प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
हिंदुसमाजघटनेचा इतिहास :— हिंदुत्वाचा म्हणजे 'हिंदु' म्हणून आज जो समाज बनला आहे त्या समाजाचा आणि तदंतर्गत मानवसादृश्याचा इतिहास निराळा आहे. हें सादृश्य समाजांतील एका विशिष्ट वर्गानें मतें किंवा उपास्यें अथवा आचार्य या तत्त्वावर टोळी बनवून तींत माणसें ओढावयाचीं या प्रकारच्या चळवळीनें तयार झालें नाहीं. जेव्हां दोन जातींचा सन्निकर्ष उत्पन्न होतो तेव्हां त्या दोन जातींमधील माणसें एकमेकांचे कांहीं बाबतींत अनुकरण करितात. कालांतरानें त्यांचें मिश्रण होतें आणि असें मिश्रण जरी झालें नाहीं तरी अनुकरणाच्या देवघेवीनें दोघांमध्यें बरेंच सादृश्य उत्पन्न होतें. जेव्हां एकाच ठिकाणीं अनेक जाती येतात तेव्हां या सर्व जातींमध्यें हळू हळू रीतीभातींचें सादृश्य उत्पन्न होऊं लागतें. जी जात बलवान किंवा वरिष्ठ असेल तिचें अनुकरण इतरांकडून होऊं लागतें. संघट्टनामुळें कालांतरानें सर्वांच्या कल्पनाहि सारख्या होऊं लागतात. एखाद्या जातीमध्यें जर सुशिक्षित किंवा हुशार वर्ग निघाला तर कमी सुशिक्षित किंवा कमी बुद्धिवान अशा लोकांकडून त्याला मान मिळतो, त्याची संभावना होते किंवा त्याला अनुयायीहि मिळतात. जर अनेक कुळें, गोत्रें किंवा जाती एकाच ठिकाणीं राहत असतील आणि प्रत्येकाचीं दैवतें निरनिराळीं असतील तर कांही दैवतांचा लोप होईल व कांहीं टिकतील; किंवा तीं अनेक दैवतें एकाच दैवताचीं भिन्न स्वरूपें आहेत असें तत्ववेत्ते सांगूं लागतील; अगर त्या दैवतांपैकीं एका दैवताला प्रामुख्य मिळेल आणि इतर दैवतें विशिष्ट कर्मांचीं, प्रसंगांचीं, किंवा विशिष्ट इष्टफल देणारीं दैवतें होतील; आणि या रीतीनें दैवतें कुळविशिष्ट न राहतां सार्वजनिक होतील. केवळ संघट्टनानें, बरेच दिवस एकत्र राहिल्यानें, सर्वसामान्य आचार, सर्वसामान्य रीतीभाती, सर्वसामान्य विचारपरंपरा, सर्वसामान्य उपास्यें, सर्वसामान्य ईश्वरविषयक
कल्पना आणि सर्वसामान्य आचार्यवर्ग निर्माण होईल. एका वर्गांचें वाङ्मय तेंच सर्वांचें होईल आणि सर्व समूहास एक स्वरूप येऊन सर्वांसच हें वाङ्मय म्हणजे आपणां सर्वांची वडिलोपार्जित मिळकत आहे असें वाटूं लागेल. हिंदुसमाजाचा विस्तार या पद्धतीनें झाला, आणि हिंदूंचे विचार याच पद्धतीनें निश्चित आणि संवर्धित झाले. जगाच्या बर्याचशा भागास एकत्व उत्पन्न होण्यास या गोष्टी आणि विशेषेंकरून विद्वान ब्राह्मणांचा चोहोंकडे संचार कारण झाला.
वर सांगितलेली क्रिया आज हजारों वर्षें होत राहून आजचा हिंदुसमाज बनला आहे. या क्रियेचें स्वरुपच असें आहे कीं ती सहज दृष्टीस पडत नाहीं आणि यामुळें लोकांचा बराच गैरसमज झालेला आहे. पुष्कळांस असें वाटतें कीं हिंदु लोक हे परकी गोष्टी मुळींच न घेणारे आहेत. त्यांनीं जरी कांही परकीय गोष्टी घेतल्या असल्या तरी ते परकीय गोष्टींचा द्वेष करणारे आहेत आणि ते आपल्या समाजांत इतरांस घेत नाहींत असा पुष्कळांचा समज आहे. या दोन्ही कल्पना सत्यापासून अत्यंत दूर आहेत. खरें पाहिलें असतां आजचे हिंदूंचे आचारविचार हे अनेक जातींच्या अनेक चालीरीती व कल्पना यांचें मिश्रण आहे. सर ऑलफ्रेड लायल यांनीं हिंदुस्थानांतील वन्य जातींच्या अंतर्भावामुळें हिंदुसमाजाची कसीकशी वाढ होत आहे याचें सुंदर वर्णन आपल्या 'एशियाटिक स्टडीज्' (लंडन १८४४) या पुस्तकांतील 'मिशनरी अॅण्ड नॉनमिशनरी रिलिजन्स' या लेखांत दिलें आहे.
