्य करावें अशी इच्छा प्रदर्शित करतो. कारण अर्जुनाला कृष्णासारखा उत्तम सारथी असल्यामुळें तसा सारथी मिळाल्याखेरीज कर्णास अर्जुनाची बरोबरी करणें शक्य नव्हतें. प्रथमतः शल्य हीन कुलांतील मनुष्याचें सारथ्य करण्याचें नाकारतो. परंतु कर्णासमोर आपणांस वाटेल तें भाषण करण्याची मुभा मिळावी या अटीवर तो कबूल होतो व या सवलतीचा पूर्ण फायदा घेतो. कर्णाचें सारथ्य करीत असतां तो त्याची अतिशय निंदा करतो. कर्णहि शल्याचें राष्ट्र जें मद्र त्यांतील लोक असत्यभाषी, ढोंगी, मद्यपी, अनीतिमान व व्यभिचारी आहेत म्हणून निंदा करतो. उलट कर्णाच्या राज्यांतील अंग लोक आपल्या बायकामुलांचा विक्रय करतात म्हणून शल्य कर्णास दूषण लावतो. अखेरीस दुर्योधन त्या दोघांची समजूत करतो व ते रणांगणावर जातात.

अर्जुन कर्णाशीं लगट करण्याचा प्रयत्न करीत असतां भीम धृतराष्ट्राच्या पुत्रांमध्यें खूप कोलाहल माजवितो व त्यांपैकी पुष्कळांस ठार मारतो. आपल्या अजस्त्र गदेच्या प्रहारानें दुःशासनाला रथावरून खालीं पाडून तो त्याच्यावर उडी मारून बसतो आणि त्याचें ऊर फोडून आपल्या प्रतिज्ञेप्रमाणें त्याचें रक्त प्राशन करतो. हें भयंकर कृत्य पाहून त्याचे शत्रू भयानें कंपित होऊन पळून जातात. इतक्यांत अर्जुन व कर्ण यांची गांठ पडून दोघांमध्यें भयंकर युध्द होतें. त्या युध्दंत इंद्र अर्जुनास व सूर्य कर्णास मदत करतात. आपल्या भयंकर सुळ्यांनीं एकमेकांस फाडणार्‍या रानटी हत्तीप्रमाणें ते वीर एकमेकांवर बाणांचा वर्षाव करतात. अर्जुन कर्णास चीत करण्याचा पुष्कळ प्रयत्न करतो परंतु त्यास यश येत नाहीं. इतक्यांत कर्णाच्या रथाचें एक चाक जमिनींत रुततें तेव्हां कर्ण तें चाक वर ओढण्याचा प्रयत्न करीत असतां तो युध्दनीतिप्रमाणें थोडा वेळ युध्द थांबविण्यास सांगतो परंतु कृष्ण अर्जुनास तिकडे मुळींच लक्ष न देण्यास सांगतो व नेहमीं धर्मयुध्द करणारा अर्जुन, कर्ण रथचक्र वर काढण्याचा प्रयत्न करीत असतां त्यास कपटानें मारतो. तेव्हां कर्णाच्या शरीरांतून एक प्रकारचें तेज बाहेर येऊन त्याची शरीरकांति मृत्यूनंतरहि तशीच राहते.

यावेळीं पाडंवांच्या सैन्यामध्यें फार आनंद होतो परंतु कौरव भीतीनें पळून जातात.

दुर्योधन मोठ्या मुष्कीलीनें आपल्या सैन्यास गोळा करून त्यांच्यामध्यें युद्धाकरितां उत्साह उत्पन्न करतो. अठराव्या दिवशीं शल्य सैनापत्य करतो. त्याच्याशीं युधिष्ठिर द्वंद्वयुध्द करून मध्यान्हाच्या सुमारास त्याचा वध करतो. तेव्हां सर्व कौरव पळून जतात; फक्त दुर्योधन व शकुनी मूठभर लोकांसह युध्द चालू ठेवतात. सहदेव शकुनीचा वध करतो. अर्जुन व भीम भयंकर संहार करतात, व सर्व कौरव सैन्याचा पूर्णपणें विध्वंस होतो.

