प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.

भारतांतील संप्रदायांचें सामान्य स्वरूप.- आतां येथील संप्रदाय व त्यांचें सामान्यस्वरूप या प्रश्नाकडे वळूं. हिंदुस्थानामध्यें सामाजिक गोष्टी आणि पारमार्थिक विचार यांची भिन्नता ज्यांत ठेवली गेली नाहीं असें कांहीं संप्रदाय उत्पन्न झाले आणि ते संप्रदाय बर्‍याचशा सामाजिक चळवळीस कारण झाले. या चळवळीमुळें समाजाचें रूप विशेष बदललें असें नाहीं; तथापि कांहीं कालापर्यंत त्यांनीं बराच उपद्व्याप केला ही गोष्ट खरी आहे. आतां जे संप्रदाय हिंदुस्थानांतीलच अथवा देश्य आहेत त्या संप्रदायांपासून समाजघटनेस फारशी भीती नाहीं, पण मुसुलमानी आणि ख्रिस्ती हे जे परकीय संप्रदाय आहेत त्यांच्यापासून मात्र कांहीं दिवस तरी त्रास होईल. भारतीय समाजाचें ऐक्य बिघडविण्यास हे संप्रदाय जसे कारण झाले तसे ते आज जागतिक ऐक्य बिघडविण्यास कारण झालेले आहेत. हिंदुस्थानांतील सामाजिक  परिस्थिति तर त्यांनी फारच बिकट केली आहे तरी या संप्रदायांचें अनिष्ट स्वरूप  हिंदुस्थानांतच नाहींसें होऊन सर्व जगाचा प्रश्न त्यामुळें सुटेल असा भरवंसा वाटतो. याचें सविस्तर विवेचन पुढें येईल. तथापि तें समजणें सुकर व्हावें यासाठीं संप्रदायांच्या घटनेचें स्वरूप आणि घटनेच्या विशिष्टत्वामुळें स्वाभाविकपणें घडून येणारा त्यांचा इतिहास कांहीं सुत्रांत वर्णिला पाहिजे.