हिंदू इतरांस आपणांत घेत नाहींत ही कल्पना चुकीची आहे पण ती सार्वत्रिक आहे यांत संशय नाहीं. ती तशी कां असावी ? मुळांत कांहीं तरी सत्य असल्याशिवाय इतकी सार्वत्रिक कल्पना तरी कशी उत्पन्न होईल ? असे प्रश्न येथें उद्भवतात. या प्रश्नांचे उत्तर खालील विवरणावरून मिळेल. हिंदू हे ख्रिस्ती किंवा मुसुलमान होतांना दृष्टीस पडतात; पण कोणी मुसुलमान किंवा ख्रिस्ती हिंदू होतांना दृष्टीस पडत नाहींत. या अवलोकनावरून पुष्कळांस असें वाटतें कीं, हिंदुत्व परजनसंग्राहक नसून केवळ विशिष्ट जातीपुरतें किंवा राष्ट्रापुरतें आहे; आणि ख्रैस्त्य व मुसलमानी संप्रदाय हे सर्व जातिसंग्राहक आणि सार्वराष्ट्रीय आहेत. कित्येकांस असें वाटतें कीं सुशिक्षित व सुधारलेल्या लोकांनां किंवा निश्चित पारमार्थिक मतें असणार्यांनां आपल्यामध्यें ओढण्यास हिंदुत्व समर्थ नाहीं. प्रत्यक्ष ज्ञान यथार्थ होऊन अनुमान तेवढें अयथार्थ कां व्हावें ? लोकांची सर्वसामान्य कल्पना आणि आमचें म्हणणें यांत तफावत कां पडवी ?
या घोंटाळ्याच्या स्पष्टीकरणासाठीं हिंदुत्व व ख्रिस्ती संप्रदाय यासंबंधीं कांही सामान्य कल्पना येथें दिल्या पाहिजेत. हिंदूसमाज हा कांहीं ख्रिस्ती व मुसलमान यांसारखा संप्रदायमूलक संघ नाहीं. हिंदूसमाज व ख्रिस्तीआदि संप्रदायमुलक समाज या दोहोंमध्यें मुख्य फरक हा आहे कीं, संप्रदायाची स्थापना इतर लोक आपल्यासारखे करण्यासाठींच झालेली असते. संप्रदाय हे विवक्षित कल्पनांचा, आचारांचा आणि उपास्यांचा विशेष, खटपटींनीं इतरांमध्यें प्रसार करून त्या इतरांमध्यें आपणांशीं सादृश्य उत्पन्न करण्याकरितांच जन्मास आलेले असतात. हिंदुत्वाच्या प्रसाराची गोष्ट अशी नाहीं. आचार, सण, उत्सव, मतें, विचारपद्धती, या बाबतींत हिंदू व अहिंदू लोकांत ऐक्य उत्पन्न करण्याची भिस्त हिंदूंकडून केवळ संघट्टनावर व कालावर ठेवली जाते आणि संघट्टन प्रादेशिक सान्निध्यावर सोंपविलें जातें. संघट्टन असलें म्हणजे कालांतरानें आचारादिकांचें एकत्व सहजच उत्पन्न होतें. संप्रदायांची गोष्ट अशी नाहीं. त्यांची प्रवृत्ति अगदीं वेगळी असते. आपण जें मानतों तें मानणारा आणि आपण जें मानीत नाहीं तें न मानणारा असा जो कोणी असेल, असल्या तर्हेची ज्याची मनोवृत्ति बनली असेल, त्यासच आपल्या संप्रदायांत स्थान द्यावयाचें आणि आपल्या समाजाचें सभासद करावयाचें, अशी संप्रदायी समाजांची प्रवृत्ति असते.
