प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.

ॠग्वेदमंत्रांतील इतिहास.- ॠग्वेदाच्या मंत्रांत जो इतिहास आहे तो अगदी पहिल्या आर्यन् वसाहतीच्या नाही, हें मागें सांगितलेंच आहे. याविषयींची प्रमाणें थोडक्यांत पुढे दिल्याप्रमाणें आहेत:

१भ र तां चे हिं दु स्था नां त आ ग म न:- दाशराज्ञ युद्ध असें राजकीय स्वरुप दाखवितें की, सुदास व दिवोदास हें पूर्वी वसलेल्या मुलखांत प्रवेश करीत आहेत आणि यदुतुर्वशांसारख्या जुन्या बलवान् राजांशी युद्ध करीत आहेत. दिवोदास, सुदास येतात ते पृथुपर्शूंसारख्या परक्या लोकांचे साहाय्य घेऊन येत आहेत. अर्थात् ज्या राज्यांशी ते युद्ध करीत आहेत ती राज्यें पूर्वी अनेक वर्षे स्थापित झाली असली पाहिजेत.

२ मं त्र पू र्व का ली न पु रो हि तां चे व र्च स्व:- जुन्या राज्यांमध्यें पुरोहित संस्था इतक्या उत्तम त-हेनें प्रस्थापित झाली होती की, त्यांची सत्ता राज्यक्रांतीस उपयोगी पडे. पुरोहितासारख्या राज्यांतील बडया मनुष्याचें साहाय्य घेऊन राज्य काबीज करण्याची शक्यता अशा काळांत संभवतें कीं, जेव्हां राज्य प्रस्थापित होऊन बराच काळ लोटला असतो व राजाच्या सैनिकधुरीणत्वामुळें उत्पन्न होणारें सर्वाधिकारीत्व थोडेसे तरी दुर्बल झालेलें असतें. जेथें प्रदेश बराच वसला आहे व थोडी बहुत तरी शांतता नांदू लागली आहे. तेथेंच पुरोहितास प्रजेवर वजन वाढवून आपलें बस्तान चांगले बसवितां येतें. अशीच परिस्थिति मंत्रपूर्व दाशराज्ञयुद्ध दाखवितें.

३. वे द दा श रा ज्ञ यु द्ध पू र्व स्थि ती चे द्यो त क ना ही त:- संपूर्ण वेद दाशराज्ञयुध्दोत्तर असल्यामुळें ते दाशराज्ञयुद्धकालीन स्थितीचेहि द्योतक नाहीत. अर्थात ते तत्पूर्व यदुतुर्वशांच्या स्थापनेच्या कालाचे द्योतक कोठून असणार ? यदुतुर्वशांनीं देखील पूर्वेकडील राजांस पंजाबांतून ढकलून आपली सत्ता प्रस्थापित केली असली पाहिजे.

यदुतुर्वश हे बोलून चालून पश्चिमेकडील राजे होते. अधिक पूर्वेकडील राजे हिंदुस्थानांत यांच्याहि पूर्वी आले असले पाहिजेत.

ते ज्या काळांत हिंदुस्थानांत आले तो इतिहास ॠग्मंत्रांत येणें मुळीच शक्य नाही.

४ आ र्य नां चे हिं दु स्था नां ती ल वा स्त व्य भ र त पू र्व का ली न आ हे:- मंत्रांत भरतांच्या देखील प्रवेशाचें चित्र स्पष्ट नाही. तें उत्तरकालीन आठवणी गोळा करुन रचावयाचें आहे. भरतांच्या प्रवेशाच्या अगोदर देश किती वसला होता आणि तो कोणत्या प्रकारच्या लोकांनी वसला होता म्हणजे ते लोक आर्यन् होते किंवा नव्हते हा पुढचा प्रश्न आहे. याला उत्तर असें आहे की, भरत येण्याच्या पूर्वी आर्यन् महावंशांत मोडतील अशा जातींचे वास्तव्य देशांत झालेलें होतें. कदाचित् पूर्व बंगाल व महाराष्ट्र वगळून आज आर्यन् भाषा बोलणारा जेवढा प्रदेश आहे तेवढा बहुतेक आर्यन् जातीनीच व्यापला होता. केवळ हिंदुस्थानांतील प्रदेशच नव्हे तर लंकेसारखा प्रदेश देखील त्या काळी आर्यन् लोकांच्या वंशांनी वसला असावा, या कल्पनेच्या शक्यतेस साधक पुरावा पुढील परिच्छेदांत दिला आहे.

