प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण ९ वें.
वैद्यक-भारतीय व पाश्चात्त्य     
 
गेलेनची व्यवहारचतुरता व रोमन बादशहाचा त्यास आश्रय.—  रोमन लोक गेलेनला अत्यंत व्यवहारचतुर वैद्य म्हणून मान देत असत. रोमन बादशहा मार्कस ऑरीलिअस यानें त्याला रोम येथें बोलावून आपला मुलगा कॉमोडस याच्या खास तैनातींत दिलें होतें, व तो आपणहि स्वतः औषधोपचारांच्या बाबतींत प्रसंगविशेषीं त्याचा सल्ला घेत असे. एकदां बादशहाच्या तैनातींत असलेल्या तीन लष्करी वैद्यांनीं बादशहाला ताप येणार असें सांगितलें. या वेळची हकीकत गेलेननें स्वतः लिहून ठेविली आहे तींत तो म्हणतो: “त्या वेळीं खुद्द बादशहाचा हुकूम झाल्यावरून मी त्याची नाडी पाहिली, तेव्हां ती नेहमींप्रमाणेंच नीट चालू असलेली मला आढळून आली. तें पाहून आणि बादशहाचें वय व ती विशिष्ट वेळ लक्षांत घेऊन प्रकृतीच्या अस्वास्थ्याचें कारण ज्वर नसून अपचन हें आहे असे मीं सांगितलें. तें बादशहाला पूर्ण पटून तो एकदम तीनदां म्हणाला, ‘हेंच बरोबर, हेंच त्याचें कारण.’ नंतर याला उपाय काय करावा म्हणून बादशहानें विचारलें. तेव्हां सामान्य लोकांनां असल्या अपचनावर मी फक्त ग्लासभर मद्य मिरपूड टाकून देत असतों; पण आपण बादशहा, आपणास त्याहूनहि खात्रांलायक उपाय पाहिजे म्हणून आपण नार्ड नांवाच्या सुगंधि वनस्पतीच्या कढत केलेल्या उटींत लोंकरीच्या कापडाची पट्टी भिजवून तिचा उपयोग करावा, असें मीं त्यास सांगितलें. त्याबरोबर त्यानें लोंकरीच्या कापडाची पट्टी व मद्य वैगेरे जरूर असलेले जिन्नस मागविले, व मीहि बादशहाची परवानगी घेऊन निघून गेलों. बादशहानें कढत हातांनीं पाय चोळावयास सांगून उष्णता उत्पन्न करवली व मिरपूडमिश्रित मद्यहि घेतलें. नंतर तो पिथोलॉस (राजपुत्राचा शिक्षक) यास म्हणाला, ‘खरा लायक वैद्य असा माझ्या पदरीं एकच आहे, व तो अत्यंत प्रामाणिकहि आहे.’ असें म्हणून बादशहानें त्याच्याजवळ ‘गेलेन हा सर्व वैद्यांत श्रेष्ठ असून शिवाय तत्त्ववेत्ताहि आहे’ अशी माझी फार स्तुति केली. कारण, माझ्याखेरीज इतर सर्व वैद्य पैशाचे मोठे लोभी असून शिवाय भांडखोर, महत्त्वाकांक्षी, मत्सरी व द्वेषी असल्याचें बादशहास आढळून आलें होतें.”