ख्रिस्ती आणि महंमदीय संप्रदायांचा प्रसार आणि हिंदूंचा संख्याक्षय पाहून हिंदूंची विस्तारपद्धति अगदींच नियमित प्रमाणानें लहानाचे मोठे संघ बनविण्याचे कामीं जगास उपयोगी पडणारी आहे असें काहीं लोकांस वाटेल. परंतु वस्तुतः अशी गोष्ट नाहीं. आजची स्थिती कांहींशी पालटल्यानंतर या हिंदु पद्धतीचें नवीन परिस्थितीस अनुरूप असें विकसन होईल, व या पद्धतीनेंच हळू हळू जगाचें ऐक्य होईल. विशिष्टसंप्रदायसंवर्धनपद्धति सर्व जगाचें ऐक्य घडवून आणण्यास केव्हांहि समर्थ होणार नाहीं. आजपर्यंत संप्रदायसंवर्धनपद्धति एकसमाज करण्यात बरीच उपयोगी पडली आणि जोपर्यंत जगांत अनेक जंगली लोक आहेत तोपर्यंत या पद्धतीच विकास होण्यासहि अडचण नाहीं. तथापि या पद्धतीची वाढ कांही काळानें खुंटणारच. स्पर्धा करणारे दोन संप्रदाय जगांत वावरत असले म्हणजे एक दुसर्याच्या उन्मूलनाची खटपट करीतच राहणार आणि त्या दोन संप्रदायांच्या लोकांमध्यें द्वेषबुद्धीहि वाढणार. जगांतील सर्व ख्रिस्ती मुसुलमान होतील काय ? नाहीं. जगांतील सर्व मुसुलमान ख्रिस्ती होतील काय ? नाहीं. संप्रदायाच्या अभिमानाचा आवेश संप्रदायाचे चालक वक्ते आपआपल्या लोकांत उत्पन्न करणार आणि भिन्न संप्रदायांचें अनिष्ट इच्छिणार व यामुळें समाजाच्या द्वैतास जोर मिळणार. परस्परांमध्यें द्वेष वाढविणारे विद्यमान संप्रदाय जागतिक कसे होतील ? केव्हांहि होणार नाहींत. हिंदुत्व ज्या रीतींनें तयार झालें ती रीति मात्र पुढें सर्वांवरच परिणाम करील. सर्व जगाच्या संस्कृतींतील सादृश्यें आणि प्रत्येक संस्कृतींतील उपयुक्त भागाची देवघेव यांच्या योगानें सर्व जगाच्या संस्कृतींचें एकीकरण होईल. सर्व जगास सामान्य अशा नीतिविषयक कल्पना उदय पावतील आणि ईश्वरदत्त म्हणून मानलेल्या किंवा दुसर्या कांही कारणांमुळें सोंवळ्या झालेल्या मंत्रांत या कल्पना उक्त नसल्या तरी त्यांचें अस्तित्व व प्रसार उपयुक्ततेमुळें शक्य होईल. तसेंच ग्रंथामध्यें संकुचित वृत्तीच्या ज्या कल्पना केवळ संप्रदायाच्या रक्षणासाठीं लिहिल्या असतील त्या कल्पना नाहींशा होतील. आज हिंदुस्थानामध्यें पुष्कळ माणसें कोणत्याहि संप्रदायाचीं नाहींत, तथापि सर्व जनतेला सामान्य अशा नैतिक कल्पनांनीं त्यांचें आयुष्यक्रमण होत आहे; अशी भावी जगाची स्थिति होईल. विशिष्ट संप्रदायांनां जें स्थान हिंदु संस्कृतींत आहे तें स्थान ख्रिस्ती व महंमदी संप्रदायांनां भावी जगत्संस्कृतींत राहील. राष्ट्रीय संस्कृतींत संप्रदायधर्मांस गौणत्व देण्याची परिस्थिति उत्पन्न होण्यास अमेरीकेंत सुरवातहि झाली आहे, ही गोष्ट संप्रदायबद्ध पाश्चात्त्य जगताच्या इतिहासांत लक्षांत घेण्यासारखी आहे.