५ दा श रा ज्ञ यु द्ध पू र्व इ ति हा स लि हि ण्या स सा हि त्य:- वेद जर आपणास दाशराज्ञयुद्धपूर्व कालापर्यंत पोंचवीत नाहीत, तर आपणांपुढें असा प्रश्न उपस्थित होतो की या दाशराज्ञयुद्धपूर्वकालाचा इतिहास लिहिण्यास आपणांपाशी कांही साहित्य आहे किंवा नाही. आमच्या मतें साहित्य आहे, आणि तें साहित्य म्हटलें म्हणजें पुराणांतील व भारतांतील कुरुयुद्धपूर्व राजांचे इतिहास होत. सुदासाचा संबंध पुराणांतील वंशावळयांप्रमाणें ब-याच उत्तरकालाशीं पोंचतो. पुराणांच्या मताप्रमाणें दाशरथी राम व नल राजा, हे सुदासाच्या बरेच अगोदरचे राजे होत. त्या वेळची राजमालिका व कथा घेतल्या तर बहुतेक हिंदुस्थान शासनसंस्थांनी युक्त व बरेंच सुधारलेलें असें दिसतें. भीमक हा विदर्भाचा राजा होता; म्हणजे सध्यांचा महाराष्ट्र उर्फ प्राचीन काळचें दंडकारण्य ही वगळलीं तर उरलेला भाग वसलेला होता असें दिसून येईल. रामानें लंका जिंकली ती चांगली वसलेली व संपन्न होती असें दिसतें. जैन रामायण किंवा कन्नड रामायण ही रामकथेच्या मुख्य भागांना विरोध करीत नाहीत.

६ श क म गां ची व स ति मं त्र क र्त्या लो कां पू र्वी ची अ सा वी:- भरत येण्यापूर्वी देशांतील वसती अगदी एकाच स्वरुपाची असेल असें नाही तर शक आणि मग या जातीहि भारतांत मंत्रकर्त्या लोकांच्या, म्हणजे ज्यांनां आर्यन् म्हणण्याचा प्रचार आहे त्या लोकांच्या अगोदर येऊन राहिल्या असाव्यात. हि गोष्ट कीकटांत प्रवेश करुं   पाहणा-या आणि इंद्राचा द्वेष करणा-या मगंदास लुटण्याची मसलत करणा-या विश्वामित्राच्या सूक्तावरुन लक्षांत येईल. कीकटास पुढें मगध म्हणूं लागले. मगध शब्दाची व्युत्पत्ति पतंजलि 'मगांस धारण करतो तो मगध' अशी करितो. ' मग' याचा अर्थ पतंजलि बरेंच पांडित्य करुन पाप असा जो काढतो तो अनवश्यक ठरवून मागी ऊर्फ मग लोक असा केला पाहिजे असें राजवाडे सांगतात. 'मग' इंद्रास दैत्यांत घालतात हें स्पष्टच आहे; आणि त्यामुळें मगंद म्हणजे मगानुयायी इंद्रास पायस देत नाहीत म्हणून विश्वामित्राची तक्रारहि बरोबरच आहे. तैत्तिरीय संहितेच्या काली मागध म्हणजे मगधांतील लोक हें नांव निश्चित झालें होंतें. मगधांतील लोकांस जर मागध हें नांव निश्चित झालें होतें तर मगध शब्द त्याहून जुना असला पाहिजे; आणि देशाला मगध नांव पडण्यापूर्वी मगांची वसती तेथें बरींच वर्षे अगोदर झाली असली पाहिजे.

७ प्रा ची न म गां चे व स ति स्था न:- आम्हांला असें मात्र वाटतें की, आज जेथें मगध उर्फ कीकट आहे तेथेंच प्राचीन कीकटांची किंवा मगांची वसती नसावी; तर ती बरीच पश्चिमेकडे असावी. कां की, ॠग्वेदांत सरस्वतीच्या पूर्वेकडील प्रदेशाचे किंवा नद्यांचे उल्लेख फारसे आढळत नाहींत. कीकट आणि त्यांच्या देशांतील मगंद या दोघांनांहि पुढें पुर्वेकडे कोणीतरी ढकललें असावें.