येथें हें पुनरुक्तीनें सांगितलें पाहिजे कीं, हिंदू, ख्रिस्ती आणि मुसुलमान हे सदृश समूह नाहींत; आणि ख्रिस्ती व मुसुलमान समाजांशीं सदृश असा जर मनुष्यवर्ग हिंदुसमाजांत असेल तर तो हिंदूंतील संप्रदाय होय. हिंदूसमाज आणि तदंतर्गत संप्रदाय यांमध्यें जें नातें आहे तेंच सर्व जग आणि ख्रिस्ती व मुसुलमान समाज यांमध्यें आहे. हिंदुस्थांनांतील संप्रदायांचें सामान्य स्वरूप असें आहे कीं एखादा गुरू विशिष्ट दैवत किंवा उपासनापद्धति प्रचांरात आंणू पाहतो आणि उपदेशितो व शिष्य गोळा करितो. त्यामुळें मतें आणि माणसें मिळून जें काहीं एक बनतें त्यास संप्रदाय असें म्हणतात. संप्रदायसंस्थापक गुरु परमेश्वराशीं इतर माणसांपेक्षां आपलें कांही विशेष सलगीचें नातें आहे असें भासवितो. निदान आपल्या अनुयायांची अशी समजूत करून देतो कीं, सामान्य जनांपेक्षां कांहीं बाबतींत ज्ञानानें म्हणजे अतींद्रिय ज्ञानानें आपण श्रेष्ठ आहों.  हे संप्रदाय मतप्रसार आणि उपास्यप्रसार यांचे अभिमानी असतात. कां कीं त्यांस आपला अनुयायी वर्ग वाढवावयाचा असतो. ब्राम्हणांस प्रचारकार्याची फारशी फिकीर नसते याचें कारण त्यांचें उत्पन्न विधिसंस्कारासारख्या प्रत्येक मनुष्यास कर्तव्य अशा बाबतींवर अवलंबून असतें. संप्रदांयांच्या गुरूंची गोष्ट अशी नाहीं. त्यांचें उत्पन्न शिष्यवर्गाच्या संख्याधिक्यावरच अवलंबून असतें. या कारणानें अनेक प्रसंगीं हे संप्रदाय सामाजिक दृष्टीनें इतरांपासून आपलें भिन्नत्व स्थापूं पहातात,
आणि आपआपसांत अधिक बंधुभाव उत्पन्न व्हावा आणि संप्रदायांतर्गत व्यक्तीचा आपल्या  जातीकडे ओढा कमी व्हावा यासाठीं प्रयत्‍न करितात. पुष्काळदां त्यांनीं बाहेरच्यांशीं लग्नव्यवहारहि बंद केले आहेत. मद्रासकडे वैष्णवांमध्यें वेदशाखेचें लग्नव्यवहारांत महत्त्व नसून हा वैष्णव आहे कीं नाहीं हें पहातात.  जर संप्रदायामध्यें आणि संप्रदायाबाहेर असलेल्या लोकांमध्यें लग्नव्यवहार बंद पडला तर संप्रदाय ही स्वतंत्र जात होऊं पहाते. कित्येक संप्रदायांमध्यें संप्रदायांचें सामाजिक पृथक्त्व इतरांपेक्षां अधिक असतें आणि कित्येकांमध्यें कमी असतें. कांही संप्रदाय उपासनेपुरत्या एकत्र होणार्‍या निरनिराळ्या जातींच्या लोकांचे संघ आहेत. असे संप्रदाय लोकांस फारसे अप्रिय होत नाहींत आणि त्या संप्रदयांचीं तत्त्वें सर्वसामान्य समाजांत सहज प्रविष्ट होतात. पुष्कळशा संप्रदायांमध्यें ब्राह्मणांचें अस्तित्व फारच कमी असतें. कां कीं एका गुरूचें अचल शिष्यत्व आणि गुरूचें स्तोम आणि गुरूचें देवत्वधारण इत्यादि सोंगांनीं पुष्कळ संप्रदाय व्यापिले गेले आहेत व असल्या संप्रदायांमध्यें सुशिक्षितवर्ग फारसा शिरणें शक्य नाहीं. अजाण कुणबी, भोळ्या बायका, यांवर अशा संप्रदायांचें अस्तित्व अवलंबून असतें. हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, संप्रदाय स्थापून समाजांत कांहीं निराळी खळबळ उत्पन्न करणें हें काम बहुधा ब्राह्मणांनीच केलेलें आहे. बौद्ध व जैन संप्रदाय वगळतां बहुतेक संप्रदायांचें संस्थापक ब्राह्मणच आहेत. या संप्रदायांनीं हिंदुस्थानचें फारसें हित केलें असें म्हणतां येत नाहीं. ब्राह्मण समाजाची सर्वसाधारण प्रवृत्ति संप्रदायांच्या संवर्धनास उत्तेजक नसून विरुद्धच होती. याचें कारण असें आहे कीं, एखादें विशिष्ट तात्त्विक मत किंवा विशेष व्यक्तीवर असलेली श्रद्धा यासारख्या अनित्य व दुर्बल पायावर समाजांतील एखाद्या व्यक्तीनें (गुरूनें) अथवा वर्गानें एक जात बनविण्याचा प्रयत्‍न करावा आणि आपलें व्यक्तीपुरतें अगर वर्गापुरतें हित साध्य करून घेण्यासाठीं समाजामध्यें अराजक माजवावें हें समाजास हितावह नाहीं ही जाणीव ब्राह्मणसमाजास होती संप्रदायास विरोध आणि मतास विरोध या गोष्टींमधील पृथक्त्व लक्षांत आणिलें पाहिजे. ब्राह्मणांचीच केवळ नव्हे, तर सर्वसामान्य हिंदूंची अशी प्रवृत्ति असे कीं, वादविवादाच्या बाबतींत अत्यन्त मोकळेपणा रक्षावयाचा आणि नवीन मतें वगैरेंस उत्तेजन द्यावयाचें, तथापि जेव्हां मतसत्यत्वस्थापनेपलीकडे किंवा उपास्याच्या उपासनेपलीकडे सामाजिक खटपटी होऊं लागतील आणि लोकांपासून पृथक् राहणारा असा जनसमूह निर्माण होऊं लागेल तेव्हां त्याच्याविरुद्ध जावयाचें.

