पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड
प्रकरण ७ वें
सांपत्तिक स्थिती
अकबरपासून औरंगझेबापर्यंत - अकबराच्या कारकीर्दीतील भारतीय नौकानयनाची व नौकाबंधनाची वाढ त्याच्या मृत्यूनंतरहि पुढें चालू राहिली. इ.स. १६०५ मध्यें बंगालचा सुभेदार इस्लामखान यानें राजधानीचें ठिकाण राजमहालहून डाक्का येथें हलविलें व अफगाण आणि मग यांचे हल्ले परताविण्याकरितां आरमार व तोफखाना वाढविला. जहांगीरच्या कारकीर्दीत मग चांचे लोक लुटीकरितां डाक्का येथें येत व वस्तुतः संबंध बंगाल ते आपली जहांगीर समजत असें एक तत्कालीन इतिहासकार म्हणतो. अकबराच्या अखेरच्या दिवसांत व पुढेंहि शहाजहानच्या कारकीर्दीत पूर्वबंगालच्या सरहद्दीवरील टोळ्या मोंगल राज्याला फार पीडा देत असत. हा प्रदेश कुचबिहार आणि आसाम यांच्या हद्दीत असें. इस. १५९६ मध्यें कुचबिहारचा राजा लछमी (लक्ष्मी) नारायण यावर सरकारी मोहीम निघाली होती. राजाच्या सैन्यांत ४००० घोडदळ, २००००० पायदळ, ७०० हत्ती आणि १००० जहाजांचें आरमार होते. इ.स. १६०० त कुच हा जोचा राजा परिचत याच्या आरमाराला तोंड देण्याकरितां ५०० जहाजांचें बादशाही आरमार पाठविण्यांत आलें होतें. या सुभ्याच्या दक्षिणभागावर मगांचे हल्ले सुरू होतेच. या वेळीं या सुभ्याची जमाबंदी मगापासून किनार्यांचें संरक्षण करण्याकरितां दिलेल्या जहागिर्यांतच बहुतेक गडप होई आणि सरकारी उत्पन्न इतकें खालावलें होतें कीं, फिदाईखानाला बंगालची सुभेदारी बादशाहाला दरसाल दहा लाख रुपये देण्याच्या अटीवर मिळाली. बंगालच्या आरमाराचा र्हास आणि मग व फिरंगी यांची वाढती सत्ता वरील स्थिति ज्यास्त निकृष्ट करण्यास कारणीभूत झाली. इ.स. १६३९ मध्यें राजपुत्र सुजा सुभेदार झाल्यार तर त्याच्या हलगर्जीपणामुळें व त्याच्या नोकरांच्या बलात्कारामुळें व जुलुमामुळें आरामाराकरतां दिलेल्या परगण्यांचा नाश झाला व नाविक अधिकारी व लोक दारिद्रयग्रस्त झाले.
औरंगझेबाच्या कारकीर्दीत जेव्हां इ.स. १६६० मध्यें मीरजुमला बंगालचा सुभेदार झाला तेव्हां त्यानें आरमाराच्या तनख्याकरितां १४ लाख रुपयांची नेमणूक करून दिली. त्यानें आसाम व कुचबिहारवर सैन्य व आरमार घेऊन चाल केली व त्यांचा पाडाव केला. आसामी मोहिमेंत शत्रूंचीं ३००।४०० लढाऊ जहाजें काबीज केलीं. आसामी लोकांनीं एक हजारांवर मोठीं मोठीं जहाजें जाळिलीं. बादशाही आरमारांत ज्या जातींचीं एकंदर ३२३ जहाजें होती त्यांची नांवें व संख्या पुढीलप्रमाणें - कोसह (१५९), जलवह (४८), घराब (१०), परिंदह (७), वज्रा(४), सल्ब(२), पटिलह (५०), पटिल(१), भर(१), बलम (२), र्हटगिरी (१०), महालगिरि (५) पल्वर व इतर (२४).