मगंद हे कोण असावेत? हे शाक्य असावेत असें वाटतें. शकांचे उपाध्ये मग असत ही गोष्ट सर्वप्रसिद्ध आहे. गोतम हा आपणास शाक्य म्हणवी, कीकटांत जन्मलेला म्हणून म्हणवी, त्याला आपल्या अनेक पिढयांचा इतिहास ठाऊक होता असें तो दाखवी, तथापि आपण परक्या देशांतून आलों असूं अशी त्यास कल्पनाहि दिसत नाही. यावरुन आणि नवीन आलेल्या टोळीस एकदम देशाच्या पूर्वेकडील कोप-यांत शिरकाव करुन राज्य स्थापण्याच्या अशक्यतेमुळें शकमगांचे आगमन मंत्रपूर्वकालांत घातल्याशिवाय गत्यंतर नाही.

८. मं त्र पू र्व सं स्कृ ति.- मंत्रपूर्व संस्कृति आर्यन् असावी पण ब्राह्मणी नसावी. याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे भाषेनें आर्यन् परंतु ब्राह्मणजातिविहीन अशा समाजाचें अस्तित्व होय. मंत्रकालीन आर्यन् लोकांनीच जर पुढे हिंदुस्थान वसविला असता तर त्या लोकांचा जेथें जेथें प्रसार झाला तेथें तेथें तो सब्राह्मण झाला असता; एवढेंच नव्हे तर त्यांचे ब्राह्मण कोणत्या तरी विशिष्ट वेदाचे आहेत अशा स्थितींत झाला असता. ब्राह्मणांच्या जातीची अशी स्थिति आहे की, औद्रात्रहौत्रादि क्रियानुरुप विशिष्टिकरण झाल्यानंतर ॠत्विक्संघांच्या त्या त्या जाती बनल्या. म्हणजे अगोदर ब्राह्मणजात पृथक् बनली आणि तिचे पुढें वेदाप्रमाणें तुकडे पडलें असें नसून, अगोदर समुच्चयांचे शिक्षणामुळें विशिष्टीकरण झालें आणि ते विशिष्टीभूत झालेले संघ जातिरुप पावले. अशी परिस्थिति असल्यामुळें जेथें जेथें मांत्र संस्कृतीचे लोक गेले असते तेथें तेथें ते सब्राह्मण गेले असते. एवढेच नव्हे, तर ते ज्या ब्राह्मणांबरोबर गेले असते ते ब्राह्मण विशिष्ट वेदाचे किंवा शाखेचे असते.

९. भा र ती य सं स्कृ ती चा ब्रा ह्म ण ही न भा ग:- आर्यन् भाषेचा परंतु ब्राह्मणहीन असा भाग थोडा थोडका नाही. सबंध सिंहलद्वीपांतील सिंहलीसमाज अशा त-हेचा आहे. सिंहलद्वीपामध्यें भारतीयाचें गमन अर्वाचीन शोधक समजतात त्याप्रमाणें ख्रिस्तपूर्व सातव्या शतकांत झालें असतें, तर तें परदेशगमन खास सब्राह्मण झालें असतें. एवढेंच नव्हे तर तेथें एखादें विशिष्ट श्रौतसूत्रहि उत्पन्न झाले असतें. बौध्दांनी सिंहलांतील ब्र्राह्मणसंप्रदाय नष्ट केला असेल हें संभवत नाही. कां की, एक तर बौद्ध तेथें बरेच उशिरां म्हणजे खिस्तपूर्व तिस-या शतकांत गेले. बौध्दांचा कटाक्ष ब्राह्मणजात नष्ट करण्याकडे नसून ब्राह्मणांपेक्षां आम्ही क्षत्रिय उच्च असें मत ते प्रस्थापित करीत असत व क्षत्रियब्राह्मणवैश्यशूद्र अशी चातुर्वर्ण्याची ते मांडणी करीत. नीतिनिगंडुवामध्यें गोवीय आपणांमध्यें ब्राह्मणरक्त असल्यामुळें आपण इतरांपेक्षां उच्च असें दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हा प्रयत्न धर्मशास्त्राचें तेथें गमन झाल्यानंतरचा आहे हें उघड आहे. जर तो अर्वाचीन नसता व केवळ बौद्धगमनकालीन असता, तर त्यांनी ब्राह्मणांशीं हातजमाई करण्याऐवजी आपलें क्षत्रियवंशसंभवत्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला असता; आणि गोवीय ज्याअर्थी जमिनीचे मालक आहेत त्याअर्थी तो पचूनहि जाता.

यावरुन असा काळ उघड दिसतो की जेव्हां आर्यन् टोळया सिंधुपूर्वेकडील प्रदेश व द्वीपें व्यापीत होत्या परंतु तेव्हां त्यांमध्यें ब्राह्मण जातीचें अस्तित्व नव्हतें.

