प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.

(१) भारतीय संस्कृतीच्या लोकांचा व अपसृष्टांचा हिशोब :- भारतीय संस्कृतीच्या छत्राखालीं असलेल्या भागांतील बौद्धसंप्रदायी लोक, शैववैष्णवादि लोक आणि भारतीयांपैकींच जे निरनिराळ्या ठिकाणीं पसरले आहेत असे सर्व लोक आणि हिंदुस्थानांतील बाह्य जातींचे किंवा बाह्य संप्रदायांचे अनुयायी वगळून उरलेले सर्व लोक हे भारतीय संस्कृतीच्या छत्राखालील लोक समजावेत. जगांतील निम्याहून अधिक लोकसंख्या या वर्गांत येईल. भारतीय वंशाचे अथवा जातीचे असलेले परंतु भारतीय संस्कृतीपासून अपसृष्ट झालेले अशा लोकांचा हिशोब घेतां ब्रिटिश हिंदुस्थानांतील सहा कोटी सहासष्ट लक्ष मुसुलमान, व सुमारें छत्तिस लक्ष ख्रिस्ती आणि दहा लक्ष जिप्सी मिळून सुमारें सातकोटी बारालक्ष इतक्या लोकांचा या वर्गांत अंतर्भाव होतो. अफगाणिस्तान म्हणजे प्राचीन गांधार व वाहीक अगर बाल्हीक येथील लोक व तसेंच फ्रेंच आणि पोर्तुगीज सरकारच्या भारतीय प्रदेशांतील ख्रिस्ती हे वरील हिशोबांत मिळविले तर लोकसंख्या पन्नास लक्षांनीं अधिक वाढून एकंदर अपसृष्टांची संख्या सातकोटी बासष्ट लक्षांवर जाईल. ज्या जनतेंतून इतका वर्ग बाहेर  पडला ती जनता म्हटली म्हणजे हिंदुस्थानांतील ब्रिटिश छत्राखालीं असलेले चोवीस कोटीहून अधिक हिंदू आणि ब्रिटिश छत्राखालीं नसलेले सुमारें पन्नास लक्ष हिंदू आणि हिंदुस्थानाबाहेर गेलेले सुमारें वीस लक्ष हिंदू मिळून सुमारे पंचवीस कोटी हिंदूंचे आणि सात कोटी अपसृष्टांचे पूर्वज होत. यावरून सरासरी दर बत्तीस माणसांतील सात लोक अपसृष्ट आहेत असें स्थूल प्रमाण निघतें.

हिंदुस्थानांतील एकंदर सुमारें ३१ कोट लोकसंख्येपैकीं चोवीस कोटींवर लोक हिंदू आहेत, साडेसहा कोटींपेक्षां अधिक मुसुलमान आहेत, आणि अडतीस लक्षांवर ख्रिस्ती आहेत, एक लाखाहून थोडेसे अधिक पारशी आहेत आणि एकवीस हजार यहुदी आहेत. ख्रिस्ती लोकांपैकीं सुमारें दोन लक्ष ख्रिस्ती यूरोपीय आहेत, एक लक्षावर मिश्र ख्रिस्ती आहेत आणि उरलेले ख्रिस्ती म्हणजे सुमारें छत्तीस लक्ष देश्य आहेत. अशा विविध लोकसंख्येमध्यें हिंदूंचें प्राबल्य अजूनहि आहे.

हिंदूंची संख्या कमी कमी होत जाऊन परकीय संप्रदायांची वाढ होण्याचा प्रकार व तदंतर्गत  भवितव्यता टाळण्यासाठीं हिंदूंमध्यें अनेक चळवळी सुरू होऊन जे विविधजातिसंग्राहक समाज स्थापन झाले त्यांमध्यें आर्यसमाज हा प्रमुख होय. हिंदुसंस्कृतिसंकोचार्थ होणार्‍या प्रयत्‍नांशीं तुलना करण्याजोगा दिर्घ प्रयत्‍न हिंदुत्वरक्षणपरांकडून अजून झालेला नाहीं. ब्रह्मसमाज, हिंदु मिशनरी सोसायटी यांचें या बाबतींतील कार्य फारच अल्प आहे. मराठे जातींमध्यें ख्रिस्ती लोकांस मराठे करून घेण्याची चळवळ अहमदनगरचे सयाजी पाटील यांनीं सुरू केली आहे. तसेंच वर्धा येथील मराठ्यांच्या परिषदेंत इतरांस मराठे करावें याबद्दल ठरावहि पास झाला आहे. या प्रयत्‍नांकडे अभिमानी हिंदूंचें लक्ष लागलें आहे. २१ मार्च १९२० रोजीं ज्ञानकोशाच्या उपसंपादिका कुमारी ईडिथ कोहन यांस निरूढ व्राट्यस्तोम विधीनें हिंदु समाजांत घेतलें हा जुन्या संस्थेच्या पुनरुद्धाराचा निराळा एक प्रयत्‍न होय.