मोकळेपणानें वादविवादास उत्तेजन न देणारा असा वर्ग जर असेल तर तो वर्ग संप्रदायांचाच होय. कां कीं, संप्रदायांचें अस्तित्वच विशिष्टमतांवर अवलंबून असतें. उलटपक्षीं मनुष्याचें जातिरूपी समाजांतील स्थान कोणत्याहि विशिष्ट मतावर अवलंबून नसतें किंवा जातींचे अस्तित्वहि कोणत्याच मतावर अवलंबून नसतें आणि त्यामुळें कितीहि भिन्नभिन्न मतें निघालीं तरी जातींचे एकत्व हें राहतेंच. संप्रदायांचें असें नाहीं. विशिष्टमतांवर किंवा उपास्यांवर त्यांचें अस्तित्व अवलंबून असल्यामुळें तीं मतें किंवा उपास्यें दुर्बळ झालीं तर संप्रदायाचें अस्तित्वच नाहीसें होणार अशी संप्रदायवाल्यांस धास्ती वाटत असते आणि त्यामुळें संप्रदायांमध्यें विरुद्ध मतांविषयीं असहिष्णुता फारच वाढते. ख्रिस्ती आणि मुसुलमान संप्रदायांच्या इतिहासांत विचारविषयक असहिष्णुतेमुळें जे रक्तपात आणि भिन्नमतवाल्यांस जिंवत जाळणें इत्यादि प्रकार घडले त्यांचें बीज हेंच आहे. ख्रिस्त्यांनीं परमतासहिष्णुतेमुळें माणसें जाळलीं आणि आम्हीं हिंदूंनीं तसें कांहीं केले नाहीं म्हणून ख्रिस्त्यांस निंदावयास नको व हिंदूंस वंदावयास नको. दोघांची समाजघटना भिन्न असल्यामुळें हे भिन्न परिणाम झाले. ख्रिस्त्यांमध्यें अनेक पंथ आहेत, हिंदूंत अनेक संप्रदाय आहेत. एवढें या दोघांत साम्य आहे. पण या साम्याबरोबर एक महत्त्वाचा भेद आहे तो असा कीं, प्रत्येक ख्रिस्ती कोणत्या तरी पंथाचा असतो पण हिंदु कोणत्या तरी संप्रदांयात आहेच असें नाहीं. हिंदूंच्या बाबतींत असें होतें कीं, आज याचें हें मत आहे तर उद्यां निराळें आहे. आज हा एकादशी करील, उद्यां शिवरात्रहि करील. कोणत्याहि विशिष्ट मतास अगर संप्रदायास न बांधला गेल्यामुळें तो स्वतंत्र आहे. ख्रिस्त्याचें तसें नाहीं. तो कांहीं बर्‍यावाईट कल्पनांनां बांधला गेला आहे. येथें हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे किं, विशिष्ट विचारांनीं बद्ध रहाण्यावर संप्रदायांत स्थान असावयाचें या परिस्थितीनें सामान्य ख्रिस्त्याचे मोठे हाल होतात असें नाहीं; आणि पिढ्यान् पिढ्या विशिष्ट कल्पनांनां बांधलें जाणारें व नवीन कल्पनांशीं असंबद्ध असणारें ख्रिस्ती डोकें म्हणजे कांहीं विलक्षण बनावटीचें आहे अशांतला भाग नाहीं. नवीन मतें ग्रहण करणारा ख्रिस्ती कोणत्या तरी एका संप्रदायास चिकटून राहतो एवढेंच. संप्रदायाचें एक विशिष्ट मत असतें, तो त्या संप्रदायाचा सदस्य असतो; आणि लौकिक कारणासाठीं त्यास चिकटून असतो.

हिंदूंपैकीं प्रत्येकास मी अमुक पंथाचा असें जरी सांगतां येणार नाहीं तरी विशिष्ट संप्रदायांतर्गत मनुष्यास आपण कोणत्या पंथांत आहों हें सांगता येईल. मी निंबार्कपंथी आहें किंवा रामानुजपंथी आहें हें वैष्णव सांगूं शकेल, मी श्वेतांबर आहें कीं दिगंबर आहें हें जैन सांगूं शकेल आणि मी आदिब्रह्मो आहें कीं साधरण ब्रह्मो आहें हें कोणीहि ब्रह्मो सांगूं शकेल. संप्रदायांत जेव्हां फूट पडते तेव्हां कांहीं माणसें इकडे जातात व कांहीं तिकडे जातात. आणि त्यामुळें प्रत्येक व्यक्ति संप्रदायांर्गत कोणत्या तरी पंथांत जाऊन पडतेच. संप्रदायांतर्गत व्यक्ति कोणत्या तरी संप्रदायांर्गत पंथांत पडणें ही गोष्ट सहज शक्य होते तशी कोणत्याहि विशिष्ट संप्रदायाचा नव्यानें अंगीकार करणें ही गोष्ट होत नाहीं.