१०. प्रा ची न त र आ र्य न सं स्कृ ती चें पु रा त न त्व:- मंत्रसंस्कृति अथवा ज्या लोकांचा भारतप्रवेश ॠग्वेदांत चित्रित झाला आहे त्या लोकांची संस्कृति अगोदर अस्तित्वांत असलेल्या आर्यन् संस्कृतीहून थोडीशी तरी निराळी होती हें वरील विवेचनावरुन सिद्ध होईल. या अगोदरच्या संस्कृतीला प्राचीनतर आर्यन् संस्कृति हें नांव देणें युक्त होईल. पश्न असा उपस्थित होतो की, या संस्कृतीचें अस्तित्व किती जुनें असावें ? सर्व देश व्यापला जाण्यास कमीत कमी एक हजार वर्षांचा काळ लोटला पाहिजे. आणि वैदिक आर्यन् म्हणजे भरत म्हणजे मांत्र संस्कृतीचे लोक जेव्हां आले तेव्हां जर देश पूर्णपणें प्राचीनतर आर्यन् संस्कृतीच्या लोकांनी व्यापला गेला असता तर ती प्राचीनतर आर्यन् संस्कृति कमीत कमी हजार वर्षांची जुनी असावी.

११. जु नी सं स्कृ ति आ र्य न् क शा व रु न:- ही जुनी संस्कृति आर्यन् असावी असें म्हणण्यास आधार हा कीं यदुतुर्वशांसारख्या जुन्या पाश्चिम राष्ट्रांचा जो उल्लेख आपणांस आढळतो तो उल्लेख अग्नियुक्त आढळतो. वसिष्टविश्वामित्र हे जुन्यांचेच पुरोहित कांही काल होते. शिवाय नवीनांच्या संस्था जुन्यांशी ज्या मिसळून गेल्या त्या त्यांत सादृश्य असल्याखेरीज मिसळून गेल्या नाहीत. भरतांच्या टोळीबरोबर फारच थोडक्या लोकांचे आगमन झालें असावें. त्यांनी जुन्यांच्या भाषा मारुन टाकणें अर्थात् शक्य नव्हतें. त्या भाषा देखील सदृश असल्या पाहिजेत.

१२ प्रा ची न त र आ र्य न् सं स्कृ ती ती ल लो कां चा आ यु ष्य क्र म:- प्राचीनेतर आर्यन् संस्कृति जर ब्राह्मणविहीन पण आर्यन् असेल तर त्या जनतेचा आयुष्यक्रम कसा काय होता हा पुढें प्रश्न स्वाभाविकच उत्पन्न होतो. ते लोक संस्कृतिविहीन असणें शक्य नाही. कां की, ज्या लोकांची सर्व देश व्यापण्याइतकी व्यापकता वाढली त्यांच्यामध्यें कांहीतरी नीतिनियम उत्पन्न झाले असलेच पाहिजेत. ज्या देशामध्यें त्यांनी हजारएक वर्षे वसती केली व जमीन नांगरली, जेथें त्यांची राजकुळें स्थापित झाली व पौरोहित्यहि स्थापन झालें त्या देशामध्यें वाङ्मयविषयक किंवा विज्ञानविषयक किंवा मनोरंजनात्मक संस्कृति तयार झाली नसेल असें नाही. ती तशी संस्कृति तयार झाली असावी असें धरल्यास त्या संस्कृतीचे अवशेष कोठे आहेत? आमच्या मतें दोन अवशेष दिसतात, एक अवशेष म्हणजे प्रत्यक्ष मंत्रांतीलच उल्लेख; आणि दुसरा अवशेष म्हटला म्हणजे इतिहासपुराणांतील प्राचीन कथा. ॠग्वेदांत मांत्र संस्कृतीच्या लोकांचे धर्म जसे दिसतात तसे स्थानिकांचेहि दिसतात. दोन्ही लोक यजन करणारे दिसतात. परंतु प्राचीनांचे यजन फारच अल्प स्वरुपाचें होतें. यज्ञाचा विकास होण्यापूर्वीची अग्न्युपासनेची पद्धति दोहोंस सामान्य असावी; आणि ती अथर्व्यांच्या क्रियांसारखी, म्हणजे गृह्यासारखी परंतु मंत्रहीन असावी. त्या समाजांत म्हणजे जेथें ॠत्विग्विद्येचा विकास झाला नव्हता तेंथें अत्यंत स्वाभाविक ईश्वराची किंवा देवतांची किंवा भुतांची किंवा रोगांची किंवा सृष्टींतील अस्पष्ट शक्तीची उपासना असावी. उपासना करणारा धंदेवाईक वर्ग असावा किंवा नसावा याविषयीं खात्रीपूर्वक सांगतां येत नाही. ॠषित्व, पुरोहितत्व, गायकत्व किंवा मांत्रिकत्व हीं सामान्यांपासून पृथक् झाली असतीलच असें सांगतां येत नाही. सामान्यांपासून पौरोहित्याचें पृथक्त्व दोन तऱ्हांनीं संभवतें. एक तर पुरोहितवर्गाची जात बनणें किंवा दुस-याच कोणीतरी परकीय जातीनें येऊन लोकांचे पौरोहित्य मिळविणें. मगांनी ज्याप्रमाणें पारशांचे पौराहित्य मिळविलें त्याप्रमाणें शकांचेहि मिळविलें व तो शकमगयुक्त समाज हिंदुस्थानांत आल्यामुळें कांही समाज पृथक्पौरोहित्यमय असेल, परंतु सर्व समाज तसा असेल असें वाटत नाही. मगंदांबाहेरील इतर लोकांच्या पारमार्थिक गरजा पुरविणारा वर्ग त्या लोकांतलाच असेल, आणि तो वर्ग पुढें एक तर नव्या येणा-या लोकांच्या पुरोहितवर्गाशी तादात्म्य पावला असावा किंवा सामान्य जनतेंत मिसळून गेला असावा.