दुर्योधन एकटाच पळून जाऊन एका तळ्यांत लपून बसतो. त्याखेरीज कृतवर्मा, कृप आणि अश्वत्थामा इतकेच जिंवत राहतात. यावेळीं सूर्य अस्तास जातो, व कौरवांचा तळ उजाड व भयाण दिसतो. पांडव अखेरीस पळून गेलेल्या दुर्योधनास शोधून काढतात. युधिष्ठिर त्यास द्वंद्वयुद्धास आव्हान करतो. दुर्योधन आपणास सकाळपर्यंत युध्द करतां येणार नाहीं व आपण येथें भीतीमुळें आलों नसून श्रमामुळें विश्रांतिकरितां आलों आहों असें सांगतो. परंतु युधिष्ठिर ताबडतोब युध्द झालें पाहिजे असें म्हणतो व आपणांपैकी एकासहि ठार मारल्यास त्यास राज्य मिळेल असें सांगतो. अखेरीस दुर्योधन व भीम यांमध्यें द्वंद्वयुध्द व्हावें असें ठरतें व त्याप्रमाणें दोघेहि गदायुद्धास आरंभ करतात. कृष्णाचा भाऊ बलदेव हाहि यात्रेला गेलेला असतो तो त्याच सुमारास परत येतो, व द्वंदयुध्द पाहण्यास थांबतो. देवहि तो युध्द चमत्कार मोठ्या कौतुकानें पाहतात. ज्याप्रमाणें झोंबी खेळणारे दोन बैल एकमेकांस शिंगांनीं धडका देतात त्याप्रमाणें ते दोन वीर एकमेकांवर गदेचे प्रहार करतात. दोघांच्याहि शरीरांतून रक्तप्रवाह चालू असतां ते आपलें युध्द चालूच ठेवतात. एखाद्या मांसाच्या तुकड्याकरितां ज्याप्रमाणें गंदानीं ते एकमेकांस विध्द करतात. दोघेहि शौर्याची कमाल करतात व युद्धाचा शेवट अनिश्चितच राहतो. तेव्हां कृष्ण अर्जुनाजवळ म्हणतो कीं, भीम जरी दुर्योधनापेक्षां अधिक शक्तिमान असला तरी दुर्योधन हा अधिक कुशल असल्यामुळें भीमाला सरळ युद्धामध्यें केव्हांहि यश यावयाचें नाहीं. तसेंच भीमानें दुर्योधनाची मांडी चूर्ण करण्याची प्रतिज्ञा केल्याची त्यास आठवण देतो. तेव्हां अर्जुन भीमासमोर आपल्या मांडीवर थाप मारतो. भीमाच्या लक्षांत ती खूण येते. व दुर्योधन प्रहार करण्याकरितां उडी मारीत असतां भीम त्याच्या मांडीवर आघात करतो. तेव्हां एखादें झाड उपटून पडावें त्याप्रमाणें तो जमिनीवर कोसळतो. परंतु ते युध्द पाहत असलेला बलदेव रागानें आपल्या रथांत बसून निघून जातो, आणि भीम हा कपटानें युध्द करणारा व दुर्योधन हा धर्मानें युध्द करणारा अशी यांचीं नांवे जगांत राहतील असें म्हणतो.

नंतर युधिष्ठिर कृष्णाला हस्तिनापुरास धृतराष्ट्र व गांधारी यांचें सांत्वन करण्यास पाठवितो व कृष्णहि आपल्या शक्तीप्रमाणें तें कार्य करतो. पांडव ती रात्र शिबिराच्या बाहेर एका नदीवर घालविण्याचें ठरवितात.

अश्वत्थामा व त्याचे सोबती यांस दुर्योधनाच्या पतनाची बातमी कळल्याबरोबर ते त्या ठिकाणीं येऊन त्या मांडी मोडून पडलेल्या वीराकरितां दुःख करतात. परंतु अश्वत्थामा पांडवांचा नाश करण्याची प्रतिज्ञा करतो व दुर्योधन त्यास सेनापति नेमतो.