प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
तौलनिक दैवतशास्त्र व दैवतेतिहास :— वेदाभ्यासासाठीं उपयोगास आणलेलें दुसरें एक महत्त्वाचें शास्त्र म्हटलें म्हणजे 'तौलनिक दैवतशास्त्र व दैवतेतिहास' हें होय.
शास्त्र व इतिहास या दोन शब्दांची दुक्कल येथें ठेवण्याचें कारण हे दोन अभ्यास विशेष परस्परावलंबी व अन्योन्याश्रयी आहेत हें होय. पूर्वेतिहास केवळ तुलना करून काढावयाचा असतो म्हणजे दैवतेतिहासार्थ अत्यंत प्राचीन काळापर्यंत गेलें तर दैवतांच्या सादृश्याखेरीज अर्थांत् तौलनिक दैवतशास्त्राखेरीज दुसरें साधन नसतें; आणि दैवतांच्या तुलनेचा म्हणजे दैवतशास्त्राचा अंतिम हेतु दैवतेतिहास हाच असतो. परंतु या दोन परिश्रमांत स्वरूपाचें पृथक्त्व आहे व हें पृथक्त्व दाखविण्यासाठींच नामपृथक्त्व रक्षिलें आहे. आपणांस साधारणतः असें आढळून आलें आहे कीं, एक देवतेची उपासना अनेक लोकांत पसरते. आणि एका दैवतसमुच्चयांत दुसर्या लोकांचीं दैवतें चोरून मारून किंवा राजरोस शिरतात. या दैवतेतिहासासाठीं किंवा तौलनिक दैवतशास्त्रासाठीं ज्या दैवतांची तुलना करावयाची तीं दैवतें एका वंशांतील भिन्न झालेल्या राष्ट्रांचीं म्हणजे भाऊबंदांचींच केवळ घेऊन चालत नाहीं, तर भाऊबंदांचीं व शेजार्यांचीं अशीं दोघांचींहि दैवतें तपासावीं लागतात. प्राचीन असुरांच्या राष्ट्राचा अंतर्भाव 'इंडोजर्मानिक' समुच्चयांत करीत नाहींत, तथापि प्राचीन इराणांतील दैवतांचा अभ्यास करीत असतांना इराणच्या दैवतांची तुलना जशी भारतीय व यूरोपीय दैवतांशीं करावी लागते तशीच असुरांच्या दैवतांशींहि करावी लागते. असुर लोकांचीं दैवतें कांही वेदग्रंथांत शिरलीं आहेत असा संशय रा. बाळ गंगाधर टिळक यांनीं आपल्या भांडारकरांच्या स्मारक ग्रंथांतील लेखांत व्यक्त केला आहे.
दैवतशास्त्राचें एक महत्त्वाचें अंग आहे. त्या अंगास आपण 'अवस्त्वास्तिक्यशास्त्र' असें म्हणूं. अवस्त्वास्तिक्यशास्त्र हा शब्द (Mythology) मायथॉलॉजी या गचाळ शब्दानें जे क्षेत्र अंधुकपणें दर्शविलें जातें त्याची कक्षा निश्चित करून त्या निश्चित क्षेत्राच्या अभ्यासास लाविला आहे. भावरूप अगर क्रियारूप अशा अनेक गोष्टी कांहीं कालानें लोकांच्या कल्पनेंत भौतिक व्यक्तीचें स्वरूप पावतात. तसेंच विशिष्ट गुणांचा आणि क्रियांचा कल्पनानिर्मित व्यक्तीच्या ठिकाणीं आरोप करण्यांत येतो. हा भौतिकरूपाश्रय कधीं कधीं अज्ञानमूलक असतो आणि कधीं कधीं रुपकमूलक असतो. प्रत्येक क्रियेस अधिष्ठात्री कोणीतरी देवता आहे अशा समजुतीनें केव्हां केव्हां हा प्रकार घडतो. आणि कधीं कधीं कायद्याचा अधिकार आणि जबाबदारी यांचें आश्रयस्थान होऊं शकेल अशी व्यक्ति बुद्धिपुरःसर कल्पिली जाते. सूर्यतेज आणि उषःकाल यांचे ठिकाणीं देवताबुद्धि उत्पन्न झाली, हें परिवर्तन वरील एका नियमाचेंच बोधक आहे. एखाद्या क्रियाकलापांतर्गत एका भावमय वस्तूस आपण देवता आहे असें समजलों म्हणजे तो क्रियासमूह त्या देवतेचीं कार्यें आहेत असें वाटावयास लागतें. आणि त्या क्रियासमूहामध्यें भावरूप कल्पनांच्या ऐवजीं अनेक भौतिक वस्तू असल्या म्हणजे तेथें कथासूत्रहि सुरू होतें. उदाहरणार्थ, सूर्य हा प्रेम करणारा आहे आणि तो उषासुंदरीच्या पाठीस लागला आहे अशी कल्पना उत्पन्न होते. कालांतरानें या गोष्टींचा विकास होऊन लांबलचक कथा बनतात. त्या कथांमध्यें कधीं कधीं मानवी कोटींतील आणि कधीं कधीं अद्भुत कोटींतील क्रिया आणि अंगें निर्माण होतात; आणि कालांतरानें मूळची विस्मृति पडून त्या अद्भुत चमत्कार करणार्या ऐतिहासिक व्यक्तीच होत्या कीं काय असें लोकांस वाटूं लागतें. प्रस्तुत शास्त्राचा उद्देश हाच कीं आजच्या अद्भुत गोष्टी व कथानकें घेऊन त्यांचें अवस्तुरूप म्हणजे भावरूप अगर क्रियारूप मूळ शोधीत जावयाचें. या शास्त्राची तौलनिक शाखा वेदाभ्यासानें वृद्धिंगत झाली आहे, 'ज्युपिटर,' 'युरेनस' इ. देवतांचें व तत्संबंधी कथांचें आदिसूत्र शोधण्यासाठीं इराणी व भारतीय वाङ्मयाकडेच यावें लागेल. कारण आमच्या वाङ्मयाच्या प्राचीनतम भागांत अवस्तूंस आस्तिक्य पूर्णपणें आलेलें नाहीं. वेदकालीन दैवतविषयक कथानकांतील रूपकें द्राक्षात्वचेइतकीं पारदर्शक आहेत; आणि त्यांचा अभ्यास आपणास जितसा फलप्रद आहे तितकाच तो यूरोपीयांसहि आहे.