प्राचीन कालीं 'हिंदुत्व' या कल्पनेची आजच्या हिंदूंच्या पूर्वजांमध्यें जाणीव नव्हती आणि हिंदूंचे आपला समाज निराळा बनवावा या हेतूनें स्थापित केलेले असे कांहीं धर्म नव्हते. लोक एखादी गोष्ट हिंदूंचा धर्म आहे किंवा नाहीं असा विचार करीत नसत. अमुक आचार हिंदु म्हणविणार्यास केल पाहिजे अशी भावनाच नव्हती. स्त्रीधर्म, पुरुषधर्म, वर्णाश्रमधर्म, कुलधर्म, जातिधर्म, राष्ट्रधर्म, स्थानधर्म यांपेक्षां विस्तृत धर्माची जी कल्पना होती ती मानवधर्माची होती. म्हणजे जातीच्या दृष्टीनें, पुरुष या नात्यानें, स्त्री या नात्यानें, किंवा स्थानविषयक अशीं जीं कर्तव्यें होतीं त्यांखेरीज इतर कर्तव्यें सर्व मनुष्यसमाजास लागू पडणारीं ऊर्फ मानवधर्म होत अशी विस्तृतभावना तेव्हां होती. या पद्धतीच्या यथोचित विकासाचा मध्येंच अवरोध व्हावयास ख्रिस्ती आणि महंमदी हे नियमित वर्गांमध्ये एकत्वभाव उत्पन्न करणारे दोन संप्रदाय कारण झाले.
जाति व राष्ट्र या विशिष्ट भावनांपेक्षां अधिक विस्तृत भावना हिंदूंमध्यें होत होती. तिच्या विस्तारास अडथळा करण्याचें श्रेय किंवा दोष प्रथम मुसुलमानांचा आहे. मुसुलमान आले ते एतद्देशीयांस हिंदू म्हणूं लागले. ते देशाचे नेते झाले. त्यांचा पगडा चोहोंकडे बसला आणि त्यांना ईश्वराच्या नांवानें अनन्वित कृत्यें केलीं. त्यांची उपासनापद्धति निराळी, त्यांचा आचार्यवर्ग निराळा. जित राष्ट्राच्या संस्कृतीविषयीं बराचसा तिरस्कारहि त्यांचे ठिकाणीं वसत होता. या त्यांच्या अनेक गोष्टींमुळें आणि क्रौर्यामुळें मुसुलमान म्हणजे केवळ भिन्नविचारयुक्त लोक असे न वाटतां स्वतःशीं संबंध असण्यास अयोग्य अशी दैत्यांची ती जात आहे कीं काय असें हिंदूंस वाटलें. ख्रिस्तांशीं संबंध आला तो प्रथम प्रामुख्यानें पोर्तुगीजांशीं आला; आणि पोर्तुगीजांचेंहि स्वरूप हिंदूंस मुसुलमानांसारखेंच दिसलें. क्रौर्य, भक्ष्याभक्ष्यविषयक 'अशुद्धता' याच गोष्टी बाह्यांसंबंधानें हिंदूस दिसत असल्यामुळें जुने तिरस्कारवाचक आणि पावित्र्यदृष्टीनें कनिष्ठतावाचक शब्द जे हूण किंवा यवन तेच त्यांस लावण्यांत आले.
जर हिंदू आणि इतर यांमधील अंतर तत्त्वतः हिंदूंतील दोन जातींतील अंतरापेक्षां निराळें नाहीं आणि संप्रदाय हे वस्तुतः जातिस्वरूपी नसून मत व उपासना यांपुरते संघ आहेत, तर हिंदूंपैकींच जीं माणसें ख्रिस्ती किंवा मुसुलमान मत स्वीकारतात त्यांनां हिंदू म्हणण्यास कोणती हरकत आहे ? आणि मुसुलमान आणि ख्रिस्ती हे हिंदूंतीलच दोन संप्रदाय समजण्यास कोणती हरकत आहे ? हरकत कोणतीच नाहीं. त्यांस असें न म्हणण्याचें मुख्य कारण एवढेंच कीं भारतीय ख्रिस्ती किंवा मुसुलमान हे आपणांस हिंदू म्हणवीत नाहींत. मग प्रश्न असा उपस्थित होतो कीं एखादा संप्रदाय किंवा जात हिंदू आहे किंवा नाहीं हें ठरविण्यास कांहीं प्रमाण आहे कीं तें एखाद्या जातीच्या किंवा संप्रदायाच्या स्वेच्छेवर आहे ? या प्रश्नास उत्तर हेंच कीं, हिंदू या नांवावर अधिकार स्थापित करणें हें जातीच्या किंवा संप्रदायाच्या इच्छेवरच आहे. मुसुलमान व ख्रिस्ती हे दोन समाज विशिष्टपरमार्थसाधनमूलक आहेत आणि ते हिंदुसमाजाशीं स्पर्धा करीत आहेत. या स्पर्धा करणार्या समाजांकडे