प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २४ वें.
भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास.

दैवतें.- वेदकालीन दैवतें उपनिषत्कालांतच मागें पडलीं. ॠग्मंत्रोत्पततीच्या वेळेस स्थानिक आर्यनसंस्कृतीच्या लोकांत शिव, विष्णु हीं दैवतें असावींत. कारण एरवी शिव आणि विष्णु यांचें उच्चत्व दैवतांत कसें स्थापन झालें याच्या पाय-या सापडल्या असत्या त्या तशा चांगल्या त-हेनें सांपडत नाहींत. औपनिषद वाङ्मय हें सूतसंस्कृतीच्या लोकांचे वाङ्मय असावें व शिव, विष्णु हीं त्यांचींच दैवतें असावींत. शिव आणि विष्णु हे देव वैदिक लोकांसहि मान्य असल्यामुळें नवागतांचें स्थानिकांत समाविष्टीकरण सुलभ झाले. शिवाचें आजचे स्वरूप ज्या अर्थीं ब्राह्मणकालीन यजुर्वेदाच्या संहितांमधूनहि आलेलें आहे त्या अर्थीं ते फार जुनें असावें आणि ज्या पद्धतीनें शुनःशेपाच्या वरुणस्तुतीचा हरिश्चंद्रकथेशीं संबंध जोडण्यांत आला, व ज्या पद्धतीनें इतिहासपुराणांनां यज्ञप्रसंगीं शंसनाचा मान प्राप्त झाला त्या पद्धतीनेंच शिवाला वेदांत स्थान मिळालें असावें यांत शंका नाहीं. रामायण-  महाभारतांत शिव, विष्णु हे निश्चिताधिकार सर्वेश्वरकल्प देव म्हणून सापडतात.

ॠग्मंत्रकालीन लोकांनीं आपल्याबरोबर लहान यागांचा धर्म आणिला. तो हिंदुस्थानांत मध्य देशांत विकसित श्रौत धर्माचें स्वरूप पावला. तो तें स्वरूप पावतांनां देश्य धर्मांचा म्हणजे शिवविष्णुपूजन, महापुरुषवर्णनपर सूत वाङ्मय, यक्षकिन्नरमय देवयोनी यांचा स्वीकार करावा लागला. आमची कल्पना अशी आहे कीं, सामान्य जनांचा धर्म वेदकालीं जसा होता तसाच तो आज आहे. फरक झाला तो केवळ वरच्या साक्षर वर्गाच्या प्रवृत्तींत झाला. ज्या वेळेस श्रौंत धर्म मोठ्या विकसित स्वरूपांत होता त्या वेळेंस सामान्य लोक आजच्या दैवतांसारखींच दैवतें पूजित असावेत आणि त्या दैवतांत शिवविष्णूंस महत्त्वाचें स्थान प्राप्त झालें असावें. सुशिक्षित वर्ग यज्ञ सोडून हळू हळू आरण्याकीय विचारप्रवर्तनास लागला तोच वेदांगांच्या प्रवर्तनास लागला. भगवतांचा नारायणगीय धर्म व पुढें विकसित झालेला आराध्यांचा शैव धर्म हे उच्च विचार आणि सामान्य जनांचे रिवाज व मतें यांत सांधा जोडण्याच्या खटपटीस लागले.

शंकराचार्य विशिष्ट दैवताच्या महत्त्वस्थापनेच्या भानगडींत पडले नाहींत. बसवाचे अनुयायी आपलें मत शांकरमतास सुटून नाहीं असें म्हणतात. रामानुज आणि पूर्णप्रज्ञ मध्व यांनीं विष्णुभक्तीस विशेष जोर दिला. त्यामुळें विशिष्टाद्वैत व शुद्धाद्वैत यांतील उढा शिवविष्णुप्रियतेवर येऊं पहातो.