प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.

आर्य संस्कृति आणि भारतीय भाषा - ज्या आपल्या संस्कृतीचें सातत्य आपण गातों ती संस्कृति गीर्वाणवाणीचा आश्रय करून आहे. आम्हां भारतीयांचें आजचें वाङ्‌मय अनेक देश्य भाषा, तसेंच संस्कृत भाषा व पाश्चात्यांनीं आपणांस शिकविलेली इंग्रजी भाषा या सर्वात थोडें फार आहे. ही आजची अवस्था झाली. तथापि अत्यंत प्राचीन कालीं आपणास आपलें संस्कृतिसंवर्धन एकाच भाषेनें करावयास सांपडलें.

आपलें बरेचसें प्राचीन वाङ्‌मय संस्कृत भाषेंत सांपडतें हें जरी खरें आहे, तथापि संस्कृत वाङ्‌मय व भारतीय वाङ्‌मय सर्वथैव एकच नव्हत. भारतीय वाङ्‌मयाच्या इतिहासांत सर्व ठिकाणचे संस्कृत ग्रंथ येत नाहींत. उलटपक्षीं भारतवर्षांतील अनेक भाषांत लिहिलेले ग्रंथ भारतीय वाङ्‌मयाच्या इतिहासांत येतात. 'आर्यन् भाषा' म्हणून जो भाषांचा वंश भाषाशास्त्रज्ञांनीं कल्पिला आहे त्या वंशवृक्षाच्या भारतीय शाखेत अर्वाचीन हिंदुस्थानांतल्या ज्या भाषा व पोटभाषा येतात त्या मुख्यतः तीन अवस्थांतून आलेल्या आहेत. या भाषावस्था अशा :—
१ अत्यंत प्राचीन गीर्वाण भाषा. (वेदभाषा).
२ प्राचीन गीर्वाण भाषा. (संस्कृत).
३ प्राचीन अपसृष्ट भाषा. (अपसृष्ट म्हणजे पाणिनीय संस्कृत भाषेपासून दूर सरकलेल्या, प्राकृत).