पाहून हिंदूंस आपलेंहि विशिष्ट मत कांहीं तरी आहे किंवा असावें असें वाटतें. असें विशिष्ट मत नसलें तर आपल्याकडे कांहीं तरी कमीपणा येतो अशा तर्हेची धास्ती वाटून हिंदूंचीं मतें काय आहेत याविषयीं कित्येक हिंदुत्वाभिमानी 'हिंदुधर्मा'चीं लक्षणें शोधावयास लागतात. अशाच कांही कारणपरंपरेनें समाजशास्त्राविषयींचें एक अनभिज्ञपणाचें मत लो. बाळ गंगाधर टिळक यांनीं प्रसृत केलें आहे. तें "प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता उपास्यानामनियम एतद्धर्मस्य लक्षणम्" असें आहे. उपास्यांचा अनियम आणि साधनांचें अनेकत्व हें समाजाचें लक्षण होईल. वरील लक्षणांत हिंदु हें पद विशिष्ट उपास्य किंवा उपासनापद्धति यांवर अवलंबून नाहीं असेंच म्हटल्यासारखें आहे. हें लक्षण धर्माचें म्हणण्यापेक्षां समाजाचें म्हटल्यास अधिक बरोबर होईल. जें धर्मशास्त्र किंवा कायदा हिंदू मानतात त्याचें तात्त्विकदृष्ट्या वेदांविषयीं प्रामाण्यबुद्धि हें मूल होय. तथापि वेदाविषयीं प्रामाण्यबुद्धि नसलेला वर्ग हिंदु नव्हे असें जर आपण धरावयास लागलों तर सांख्य तत्त्ववेत्त्यांचा वर्ग हिंदूंच्या बाहेर पडणार नाहीं काय ? वेदोक्तधर्म आचरणारे ज्या समाजांत शेंकडा जवळजवळ पूज्य आढळतील, त्या जनतेस वेदाविषयीं प्रामाण्यबुद्धि कितपत आहे असें म्हणावें ? शिवाय ज्या समाजात शेंकडा नव्याण्णव लोकांनीं किंवा दर हजारांत नऊशें नव्याण्णव लोकांनीं सर्व जन्मांत वेदग्रंथ कधींहि उघडून पाहिला नसेल ते अपरिचित आचाराशीं प्रसंग आला तर वेदाविषयीं प्रामाण्यबुद्धि तरी कितपत ठेवतील ? तसेंच, आपण वेद वगैरे कांही जाणत नाहीं, विठ्ठला आम्ही तुलाच जाणतों, असें म्हणणार्या अनेक भगवद्भक्तांची वाट काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रा. बाळ गंगाधर टिळक यांच्या व्याख्येंत उपयुक्तता कांहींच नाहीं असें नाहीं. 'उपास्यानामनियमः' आणि 'साधनानामनेकता' या दोन पदांनीं हिंदुसमाज हा विशिष्टपरमार्थसाधनमूलक असा संप्रदाय नाहीं ही गोष्ट त्यांनीं दाखविला आहे; आणि 'प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु' या वाक्यानें त्यांनीं हिंदुसमाजांतील अनेक व्यक्ती आणि जाती एकत्र बांधण्यास जें बंधन कांहीं अंशीं उपयोगी पडतें तें दिलें आहे. ही प्रामाण्यबुद्धि हें एक महत्त्वाचें बंधन आहे यांत शंका नाहीं.
हिंदुसमाजाची यथार्थ कल्पना मनांत येण्यास आपण लांकडाचा एक मोठा गठ्ठा मनांत आणावा. तो असा कीं, सर्व लांकडें एकाच दोरीनें बांधलेलीं नाहींत. त्यांत दहापांच लांकडें एका मोळींत बांधलीं आहेत अशा अनेक मोळ्या असून या मोळ्यांपैकीं कांहीं मोळ्या एका दोरीनें बांधल्या आहेत, या एका दोरीनें बांधलेल्या मोळ्यांपैकीं कांहीं मोळ्या व बाहेरचीं कांहीं लांकडें यांच्याभोवतीं एक दुसराच दोर आहे, व असे निरनिराळ्या प्रकारचे निरनिराळे जुडगे एकमेकांशीं बांधले गेल्यामुळें तो गठ्ठा एकत्र राहिला आहे. या गठ्ठ्याप्रमाणें हिंदु समाजाची स्थिति आहे. हिंदू लोकांस एकत्र बांधणारें सर्वव्यापी असें बंधन कोणतेंच नाहीं. हिंदू लोक आज जे एकमेकांशीं बांधले गेले आहेत, ते अनेक ग्रंथींनीं व अनेक बंधनांनीं बांधले गेले आहेत. असो.
