प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
हिंदुसमाजघटनेचा इतिहास :— हिंदुत्वाचा म्हणजे 'हिंदु' म्हणून आज जो समाज बनला आहे त्या समाजाचा आणि तदंतर्गत मानवसादृश्याचा इतिहास निराळा आहे. हें सादृश्य समाजांतील एका विशिष्ट वर्गानें मतें किंवा उपास्यें अथवा आचार्य या तत्त्वावर टोळी बनवून तींत माणसें ओढावयाचीं या प्रकारच्या चळवळीनें तयार झालें नाहीं. जेव्हां दोन जातींचा सन्निकर्ष उत्पन्न होतो तेव्हां त्या दोन जातींमधील माणसें एकमेकांचे कांहीं बाबतींत अनुकरण करितात. कालांतरानें त्यांचें मिश्रण होतें आणि असें मिश्रण जरी झालें नाहीं तरी अनुकरणाच्या देवघेवीनें दोघांमध्यें बरेंच सादृश्य उत्पन्न होतें. जेव्हां एकाच ठिकाणीं अनेक जाती येतात तेव्हां या सर्व जातींमध्यें हळू हळू रीतीभातींचें सादृश्य उत्पन्न होऊं लागतें. जी जात बलवान किंवा वरिष्ठ असेल तिचें अनुकरण इतरांकडून होऊं लागतें. संघट्टनामुळें कालांतरानें सर्वांच्या कल्पनाहि सारख्या होऊं लागतात. एखाद्या जातीमध्यें जर सुशिक्षित किंवा हुशार वर्ग निघाला तर कमी सुशिक्षित किंवा कमी बुद्धिवान अशा लोकांकडून त्याला मान मिळतो, त्याची संभावना होते किंवा त्याला अनुयायीहि मिळतात. जर अनेक कुळें, गोत्रें किंवा जाती एकाच ठिकाणीं राहत असतील आणि प्रत्येकाचीं दैवतें निरनिराळीं असतील तर कांही दैवतांचा लोप होईल व कांहीं टिकतील; किंवा तीं अनेक दैवतें एकाच दैवताचीं भिन्न स्वरूपें आहेत असें तत्ववेत्ते सांगूं लागतील; अगर त्या दैवतांपैकीं एका दैवताला प्रामुख्य मिळेल आणि इतर दैवतें विशिष्ट कर्मांचीं, प्रसंगांचीं, किंवा विशिष्ट इष्टफल देणारीं दैवतें होतील; आणि या रीतीनें दैवतें कुळविशिष्ट न राहतां सार्वजनिक होतील. केवळ संघट्टनानें, बरेच दिवस एकत्र राहिल्यानें, सर्वसामान्य आचार, सर्वसामान्य रीतीभाती, सर्वसामान्य विचारपरंपरा, सर्वसामान्य उपास्यें, सर्वसामान्य ईश्वरविषयक
कल्पना आणि सर्वसामान्य आचार्यवर्ग निर्माण होईल. एका वर्गांचें वाङ्मय तेंच सर्वांचें होईल आणि सर्व समूहास एक स्वरूप येऊन सर्वांसच हें वाङ्मय म्हणजे आपणां सर्वांची वडिलोपार्जित मिळकत आहे असें वाटूं लागेल. हिंदुसमाजाचा विस्तार या पद्धतीनें झाला, आणि हिंदूंचे विचार याच पद्धतीनें निश्चित आणि संवर्धित झाले. जगाच्या बर्याचशा भागास एकत्व उत्पन्न होण्यास या गोष्टी आणि विशेषेंकरून विद्वान ब्राह्मणांचा चोहोंकडे संचार कारण झाला.
वर सांगितलेली क्रिया आज हजारों वर्षें होत राहून आजचा हिंदुसमाज बनला आहे. या क्रियेचें स्वरुपच असें आहे कीं ती सहज दृष्टीस पडत नाहीं आणि यामुळें लोकांचा बराच गैरसमज झालेला आहे. पुष्कळांस असें वाटतें कीं हिंदु लोक हे परकी गोष्टी मुळींच न घेणारे आहेत. त्यांनीं जरी कांही परकीय गोष्टी घेतल्या असल्या तरी ते परकीय गोष्टींचा द्वेष करणारे आहेत आणि ते आपल्या समाजांत इतरांस घेत नाहींत असा पुष्कळांचा समज आहे. या दोन्ही कल्पना सत्यापासून अत्यंत दूर आहेत. खरें पाहिलें असतां आजचे हिंदूंचे आचारविचार हे अनेक जातींच्या अनेक चालीरीती व कल्पना यांचें मिश्रण आहे. सर ऑलफ्रेड लायल यांनीं हिंदुस्थानांतील वन्य जातींच्या अंतर्भावामुळें हिंदुसमाजाची कसीकशी वाढ होत आहे याचें सुंदर वर्णन आपल्या 'एशियाटिक स्टडीज्' (लंडन १८४४) या पुस्तकांतील 'मिशनरी अॅण्ड नॉनमिशनरी रिलिजन्स' या लेखांत दिलें आहे.