१३ प्रा ची न दे श्य पु रो हि तां चे प्र ति नि धी:- श्रौतस्मार्त धर्माखेरीज पारमार्थिक गरजा पुरविणारें लोक देशांत सध्यां आहेत ते प्राचीन देश्य पुरोहितांचे प्रतिनिधी म्हणून धरण्यास कांही हरकत नाही. असले वर्ग पुष्कळ आहेत. गारुडी, भुतें काढणारें, मत्रांनी साप विंचू यांचें विष उतरविणारें, मोहिनीमंत्र वापरणारे, मूठ मारणें वगैरे सारखें जादूटोणे करणारे, गारपगारी म्हणजे गारांपासून रक्षण करणारे हे सर्व लोक आजच्या समाजांत दिसतात; आणि हे सर्व मंत्रहीन अथर्वणांचे प्रतिनिधी होत. अथर्वणांच्या क्रिया प्राचीन दिसतात पण अथर्ववेदांतील मंत्र अर्वाचीन दिसतात. कांही क्रिया या दोन्ही देश्य व मांत्र लोकांचे एकीकरण जेव्हां होऊं लागलें तेव्हां झालेल्या दिसतात. एकतर दोघांचा मिलाफ होऊन एकानें दुस-याची विद्या कांही काळ स्वीकारावी, किंवा एकानें दुस-याची विद्या मारुन टाकण्याचा प्रयत्न करावा. आजची अथर्ववेदांतील विद्या ही देश्यांची असावीच असें नाहीं. कदाचित् त्यांची असेल, कदाचित् दोन्ही लोकांचें एकीकरण होऊन बनलेली असेल. केवळ जादुटोण्याला वेदस्वरुप मिळालें हें देश्यांच्या व परकीयांच्या स्पर्धेमुळें नव्हे; तर त्रैविद्य व अथर्वे यांच्या स्पर्धेंमुळें होय. तथापि राक्षसवेद, सर्पवेद, इतिहासवेद, पुराणवेद इत्यादिकांस जें यज्ञसंस्थेत स्थान मिळालें तें देश्यांशी हातजमाई करण्याच्या प्रयत्नामुळें मिळालें असावें असें दिसते. कां कीं, त्यांपैकी ब-याचशा गोष्टीस मांत्र संस्कृतीत मुळीच आधार नाही. थोडक्यांत असें म्हणतां येईल कीं, अथर्वणस्वरुप पौरोहित्याच्या देश्य संस्कृतीतील भागांपैकी मांत्रांच्या आगमनानंतरचा भाग अस्पष्ट आहे; पण इतिहासपुराणांचा मात्र नाहीं. म्हणजे देश्यांचा पुरोहितवर्ग मेला किंवा मांत्रांच्या पुरोहितांत लोपला; परंतु देश्यांचा सूतांचा वर्ग टिकला, आणि त्यांनीं आपली संस्कृति इतकी कायम ठेवली की तिच्यावर मांत्र संस्कृतीतील लोकांची थोडीबहुत पुटें चढली तरी मांत्रसंस्कृतीच्या लोकांनां ती विद्या घेऊन संवर्धनच करावी लागली.