हिंदु समाजास वेदप्रामाण्य हें जसें एक बंधन मानलें जातें तसें दुसरें बंधन म्हणजे ब्राह्मणांची जात हें होय. ब्राह्मणांस मानणारे ते हिंदू असें लक्षण केलें तर तें जरी पूर्णपणें बरोबर होणार नाहीं तरी बरेंच व्यापक होईल. पुष्कळ जाती अशा आहेत कीं, त्यांस ब्राह्मणांचें समाजांतील प्रथमस्थान मान्य आहे. ब्राह्मणांचें श्रेष्ठत्व ज्यांस नाखुषींनें मान्य करावें लागतें असा कांही वर्ग अर्थात् आहेच. ब्राह्मणांचें बंधन जैनांसहि आहे. कर्नाटकांतील जैन सोडून दिले तर इतरत्र लग्नें लावण्यासाठीं ब्राह्मणांचीच योजना जैन करीत असतात. अलीकडे उत्तरहिंदुस्थानांत कांहीं जैन आपले नवीन उपाध्ये करीत आहेत आणि जैन यती त्या प्रयत्नास उत्तेजन देत आहेत. संस्कार आणि परमार्थसाधन या दोन गोष्टी भिन्न आहेत. ब्राह्मणांमार्फत संस्कार ही लौकिक गोष्ट आहे. ही परंपरागत भावना काढून टाकून जैनांचें पृथक्त्व स्थापित करावें अशी खटपट पुष्कळांकडून होऊं लागली आहे. हा प्रयत्न थोडाबहुत आपण 'हिंदु' या सदरांत येत नाहीं असें दाखविण्यासाठीं आहे. लॉर्ड मोर्ले यांनीं मुसुलमानांस जेव्हां निराळे अधिकार दिले तेव्हां हिंदु नसणें अधिक फायद्याचें झालें असें पुष्कळांस वाटलें आणि आपण हिंदु नाहीं, आम्हांस स्वतंत्र प्रतिनिधी पाहिजेत अशी चळवळ सुरू झाली. या आजकालच्या गोष्टी सोडून दिल्या तर ब्राह्मणांस जैन देखील आपले संस्कर्ते समजतात हें लक्षांत येतें. ब्राह्मणांचें समाजांतील स्थान आहे तें संस्कर्ते या नात्यानेंच आहे. कोणी मुसुलमान फकिराचा उपदेश घेतला तरी तो जातिभ्रष्ट होत नाहीं. किंवा कोणी थिऑसफिस्ट झाला तरी त्यास हिंदुसमाजांतून गचांडी मिळत नाहीं. उपदेश घ्यावयास मुसुलमानाकडे, महाराकडे, किंवा ख्रिस्त्याकडे जाण्याचा जरी कोणाहि हिंदूस संकोच वाटला नाहीं तरी लग्न लावण्यासाठीं किंवा मुलाची मुंज करण्यासाठीं कोणीहि ब्राह्मणेतर हिंदूंस आणीलसें वाटत नाहीं. सत्यशोधकसमाजानें ब्राह्मणेतर जातीचे उपाध्ये अस्तित्वांत आणले आहेत. ही चळवळ जर कांही दिवसांनीं बंद पडली तर सर्वच लोक पूर्वपदावर येतील आणि वाढंत गेली तर ब्राह्मण म्हणविणारी आणखी एक जात तयार होईल. लिंगायतांतील कांहीं वर्ग आपणांस ब्राह्मण म्हणवूं लागला आहे.
