प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २४ वें.
भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास.

रामानंद व त्याचे शिष्य - धार्मिक अर्वाचीन काळ रामानंदापासून सुरू होतो. रामानंद हा प्रथम रामानुजाच्याच परंपरेंतला होता पण तो पुढें शांकरमतानुयायी झाला. याचें कार्य फार व्यापक होतें. त्याच्या कार्याची व्यापकता त्याच्या शिष्यांच्या कार्यावरून सहज लक्षांत येईल. त्याचे मोठे शिप्य म्हटले म्हणजे ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलचैतन्य, नानक, कबीर हे होत. यांचा बंगालच्या चैतन्य संप्रदायाशी देखील संबंध असणें शक्य आहे. रामानंदाचें मुख्य कार्य म्हटलें म्हणजे वेदांततत्त्वें हीं केवळ संस्कृतपंडितांकरतांनसून प्राकृतांकरतां आहेत असें व्यवहारांत घडवून आणावयाचें. चोहोंकडे जी सामान्यांत एक त-हेची धर्मश्रद्धा उत्पन्न झाली, संतमंडळे चोहोंकडे स्थापन झालीं, भक्तीस जोर मिळाला त्या सर्व चळवळीचें आदिकर्तृत्य रामानंदाकडे येतें. रामानंदानंतर लोकांत निराळा संप्रदाय, निराळे आचार व विधी उत्पन्न न करतां कार्य करणारे अर्वाचीन काळापर्यंत कोणी मोठे कार्यकर्ते झाले नाहींत. बसवाचें कार्य मोठें होतें आणि बसवाचीं मतें सर्व हिंदुस्थानभर पसरलीं असतीं तर आज ज्या सुधारणांसाठीं तडफड चालली आहे ती सुधारणा घडवून आणण्याचें श्रेय बसवास मिळालें असतें. बसव, स्वामीनारायण, वल्लभाचार्य, महानुभाव यांच्यानंतर भारतीय पारमार्थिक भावनेला जागृत करण्याचें श्रेय राजा राममोहनराय व स्वामी दयानंद यांच्याकडे येतें. स्वामी दयानंदाच्या प्रयत्नानें पंजाबांतील मृत हिंदुत्वास सजीव केलें तर राममोहनरायांनीं धैर्यानें आणि व्यापकपणानें धार्मिक बाबतींत विचार करण्यास लोकांस शिकविलें.

राममोहनराय यांचें कार्य क्षेत्राने अल्प आहे आणि आज दुर्बळ असलेला हिंदू समाज उदारमतवादानें अधिक दुर्बल होईल अशी लोकांस भीति वाटत असल्यामुळें आणि सुशिक्षित वर्गामध्यें पारमार्थिक बाबतींत संशयवाद असल्यामुळें एकीकडे परलोक आहे असें मानणा-या आणि परलोकास जाण्याच्या पद्धतीमध्यें व्यापकपणा आणूं पहाणा-या ब्रह्मसमाजास अनुयायी मिळविण्यास फारसें यश मिळणार नाही तरी त्या समाजाच्या अस्तित्वाचा कांहीं तरी इष्ट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीं. थिआसफी नांवाचा संप्रदाय सुरू झाला आहे. त्याचा बाणा जरी ईश्वरविषयक शोध करण्याचा असला तरी त्याबरोबर कांहीं हट्टवादी नवीन विचार लोकांवर लादले गेल्याशिवाय राहिले नाहींत.