हिंदू इतरांस आपणांत घेत नाहींत ही कल्पना चुकीची आहे पण ती सार्वत्रिक आहे यांत संशय नाहीं. ती तशी कां असावी ? मुळांत कांहीं तरी सत्य असल्याशिवाय इतकी सार्वत्रिक कल्पना तरी कशी उत्पन्न होईल ? असे प्रश्न येथें उद्भवतात. या प्रश्नांचे उत्तर खालील विवरणावरून मिळेल. हिंदू हे ख्रिस्ती किंवा मुसुलमान होतांना दृष्टीस पडतात; पण कोणी मुसुलमान किंवा ख्रिस्ती हिंदू होतांना दृष्टीस पडत नाहींत. या अवलोकनावरून पुष्कळांस असें वाटतें कीं, हिंदुत्व परजनसंग्राहक नसून केवळ विशिष्ट जातीपुरतें किंवा राष्ट्रापुरतें आहे; आणि ख्रैस्त्य व मुसलमानी संप्रदाय हे सर्व जातिसंग्राहक आणि सार्वराष्ट्रीय आहेत. कित्येकांस असें वाटतें कीं सुशिक्षित व सुधारलेल्या लोकांनां किंवा निश्चित पारमार्थिक मतें असणार्यांनां आपल्यामध्यें ओढण्यास हिंदुत्व समर्थ नाहीं. प्रत्यक्ष ज्ञान यथार्थ होऊन अनुमान तेवढें अयथार्थ कां व्हावें ? लोकांची सर्वसामान्य कल्पना आणि आमचें म्हणणें यांत तफावत कां पडवी ?
या घोंटाळ्याच्या स्पष्टीकरणासाठीं हिंदुत्व व ख्रिस्ती संप्रदाय यासंबंधीं कांही सामान्य कल्पना येथें दिल्या पाहिजेत. हिंदूसमाज हा कांहीं ख्रिस्ती व मुसलमान यांसारखा संप्रदायमूलक संघ नाहीं. हिंदूसमाज व ख्रिस्तीआदि संप्रदायमुलक समाज या दोहोंमध्यें मुख्य फरक हा आहे कीं, संप्रदायाची स्थापना इतर लोक आपल्यासारखे करण्यासाठींच झालेली असते. संप्रदाय हे विवक्षित कल्पनांचा, आचारांचा आणि उपास्यांचा विशेष, खटपटींनीं इतरांमध्यें प्रसार करून त्या इतरांमध्यें आपणांशीं सादृश्य उत्पन्न करण्याकरितांच जन्मास आलेले असतात. हिंदुत्वाच्या प्रसाराची गोष्ट अशी नाहीं. आचार, सण, उत्सव, मतें, विचारपद्धती, या बाबतींत हिंदू व अहिंदू लोकांत ऐक्य उत्पन्न करण्याची भिस्त हिंदूंकडून केवळ संघट्टनावर व कालावर ठेवली जाते आणि संघट्टन प्रादेशिक सान्निध्यावर सोंपविलें जातें. संघट्टन असलें म्हणजे कालांतरानें आचारादिकांचें एकत्व सहजच उत्पन्न होतें. संप्रदायांची गोष्ट अशी नाहीं. त्यांची प्रवृत्ति अगदीं वेगळी असते. आपण जें मानतों तें मानणारा आणि आपण जें मानीत नाहीं तें न मानणारा असा जो कोणी असेल, असल्या तर्हेची ज्याची मनोवृत्ति बनली असेल, त्यासच आपल्या संप्रदायांत स्थान द्यावयाचें आणि आपल्या समाजाचें सभासद करावयाचें, अशी संप्रदायी समाजांची प्रवृत्ति असते.