प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
ज्ञानसंचयाचा काल – आतां आपणापुढें जो नवा काल येत आहे त्यासाठीं जुनें ज्ञान गोळा होऊन त्याचें संवर्धन झालें पाहिजे. नवीन येणार्या मनूबरोबर ज्ञानाच्या संचयाचे प्रयत्न यापूर्वींहि झालेले दृष्टीस पडतात. आपल्या संस्कृतीच्या इतिहासांत आजच्यासारखे दोनच काल पूर्वीं होऊन गेले आहेत. एक काल म्हटला म्हणजे भारतीय युद्ध समाप्त झालें तो काल आणि दुसरा काल म्हणजे मुसुलमानी संस्कृतीच्या दडपणाखालीं मरून न जातां हिंदूंनीं आपलें स्वत्व रक्षण करण्यासाठीं केलेल्या प्रयत्नाचा म्हणजे विद्यारण्यांचा काल. आजचा काल हा आपण आपलें महत्त्व जगांत पूर्ववत् स्थापन करण्याचा काल आहे.
अर्वाचीन आणि प्राचीन कालांचें एकमेंकापासून पृथक्त्व दाखविण्यासाठीं जुन्या कालापासून एखादी गोष्ट प्रसिद्ध असेल तर ती कुरुयुद्ध होय. कुरुयुद्धाच्या शेवटीं किंवा हे युद्ध आटपण्यापूर्वी कांही वर्षे एक मोठा वाङ्मयविकासार्थ प्रयत्न झालेला दिसतो. त्या प्रयत्नाचें स्वरूप आज उपलब्ध नाहीं तथापि तें शोधतां येण्याजोगें आहे. तो प्रयत्न किती विस्तारानें झाला याची कल्पना येण्यासाठीं भगवान् वेदव्यासांच्या नांवावर कोणती कामें लादलीं गेलीं आहेत याचा विचार करूं.
१. वेदांच्या संहिता व्यासांनीं केल्या.
२. पुराणें व्यासांनीं लिहीलीं.
३. महाभारताचे कर्ते व्यासच होत.
४. बादरायण सूत्रें व्यासांचींच आहेत.
वैशंपायन, सुमंतु, जैमिनि, इत्यादि माणसें व्यासांचींच शिष्य होतीं, आणि याज्ञवल्क्य हा व्यासांचा शिष्यानुशिष्य होता. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे सर्व जुन्या विद्येचें एकत्रीकरण आणि विद्येच्या अभिवृद्धीसाठीं अवश्य होणारें विचारप्रवर्तन आणि शास्त्रप्रवर्तन, आणि त्या प्रमाणेंच जुन्या सर्व इतिहासांतील रक्षणीय भागाचें रक्षण हें व्यासांचेंच कार्य होय. प्राचीन ग्रंथकारांमध्यें व्यासांची थोरवी लोकांस वाटते ती अयथार्थ नाही. व्यासांनीं विद्येच्या संरक्षणासाठीं जो प्रयत्न केला त्याच्यावरच पुढील सर्व इमारत रचली गेली असें म्हणण्यास हरकत नाहीं. महाभारतानें लोकांपुढें श्रेष्ठ चरित्रें ठेवलीं, आणि पुढील बर्याच कवितेस तो ग्रंथ आधारभूत झाला. त्यानें व पुराणांनीं अत्यंत प्राचीन अशा इतिहासास जिवंत ठेवलें; आणि संहितांनीं पाठीमागची भाषा आणि कल्पना जशाच्या तशा जिवंत ठेवल्या. पूर्वींचीं पुराणें उत्तरकालीन लोकांच्या तावडींत सांपडून वाढत गेलीं. वेदांच्या संहिता व ब्राह्मणें देखील थोडींबहुत वाढलीं. पुढें वेदांचा प्रतिपाद्य विषय जो यज्ञ तो मागें पडत चालल्यामुळें त्यांचें वर्धन खुंटलें. 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं' इत्यादि वाक्यें व्यासांचें महत्त्व दाखवितात.
व्यासानंतर विद्येच्या इतिहासांत व्यासासारखा थोर पुरुष झाला नाहीं असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. पुढील लोकांची कार्यें लहान व एकांगी होतीं आणि पूर्वींच्याच पायावर पूर्वींचीच बांधलेली इमारत एखादी खोली वाढवून किंवा एखादा मजला चढवून वाढवावी या स्वरूपाचीं होतीं. गौतमबुद्धाचें कार्य याहून भिन्न होतें. गौतमबुद्ध हा जरी नवीन प्रकारच्या वाङ्ममयाचा जनक झाला नसला तरी नवीन भाषेंतील वाङ्मयास जन्म देता झाला खास. त्याचे हातून विद्यांना चालना मिळालें असें मात्र म्हणतां येणार नाहीं. बौद्ध वाङ्मयाच्या इतिहासप्रसंगीं या संबंधानें विषेश विवेचन करतां येईल. असो. तेव्हां व्यासानंतर सर्व तर्हेनें विद्येस चालन देणारा मनुष्य शोधावयाचा झाल्यास आपणांस विद्यारण्यस्वामीपर्यंत आल्याखेरीज कोणी दिसत नाहीं. सायणमाधवांनीं (हे एक असोत किंवा दोन असोत) जे प्रयत्न केले त्यांचें स्वरूप व्यासांच्या प्रयत्नापेक्षां निराळें आहे. त्यांतील मुख्य भाग येणेंप्रमाणें-
१. वेद लोकांस समजत नव्हते म्हणून ते सुबोध करणे.
२. देशांतील निरनिराळीं मतें व संप्रदाय यांचें समुच्च्यानें लोकांस ज्ञान देणें.
३. धर्मशास्त्र संकुचित झालें होतें तें विस्तृत करणें.
४. भिन्नमतांपैकीं ज्ञानमार्गचा आणि वेदांतमताचा प्रसार करणें आणि त्याची ऐतिहासिक परंपरा दाखविणें.
५. वैद्यकासारख्या लोकोपयोगी शास्त्रांचें पुनरुज्जीवन करणें.
भगवान् वेदव्यास आणि अत्यंत विद्वान् विद्यारण्य यांच्या कार्यांत भेद आहे. हा भेद असा मांडता येईल कीं, माधवाचार्यांची उर्फ विद्यारण्यांची चळवळ संस्कृतीच्या उद्धारकाची होती व व्यासांची चळवळ संस्कृतीच्या संस्थापकाची होती. विद्येच्या इतिहासांतील हे दोन अत्यंत थोर आचार्य होत. तथापि ज्या विद्यांस व्यासांचा हातहि लागला नाहीं अशा कांही थोड्या प्राचीन विद्या आहेतच. असो.
हिंदुसमाजाचें जें एकत्व स्थापन झालें तें अनेक जाती एकत्र येऊन त्यांच्यामध्यें सामान्य वाङ्मयाचा प्रसार झाल्यानें अंशेकरून झालें; आणि तें कार्य करण्यासाठीं वाङ्मयास आपलें एकदेशीयत्व टाकून देऊन सर्वांगीणत्व साध्य करावें लागलें. हा सामाजिक इतिहास वाङ्मयाच्या इतिहासाबरोबरच अधिक स्पष्ट होईल.
आतां निरनिराळ्या जातींना एकत्र करणार्या हिंदुसमाजाचें एकत्व आज किती दृढ झालें आहे व निरनिराळ्या जातींत परस्परसंबंध काय आहे याच्याकडे लक्ष देऊं.