प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २४ वें.
भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास.

विज्ञानेतिहासांत हिंदुस्थानच्या बौद्धिक इतिहासाचा कांहीं भाग दिलाच आहे. त्यांत संगीत, छंद, भाषाशास्त्रें त्याचप्रमाणें ज्योतिष, वैद्यक, रसायन यांचा विकास हाहि वर्णिलाच आहे. तत्त्वज्ञानापैकीं देखील पूर्वविधानाचा अर्थ लागणारें शास्त्र जें मीमांसा त्याचें स्वरूप वर्णिलें आहे. तथापि पारमार्थिक विचार आणि समाजनियमनात्मक धर्मशास्त्र यांचा विकास वर्णावयाचा राहिला. त्याचें अत्यंत त्रोटक वर्णन येथें करण्याचें योजिलें आहे. येथें अत्यंत त्रोटक वर्णन करण्याचें मुख्य कारण हेंच आहे कीं यांत आलेले ग्रंथकार सुशिक्षित वाचकांस पूर्ण परिचित आहेत; आणि त्यांविषयीं सविस्तर माहिती शरीरखंडातच देणें योग्य होईल.

 परमार्थसाधनविषयक भारतीयांचा प्रयत्न म्हणजे ब्राह्मणकालीन विकासविलेला श्रौतधर्म होय. हा श्रौतधर्म वेदविद्या या विभागात सविस्तर वर्णिला आहे. श्रौतधर्मसंकोचास कारण कोणत्या चळवळी झाल्या त्याचेंहि विवेचन वेदविद्या या विभागांत येऊन गेलेंच आहे. थोडक्यात सांगावयाचें म्हटलें म्हणजे असें सांगतां येईल कीं, यज्ञयागांच्या विकासकालीं वैयक्तिक कर्तव्य केवळ यज्ञ करणारा कोणी यजमान तयार झाला व त्यानें वर्गणी गोहा करण्यासाठीं सनीहार पाठविले तर त्यांस द्रव्य द्यावयाचें आणि आपण यज्ञ तेवढा डोळ्यांनीं तमाशासारखा पहावयाचा, एवढेंच उरलें असल्यामुळें लोकांस काहीं निराळा मार्ग हवा होता. त्यामुळें भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यांच्या विकासास क्षेत्र मिळालें. भक्तिमार्गास जें क्षेत्र मिळालें त्याचा परिणाम नारायणीय धर्म म्हणून मागें वर्णिलाच आहे. बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळीचा भाग म्हटला म्हणजे उपनिषदें व तन्मूलक तत्त्वज्ञान होय. त्याच वेळेस आचरणास महत्त्व आलें असावें. कारण आचरणास महत्त्व सांगणा-या बौद्धांनी धम्म हा शब्द आपल्या आचरणप्रधान पद्धतीस लावला होता. धर्म हा शब्द श्रौतविधींपासून हिसकावून घेऊन पुढें धर्मशास्त्रकारांनीं चार वर्ण आणि चार आश्रम यांचा उपदेश करणा-या पद्धतीस लावला. मीमांसाकारांनीं धर्म म्हणजे तीन अग्नींवरील क्रिया असें अट्टाहासानें सांगितलें असतांहि आणि यज्ञ अगर यज्ञांगभूत कर्में असाच धर्म याचा अर्थ वेदांत असतांहि स्मृतिकारांनीं धर्म म्हणून कांहीं निराळा आहे असें दाखविण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न ''श्रुतिस्तुवेदोविज्ञेयो धर्मशास्त्रं तुं वै स्मृतिः'' या मनुस्मृतिवाक्यांत स्पष्ट दिसत आहे. तसेंच कलपसूत्राचे वर्ग करून त्यांत श्रौतास गृह्य आणि धर्म यांशीं समान महत्त्वाचें पद दिलें म्हणजे कल्पसूत्रांच्या वर्गीकरणांत श्रौतविद्या म्हणजे धर्म नव्हे या तत्त्वास मान्यता दिली. वेदविद्येस धर्मापासून पृथक्त्व हें धर्मशास्त्रकारांनीं बंड करण्याच्या उद्देशानें दिलें नसावें, तर भाग पडलें म्हणून दिलें असावें. अथर्व्यांची कांहीं विद्या त्रैविद्यांनीं श्रौतविद्येंत अंतर्भूत केली तर कांहीं गृह्यसूत्रांत समाविष्ट केली आणि श्रौतगृह्य संस्थांस, धर्माची व्याख्या निराळी केली तरी त्या व्याख्येनुसार धर्माची पुष्टि दिली. जेव्हां बौद्ध व जैन धर्म म्हणजे कांहीं निराळीच चीज आहे व नारायणीय धर्मवाले धर्म याचाहि निराळाच अर्थ आहे असें सांगू लागले तेव्हां श्रोतविद्येशीं सहानुभूति बाळगणा-या लोकांनां ''धर्म'' शब्दाचा अर्थ अशा निराळ्या रीतीनें सांगावा लागला कीं, अप्रिय झालेल्या धर्माचें श्रौत विद्येशीं एकत्व स्थापन झालें नाहीं, तरी चार वर्ण आणि चार आश्रम यांची कर्तव्यकर्में सांगतांना श्रौतगृह्यसंस्थांना स्वीकार ही गोष्ट वर्णाश्रमधर्मविवरणांत अंतर्भूत करून धर्माचें स्वरूप श्रौतापेक्षां व्यापक पण श्रौत न सोडणारें निदान वेदाभ्यासाचें महत्त्व ठेवणारें बनवावें लागले. ''धर्म'' शब्द महत्त्व पावलां होता तो बौद्धांनीं नैतिक आचरणांस लावला तर जुन्या सहानुभूति बाळगणा-यास विधिमिश्र आचरणास लावावा लागला. श्रौत कर्म आणि धर्म हे शब्द समानार्थक असून एकाच व्यापकतेचे होत असा जैमिनीचा आग्रह होता. तो जर मान्य केला तर असें होणार कीं, लग्न-मुंज इत्यादि संस्कार हा काहीं धर्म नव्हे. हा सारा व्यवहार जेव्हां यज्ञविज्ञ करावयाचा असेल तेव्हां अगदी वेदाक्षराप्रमाणें चालावें आणि त्यानें आपणांस बांधून घ्यावें. बाकी इतर गोष्टी म्हणजे व्यवहार, त्यांत आपण कांहीं केलें तरी तें धर्मबाह्य होत नाही असा सिद्धांत सहजपणें त्यांतून निघावयाचा. हें झालें म्हणजे वाटेल तें आचरण करून व्यक्तीस आपण पुन्हां धर्माचा अतिक्रम इतरापेक्षां मुळींच करीत नाहीं असें सप्रमाण सिद्ध करून देतां येईल. याच्यासाठीं धर्म या शब्दाचा अर्थ जैमिनीपासून निराळा पण अधिक व्यापक करणें त्या वेळच्या कल्पसूत्रलेखकांस भाग पडलें.