प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
भारतीय संस्कृतीचें अतिभारतीयत्व :— हिंदूंच्या संस्कृतीचा आणि हिंदूंच्या संख्येचा विचार करितांना आपलें लक्ष केवळ हिंदुस्थानांतच अडकवून उपयोगी नाहीं. प्राचीन काळीं भारतीय संस्कृतीचा विस्तार होत असतां त्या संस्कृतीनें जेवढें क्षेत्र आक्रमण केलें त्या सर्व क्षेत्राचें स्थूल ज्ञान तरी आपणांस अवश्य आहे. अशा ज्ञानाखेरीज जगांत ज्या मोठमोठ्या उलाढाली होतात आणि ज्या अनेक शतकें चालतात त्यांचें ज्ञान आपणांस व्हावयाचें नाहीं. स्थानिक इतिहास जितके महत्त्वाचे आहेत त्यांहूनहि सांस्कृतिक इतिहास अधिक महत्त्वाचे होत. फार मोठ्या जनसंख्येवर परिणाम घडविणार्या आणि आपल्या विविध शक्तींचा उपयोग करणार्या अशा शक्ती राजकीय नसून सांस्कृतिक असतात. राष्ट्रांचे इतिहास हा संस्कृतीच्या इतिहासांतील एक अल्प भाग असतो. सर्व जगाचें निरिक्षण करतांना राष्ट्रांच्या लहानसान क्रियाच केवळ नव्हत तर राष्ट्रांची विस्तारसंकोचमूलक बनलेलीं साम्राज्यें हीं देखील संस्कृतीच्या इतिहासाच्या पोटांत येऊन जातात. यासाठीं राष्ट्रांचे आणि साम्राज्यांचे इतिहास संस्कृतींच्या इतिहासाचे अल्प घटक समजण्याचा इतिहासवेत्त्यांचा परिपाठ आहे. जगांतील सर्व प्रकारच्या स्पर्धांत सांस्कृतिक स्पर्धा सर्वांत अधिक महत्त्वाची आहे. ही स्पर्धा समजली म्हणजे जगदितिहासाचित्राच्या स्थूल रेषा समजल्या. राष्ट्रांच्या अंतर्गत ज्या निरनिराळ्या घडामोडी त्या वरील रेषांहून खालच्या नंबरच्या अशा रेषा होत. अशी ही महत्त्वपरंपरा आहे. हिंदु या दृष्टीनें जो आपणांस विचार करावयाचा त्याचें महत्त्व हिंदुस्थानीय विचारापेक्षां मोठें आहे; हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यासंबंधाचा प्रश्न, जगांतील विविध संस्कृतींच्या भवितव्यासंबंधींच्या प्रश्नापेक्षां फारच लहान आहे; या गोष्टी वरील विवेचनावरून आपल्या लक्षांत येतात. असो.
संशोधनामध्यें प्रवेश करावयाचा म्हणजे आजच्या व म्हणून अधिक परिचित अशा परिस्थितीकडे प्रथम अवलोकन करावयाचें आणि तेथून मग कमी परिचित अशा पूर्वकालाकडे जावयाचें. या संशोधन तत्त्वाचा अवलंब करून हिंदूंची भारतबाह्य अथवा अभारतीय जगांतील आजची परिस्थिति प्रथम पाहूं आणि नंतर पूर्वकालाकडे म्हणजे हिंदुसंस्कृतीच्या आजवरच्या संगतवार इतिहासाकडे जाऊं.