प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.

मानववंशशास्त्र :— या शास्त्राचें ध्येय मनुष्यांच्या आज अस्तित्वांत असलेल्या अनेक जातींची पहणी करून त्यांचें वंशवृद्धिबोधक वर्गीकरण करणें. मनुष्यप्राणी विकास पावल्यानंतर आणि त्याचा कांहींसा मोठा जमाव झाल्यानंतर भक्ष्यशोधार्थ म्हणा कीं अन्य कारणार्थ म्हणा त्याच्या टोळ्या इतस्ततः भ्रमण करूं लागल्या. दोन टोळ्यांमध्यें जसजसें प्रादेशिक अंतर पडे, तसतसें त्यांच्यामध्यें भाषाविषयक, आचारविषयक, खाद्यपेयविषयक, वस्त्रविषयक, भूषणविषयक अंतर पडत जाई. यामुळेंच विविध संस्कृति जन्मास आल्या. मानववंशशास्त्राचें हें ध्येय आहे कीं, मनुष्यांच्या टोळ्या तपासून आणि उपर्युक्त दृष्टींनीं त्यांचें वर्गीकरण करून त्यांच्या प्रसाराचा व भिन्नीकरणाचा इतिहास लावणें. या मानववंशशास्त्रासंबंधानें पाश्चात्यांत दोन शब्द प्रचारांत आहेत, एक शब्द अनथ्रोपॉलॉजी (Anthropology) 'मानवशास्त्र' आणि दुसरा शब्द एथनॉलॉजी (Ethnology) 'वंशशास्त्र'. हे दोन शब्द शास्त्रज्ञांच्या स्थानभेदामुळें उत्पन्न झाले आहेत आणि दोन्ही शब्द कायम राखून प्रत्येकास कांहींतरी अभ्यासक्षेत्र वांटून देण्याची निरर्थक तडजोड सध्यां चालू आहे. आपण मानववंशशास्त्र हा एकच शब्द वापरूं आणि वर सांगितलेले दोन्ही शब्द गुंडाळून ठेवूं.

मानववंशशास्त्र व मानवेतिहास हें फार मोठें शास्त्र झालें. याला साहाय्यक अशीं अनेक शास्त्रें अस्तित्वांत आलीं आहेत. एक भाषाशास्त्र घ्या. निरनिराळ्या जाती व राष्ट्रें निरनिराळ्या भाषा बोलतात. त्यांपैकीं कांहीं भाषा इतर भाषांपेक्षां परस्परांशीं अधिक सदृश असतात. हें सादृश्य दोन तर्‍हेचें असतें. एक भाषान्तर्गत शब्दांचें सादृश्य आणि दुसरें भाषेच्या अन्तर्रचनेचें म्हणजे व्याकरणाचें सादृश्य. या दोन सादृश्यांनां यूरोपीयांनीं आज दोन निरनिराळीं नावें दिलीं आहेत. 'फिलालॉजी' (Philology) म्हणजे शब्दशास्त्र व 'लिंग्वस्टिक्स्' (Linguistics) म्हणजे भाषाशास्त्र अथवा निरनिराळ्या भाषांतील व्याकरणांचें शास्त्र. यास प्रसंगीं तौलनिक व्याकरण म्हणजे 'कंपॅरटिव्ह ग्रामर' (Comparative Grammar) असेंहि म्हणतात. वेदाच्या अभ्यासास हीं दोन्हीं शास्त्रें उपयोगिलीं गेलीं आहेत.

मानववंशशास्त्रामध्यें शोध करण्यासाठीं जें साहित्य जमा झालें त्याचें एक अंग म्हटलें म्हणजे मनुष्याचें शरीरस्वरूप होय. शरीरस्वरूपावरून मनुष्याचें वर्गीकरण करून त्यांतील मोठ्या फरकांवरून मोठे समुच्चय आणि लहान फरकांवरून लहान समुच्चय बसविले आहेत. मोठ्या फरकांवरून मनुष्यांचें आद्य दूरीकरण अनुमानावयाचें आणि लहान फरकांवरून उत्तरकालीन दूरूकरणें अनुमानावयाचीं अशी सामान्य कल्पना मनांत धरून मनुष्यांच्या शारीरिक फरकांच्या अभ्यासास आणि तज्जन्य वर्गीकरणास ऐतिहासिक अर्थ व महत्त्व दिलीं गेलीं आहेत. 'आर्यन' लोकांचा मूलगृहकाल आणि त्यांचें मूलगृहस्थान शोधण्यासाठीं जी खटपट चालू आहे, त्या खटपटीचा हेतू हाच कीं, मनुष्याच्या निरनिराळ्या जातींचें जें दूरीभवन झालें त्या दूरीभवनाचा इतिहास सांपडावा. हा इतिहास शोधण्यांत शारीरिक स्वरूप, भाषा, दैवतें, समजुती, आचार आणि पुराणकालीन कथा या सर्वांचा उपयोग केला आहे.