प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.

संस्कृत भाषेचीं तीन स्वरूपें :- पाणिनीय, गद्यग्रांथिक, आर्षकाव्य :— ब्राह्मणें, आरण्यकें, व उपनिषदें हे उत्तर वेदकालांतील गद्यप्रचुर ग्रंथ व सूत्रग्रंथ यांची संस्कृत भाषा व पाणिनीनें उपदेशिलेली संस्कृत भाषा या दोहोंत फारसा फरक नाहीं. उपर्युक्त ग्रंथांच्या भाषेला 'प्राचीन संस्कृत' असें म्हणणें सोईचें होईल. या ग्रंथांच्या रचनाकालीं व तत्पूर्वीं कांहीं काल विद्वान् लोक व पुरोहीत वर्गांतील लोक बहुधा ही भाषा वापरीत असावेत. पाणिनी ख्रि. पू. ७५० व्या वर्षाच्या सुमारास किंवा त्याहूनहि पूर्वीं होऊन गेला असावा. कात्यायनानें जी भाषा प्रचलित म्हणून गृहीत धरलेली आहे त्या भाषेंत आणि पाणिनीकालीन भाषेंत जे फरक दृग्गोचर होतात त्या फरकांची भोंवतालच्या राजकीय घडामोडींशीं संगति लावून रा. राजवाडे यांनीं पाणिनीस ख्रि. पू. ७५० वर्षांच्या पलीकडे ढकललें आहे. {kosh राजवाडे यांचे मत ग्राह्य धरून गोल्डस्टकरचें मत आम्ही अपूर्ण धरतो.}*{/kosh} पंतजलीच्या कालींहि ही प्राचीन संस्कृत भाषा शिष्ट लोकांत रूढ होती. याच कालीं हिचें एक स्वरूप सामान्य लोकांत प्रचारांत होतें तें आपणास तत्कालीन आर्ष महाकाव्यांतून आढळतें. हे रामायणमहाभारतांतील संस्कृत व अभियुक्त (पाणिनिय) संस्कृत यांत फरक आहे तो एवढाच कीं, अभियुक्त संस्कृतांत नियमबद्धता अधिक असून लोक भाषेपासून तें बरेंच निराळें आहे व त्यांत रामायणमहाभारताच्या संस्कृताइतके जुने प्रयोग नाहींत. हे स्वरूपभिन्नतेचें कारण न समजल्यामुळें पंडितवर्गास मौज उत्पन्न करणारा असा एक गीतेंतील नाना प्रकारच्या 'चुका' दाखवूं पाहणारा लेख भांडारकरांच्या स्मारक ग्रंथांत एका सुशिक्षित ब्राह्मणानें लिहिला आहे. संस्कृत व प्राकृत गद्यग्रांथिक भाषा व आर्ष काव्यभाषा हीं समाजांतील निरनिराळ्या वर्गांच्या भाषांचीं स्वरूपें होतीं. यांचेंच पर्यवसान संस्कृत व प्राकृत या भेदांत झालें. संस्कृत व प्राकृत या भाषा एकाच कालीं समाजांतील निरनिराळे वर्ग वापरित होते.

राजा, ब्राह्मण, सरदार लोक व कांही सुशिक्षित स्त्रिया यांच्या तोंडी संस्कृत व इतरांच्या तोंडीं प्राकृत अशी जी व्यवस्था नाटकांतून आढळून येते, तीवरुन नाटकें लिहिली गेलीं त्याकाळाचे पूर्वीं म्हणजे ख्रिस्तशकापूर्वीं कित्येक शतकें सामान्य लोकांनां संस्कृत बोलतां येत नसलें तरी बोललेलें समजत असे असा सिद्धांत काढण्यांत आला आहे.

संस्कृत ही मृतभाषा नव्हे. – पाश्चात्य ग्रंथकारांस संस्कृत भाषेस मृत किंवा जिवंत यापैकीं कोणता शब्द लावावा याचीच मोठी फिकीर पडलेली दिसते. जिवंत हा शब्द लावण्यासाठीं किंवा निदान मृत शब्द न लावावा या हेतूनें विंटरनिट्झ म्हणतो :— "संस्कृत भाषा ही मृत भाषा आहे असें म्हणणें चुकीचें ठरेल.  तिला फार तर बद्ध भाषा असें म्हणतां येईल. कारण, या भाषेला पाणिनीसारख्या व्याकरणकारांनीं व्याकरणनियमांनीं गच्च आंवळून टाकल्यामुळें कांहीं दिवसांनीं हिची वाढ खुंटली. पाणिनिय व्याकरणाप्रमाणें जें शुद्ध संस्कृत त्यासच अभियुक्त संस्कृत ही संज्ञा आहे. पाणिनीनंतर हजार एक वर्षेपर्यंत या भाषेंत अनेक नवीन काव्यें व शास्त्रग्रंथ निर्माण झाले व अद्यापिहि अशीं काव्यें व ग्रंथ होत आहेत. आजच्या घटकेला हिंदुस्थानांत अनेक संस्कृत पंडीत अनेक नियतकालिकें व ग्रंथ संस्कृतांत लिहून प्रसिद्ध करीत आहेत. महाभारत, रामायण वगैरे पुराणांचें अद्यापि श्रवण व वाचन चाललेलें आहे. संस्कृत काव्यें व लेख अजूनहि निर्माण होत आहेत व पुष्कळ विद्वान् लोक संस्कृत भाषेमध्यें शास्त्रीय विषयांवर अस्खलित भाषण करतांना दृष्टीस पडतात. तेव्हां या सर्व गोष्टी समोर दिसत असून संस्कृत भाषा ही मृतभाषा आहे असें कसें म्हणतां येईल ?" येणेंप्रमाणें विटर्निट्झची विचारसरणि आहे. असो. या प्रकारच्या वादाशीं आपणास कांही कर्तव्य नाहीं. लॅटिन भाषेचा यूरोपच्या इतिहासांतील मध्ययुगांत जितका प्रचार होता अगर हिब्र्यू भाषेचा यहुदी लोकांत जितका आज प्रचार आहे, तितकाच संस्कृत भाषेचा प्रचार आज भरतखंडांत आहे एवढें लक्षांत ठेवलें म्हणजे झालें.