संप्रदाय अशिष्ट असतां संग्राहक असतात ते शिष्ट झाले असतां त्यांची संग्राहकता कमी होते. जे संप्रदाय आपलें पृथक् सामाजिक अस्तित्व स्थापूं पहातात त्या संप्रदायांवर मोठेपणाचा किंवा हलकेपणाचा शिक्का बसतो. अमेरिकेंत आपणास दिसतें कीं ज्या संप्रदायाच्या मंदिराच्या बाहेर जास्त मोटारगाड्या दिसतात त्या संप्रदायाचे अनुयायी व्हावें असें पुष्कळ लोकांस वाटतें. याप्रमाणें एकाच ख्रिस्ती जातींतील लोकांमध्यें केवळ सदस्यांच्या पैशाच्या थैलीवरून संप्रदायमहत्त्व किंवा संप्रदायनीचत्त्व जर कांहीं लोकांच्या दृष्टीनें स्थापन होतें तर ज्या भारतासारख्या देशांत निरनिराळ्या सामाजिक पायरीच्या अनेक जाती आहेत आणि जेथें एकदां आलेलें उच्चनीचत्व बरेंच वर्षें टिकणारें असतें तेथें लौकिक हेतूंचे परिणाम संप्रदायाच्या वृद्धीवर आणि क्षयावर आणि त्याचप्रमाणें संप्रदायाच्या कार्यकारी नीतिसूत्रांवर झाल्याशिवाय कसे राहतील ? येथें ज्या संप्रदायांमध्यें कनिष्ठ जातींचा भरणा होतो ते संप्रदाय खालची पदवी पावतात. तसेच अत्यन्त खालच्या पदवीचे लोक आपणास समाजांत कांहीं तरी स्थान मिळावें म्हणून कोणत्या तरी संप्रदायांत घुसूं पहातात. जेव्हां संप्रदायांस हा अनुभव येऊं लागतो तेव्हां आपली उच्चता कमी होऊं नये म्हणून ते आपणांत नवीन माणसें घेणें बंद करितात. जैन लोक, लिंगायत आणि महानुभाव या मंडळींनीं आपल्या संप्रदायाचा प्रचार करणें सोडून दिलें आहे. अलीकडे कांही जैन लोक कांसारांमध्यें आपला संप्रदाय वाढविण्याची खटपट करीत आहेत. ते आपला संप्रदाय वाढविण्याकरितां ज्या युक्त्या करीत आहेत त्यांतील एक अशी आहे कीं, ते कांसारांनां सांगतात कीं, तुम्ही कांसार पूर्वीं जैनच होतां, पण तुम्ही जैन धर्म सोडले आणि व्रतें विसरलां त्यामुळें हिंदू झालां. महाराष्ट्रांत ही मतप्रचारार्थ खटपट असण्याचें एक विशेष कारण असें आहे कीं या कांसारांपैकीं कांहीं वर्ग जैनच आहे आणि त्यांच्यांत व जैनेतर कासारांत लग्नव्यवहार चालू आहे.

पुष्कळदां युरोपांतील ज्यू हे ख्रिस्ती लोकांस ज्यू करून घेतात, तथापि ते वाटेल त्यास ज्यू करून घेतील असें वाटत नाहीं. यांनीं नीग्रोला कधीं ज्यू बनविल्याचें ऐकिवांत नाहीं.

पारशी लोकांनींहि भरतखंडांत आपल्या झरथुष्ट्र संप्रदायामध्यें कांहीं हिंदू लोकांस घेण्याचा प्रथम प्रयत्‍न केला, पण जेव्हां घरकाम करणारे नोकर किंवा अस्पृश्य जाती यांशिवाय कोणी हिंदु त्यांच्या संप्रदायांत शिरत नाहीं असें त्यांस आढळून आलें तेव्हां त्यांनीं हें संप्रदायसंवर्धनाचें काम बंद ठेवलें, असें पारशी आचार्य डॉ. ढालानें आपल्या ग्रंथांत म्हटलें आहे.

जाती आणि संप्रदाय यांच्यामध्यें सादृश्य आहे. संप्रदाय म्हणजे नवीन सदस्य घेणारी 'जात' असें म्हणतां येईल. जे संप्रदाय पूर्वीं आपला प्रचार करीत होते ते त्यावेळीं उघड्या तोंडाच्या जातीसारखेच होते. तथापि आतां त्यांची परजनसंग्राहकता बंद झाल्यामुळें ते खर्‍याखुर्‍या म्हणजे बंद तोंडाच्या जातीच बनले आहेत. ख्रिस्त्यांमध्यें देखील जातिस्वरूप थोडेंबहुत येऊं पहात आहे. उमरावती येथील एका सुशिक्षित महारानें डॉ. केतकर यांस असें सांगितलें कीं, ख्रिस्ती मिशनरी महार आणि ख्रिस्ती हे एकच आहेत असें अडाणी महारांस भासवितात आणि महारांची सहानभूति कमी न व्हावी म्हणून महार ज्यांस हलके समजतात त्या मांगांस ख्रिस्ती करीत नाहींत.

येथवर सांप्रतच्या भारतीय हिंदुसमाजाचें निरिक्षण करून तदंतर्गत संप्रदायांचें स्वरूप, ख्रिस्ती व मुसुलमान समाजांपासून हिंदुसमाजाची भिन्नता इत्यादि गोष्टींचें विवरण केलें. हिंदु समाजाची संस्कृति म्हणजे भारतीय संस्कृति. हिलाच आर्य संस्कृति असें नांव आहे. या आर्य संस्कृतीचा अथवा भारतीय संस्कृतीचा इतर संस्कृतींशीं संबंध येऊन ज्या घडामोडी झाल्या त्यांजकडे वळणें आतां इष्ट आहे.