जातीच्या स्वरूपावरून आणि मतावरून कोणत्या प्रकारच्या ब्राह्मणांनीं तिचें पौरोहित्य करावें हें ठरतें आणि उलटपक्षीं ज्या प्रकारचे ब्राह्मण पौरोहित्यास लागतात त्यांच्या स्वरूपावरून किंवा समाजांतील स्थानावरून त्यांच्याकडून पौरोहित्य करून घेणार्या वर्गाचें समाजांत स्थान ठरतें. ब्राह्मणांब्राह्मणांतच कांहीं जाती उच्च समजल्या जातात आणि कांहीं कमी दर्जाच्या समजल्या जातात. ज्या कमी दर्जाच्या समजल्या जातात त्यांच्याकडून पौरोहित्य करून घेणार्या जातींसहि
कमीपणा येतो. या प्रकारच्या परिस्थितीचे दोन परिणाम घडतात. नवीन निघालेल्या संप्रदायास पुन्हां वक्री अवलोकन करून जुन्या ब्राह्मणांकडेसच यावें लागतें, किंवा जातिकनिष्टत्व पत्करावें लागतें. कांहीं भंग्यांसारख्या जाती आहेत, त्या आम्ही ब्राह्मणांच्या हातचें खात नाहीं, जातीच्या नियमांप्रमाणें तसें करणें आम्हांस निषिद्ध आहे, असें सांगतात; आणि सरकारी रिपोर्टातून या जाती ब्राह्मणांच्या हातचें खात नाहींत असें लिहिलेलें आढळतें; पण व्यवहारांत तसें कांहीं दिसत नाहीं. ब्राह्मण, कायस्थप्रभु, कुणबी, मराठे, हे घरांतील उष्टें व उरलेलें अन्न भंग्यांस देतात आणि तें ते घेऊन जातात हें आपण दररोज पहातोंच.
अद्यापिहि अनेक जाती अशा आहेत कीं त्यांजवर ब्राह्मणांची छाप पडलेली नाहीं. गोंडांसारख्या ज्या वन्य जाती आहेत त्यांपैकीं पुष्कळांस ब्राह्मणाचा संपर्कच नाहीं. भिल्ल, गोंड, कातकरी, महार यांची लग्नें लावावयास ब्राह्मण जात नाहींत. ते आपला कोणीतरी मोहोरक्या ठेवून त्याच्या मार्फत
लग्न करितात. कांहीं ठिकाणीं ब्राह्मण कुणब्यांच्याकडे पाट लावण्यास जात नाहींत. पाट हें एक कनिष्ठ प्रकारचें लग्न आहे. कनिष्ठ प्रकारचें लग्न लावण्यास ब्राह्मण लागत नाहींत. मध्यप्रांतांत मालगुजार पाट लावण्याची परवानगी देण्यासाठीं फी वगैरे अजून घेतात. पूर्वीं हा अधिकार भोंसल्याच्याकडे होता आणि त्यामुळें थोडाबहुत गैरसमजहि उत्पन्न झाला होता. चार्लस ग्रँट यानें मध्यप्रांताच्या ग्याझेटिअरमध्यें अशी एक शंका ध्वनित केली आहे कीं, विधवांस संस्थानाच्या फायद्याकरितां विकीत असत. ब्राह्मणांऐवजीं सजातीयांकडून किंवा स्थानिक मोठ्या मनुष्याकडून लग्नें लावून घेण्याची चाल म्हणजे 'सिव्हिल म्यारेज' फार पूर्वापार चालत आहे. त्यानें ब्राह्मणाचा अधिकार नष्ट झाला किंवा नाकबूल झाला असें मात्र नाहीं. जी लग्नें लावण्यास ब्राह्मण कचरतात किंवा नाखूष असतात अशांचेंच लग्न या पद्धतीनें होतें.
भिन्न भिन्न मतांमुळें ब्राह्मणांत भिन्नता आढळते तशी ती इतरांतहि आढळते. तथापि ब्राह्मणांचें प्रयोजन उपास्यमूलक नसल्यानें भिन्न उपास्याचे वर्गहि ब्राह्मणांनां पौरोहित्यासाठीं बोलावितात. ब्रह्मदेशचे राजे लग्नव्यवहारासाठीं ब्राह्मणांस बोलावित असत. मनुष्य वेदांती असो अगर जैन असो, त्यानें आपलें परमार्थसाधन स्वेच्छेप्रमाणें करावें आणि संस्कारकर्में मात्र ब्राह्मणांकडून करवून घ्यावींत हा प्रकार सर्वत्र रूढ आहे. खुद्द ब्राह्मणांतच देवळांतील पुजार्यांचें, क्षेत्रांतील भिक्षुकीचें, या प्रकारचीं कामें हलकीं समजलीं जातात. पारमार्थिक कामांत ब्राह्मणेतर पुष्कळ आहेत. उदाहरणार्थ, गुरव हे शिवमंदिरांत पुजारी असतात. यावरून असें दिसतें कीं समाजांतील संस्कर्तृपद ब्राह्मणांनीं आपल्या हातीं राखिलें आणि पारमार्थिक कर्म मात्र सर्व जनांच्या स्पर्धेसाठीं मोकळें ठेवलें. पुराण सांगणें, कीर्तन करणें, गुरूमंत्र देणें इत्यादि गोष्टींत जरी ब्राह्मणांचेंच प्रामुख्य आहे तरी त्यांत इतर जातींचेंहि भासून येण्यासारखें अस्तित्व आहे.