पण हा विजय मीरजुमल्यास मानवला नाहीं, कारण लवकरच भयंकर रोग पसरून पुष्कळसें सैन्य, नाविक अधिकारी लोक, व स्वतः मीरजुमला मृत्युमुखीं पडला. मीरजुमल्याच्या मृत्यूमुळें बंगाली आरमार पार मोडलें व याचा फायदा घेऊन १६६४ च्या आरंभी चांचे लोक डाक्याला येऊन त्यांनीं या बादशाही आरमाराचा अवशेष लढविणारा जो मुनवरखान नांवाचा नावाध्यक्ष होता त्याचा पराभव केला. इस. १६६४ त शाहिस्तेखान सुभेदारीवर आल्यावर त्यानें चांचेगिरीचा नायनाट करण्याकरितां नवीन आरमार बांधण्याकडे सर्व लक्ष पुरविलें. त्यावेळचीं नौकाबंधनाचीं प्रमुख ठिकाणें म्हणजे हुगळी, बालेश्वर, मुरंग, चिलमरी, जेसोर व करिबरी हीं होत. या सर्व ठिकाणांहून त्यानें जहाजे बांधून मागविलीं व त्याकरितां लागणारी सर्व सामुग्री जमा केली. अधिकारी नेमले, परगणे व जहागिर्या तोडून दिल्या व अशा रीतीनें अखंड परिश्रम करून थोड्या अवधींत सर्व साधनांनीं परिपूर्ण अशी ३०० जहाजें जय्यत तयार ठेविलीं. यानंतर फिरंगी व आराकानीं लोकांशीं लढाई देऊन त्यांचा पूर्ण मोड केला व त्यांचीं बरीच जहाजें हस्तगत केलीं.
औरंगझेबाच्या काळीं बंगालखेरीज हिंदुस्थानच्या दुसर्या भागांतहि भारतीय नौकानयनाची व दर्याव्यापाराची वाढ झालेली स्पष्ट दिसून येते. कारोमांडल किनार्यावरचें मोठे व्यापारी बंदर म्हणजे मच्छलीपट्टण होतें. तेथील व्यापाराचा व बड्या बड्या व्यापार्यांचा उल्लेख थॉमस बौरेसारख्या प्रवाशांनीं केलेला आहे. येथून खासगी जहाजें माल भरून आराकान, पेगू, तेनासेरीम, क्वेटा, मलाक्का, मोका, इराण व मालदीव बेटें या ठिकाणीं जात असत, असें त्यांनीं लिहिलें आहे.
गोवळकोंड्याच्या राजाजवळ व्यापारी आरमार असे. त्याचीं अनेक जहाजें दरसाल आकारान, तेनासेरीम व सीलोन येथें स्वतःकरितां व आपल्या सरदारांकरितां हत्ती खरेदी करण्यास जात. मच्छलीपट्टणापासून उत्तरेकडे ४२ मैल असणारें नरसापूर हें ठिकाणहि नौकायनाचें एक महत्त्वाचे केंद्र होतें. येथें लांकूड पुष्कळ असून,नौका बनविणें व दुरुस्त करणें हींहि कामें चांगलीं होत. मदपोलममध्यें नौकाबंधनाचें काम मोठ्या प्रमाणावर होत असून, पुष्कळ इंग्रज व्यापार्यांची जहाजें या ठिकाणीं तयार केलीं जात; शिवाय सर्व तर्हेचें लोखंडी सामना येथील रहिवासी करून देत. येथील कारागीर जगांतील दुसर्या कोणत्याहि भागांतील कारागिरांपेक्षा कमी प्रतीचे मुळींच नव्हते. नबाब शाहिस्तेखानानें व्यापारी वर्गावर देशाच्या संरक्षणार्थ आरमार बांधण्यासाठी एक प्रकारची जहाजपट्टी बसविली होती. असें थॉमस बौरे हा म्हणतो. नबाबाचीं व्यापारीं जहाजें दरसा डाक्का, बलसोर आणि पिप्ली येथून सीलोन, तेनासेरीम, मालदीव बेटें वगैरे देशांत माल घेऊन जात व तेथून हत्ती, कवड्या, काथ्या वगैरे जिन्नस आणीत. मसूल, कतरमन, पटेल, ओलोको, बुझगरू, पुर्गू, बूर इत्यादि जातींचीं जहाजें जीं बांधण्यांत येत त्याविषयीं सविस्तर वर्णन बौरेनें दिलें आहे.
औरंगझेबाच्या काळीं पश्चिम किनार्यावरहि महत्त्वाचीं व्यापारी ठिकाणें होतीं. सुरतेस औरंगझेबाचीं चार जहाजें यात्रेकरूंस मक्केला मोफत नेण्यासाठीं म्हणून नेहमी तयार असत, असें डॉ. फ्रायर लिहितो. यांखेरीज सुरतेस इतर लोकांचीहि साधी लढाऊ जहाजें दृष्टीस पडत. या किनार्यावरहि चाच्यांचा बराच उपद्रव असे. एव्हेरी नामक इंग्रज चाच्यानें अबदुल गफूर या व्यापार्यांचे संपत्तीनें भरलेलें एक जहाज, तसेंच औरंगझेब बादशहाचें सुरतेस असणारें गंज- सुवै- इ नांवाचें प्रचंड जहाज त्यावरील ५२ लाख रुपये किमतीच्या मालासह लुटलें व इतर बरींच पुंडाई केली.