ब्राह्मणांचें पद भारतीय समाजांत बरेंचसें अचल राहण्यास कारण हें कीं, राज्यक्रान्त्या अनेक होऊन क्षत्रिय वर्ग अनिश्चित होत होता, व विचारस्वातंत्र्य बरेंच वाढून त्यामुळें अनेक पारमार्थिक मतें आणि अनेक उपास्यें येत होतीं व जात होतीं, अशा परिवर्तनाच्या दिर्घ काळांत समाजांतील स्थैर्याला कारण आणि सर्वमान्य अशा वेदविद्येला अधिष्ठान जर कोणी झालें असेल तर ती एक ब्राह्मणांचीच जात होय.
वेद आणि ब्राह्मण यांशिवाय हिंदुसमाजांतर्गत विविध जनतेस एकत्र बांधणारीं अशीं जीं बंधनें आहेत तीं येणेंप्रमाणें : (१) ज्या कनिष्ठ जाती आहेत आणि ज्या पुष्कळांस वेदाधिकार नाहीं आणि ब्राह्मण पौरोहित्य देखील ज्यांच्या आवांक्याबाहेर आहे त्या जातींनां ब्राह्मण व वेद यांविषयीं आदरबुद्धि असल्यानें त्या बहुतेक समाजास बांधल्या गेल्या आहेत. (२) शूद्रादि मंडळीस असल्यामुळें वेदाधिकार नाहीं तरी त्यांना महाभारतासारखे इतिहासपुराणादि ग्रंथ वाचण्यास अधिकार असल्यामुळें आणि या ग्रंथांचाच विशेष प्रचार सर्व हिंदूंत असल्यामुळें आजच्या पुराणोक्त धर्मास अधिकारी असलेला शूद्रवर्ग आणि वेदास अधिकार असूनहि कांहींच येत नसलेला ब्राह्मणवर्ग हे दोघे एकत्र बांधले गेले आहेत. (३) सामान्य उपास्यें, सामान्य दैवतें आणि सामान्य सण यांचें बंधन बर्याच हिंदूंस एकत्र बांधीत आहे. (४) पुनर्जन्म आणि कर्मवाद यांसारखीं अनेक मतें समाजांतील जवळ जवळ सर्व लोकांस एकत्र बांधितात. (५) अनेक जातींची उत्पत्ति पुराणांतून दैवतांपासून किंवा ऋषींपासून वर्णिली आहे आणि तन्मूलक भावनांनीं बर्याच लोकांस एकत्र बद्ध ठेविलेलें आहे. शिवाय जीं अनेक दैवतें खेडोखेडीं आणि निरनिराळ्या जातींत आढळतात तीं दैवतें वेदांततत्त्वानें एकत्र जोडलीं गेलीं असल्यामुळें जेव्हां कोणी मनुष्य आपल्या दैवतांपलीकडे पाहूं लागतो तेव्हां सर्वव्यापी वेदांततत्त्वाकडे त्याला आपल्या पैतृक उपासनामार्गानें वळणें शक्य झालें आहे, आणि विविध उपासनामार्गांच्या या फलसाम्यामुळेंहि या विविध मार्गांतील लोक एकप्रकारच्या ऐक्यभावानें बांधले गेले आहेत. ग्रहशांति, ज्योतिष, शकुनांवर भरंवसा, भुतें काढण्याची विद्या, मंत्रांवर विश्वास या गोष्टींनीं हिंदूंच्या विद्येस पारशी व मुसुलमानांपैकींहि कांहि लोक बांधले गेले आहेत.