प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.

ॠग्मंत्रवाङ्मय हें सर्व भारतीय आर्यन् लोकांचे नसून कांहीशा उत्तर काली आलेल्या भारतीयांचे वाङ्मय आहे. आणि ब्राह्मणें हें वाङ्मय जुनें सूतवाङ्मय व नवें मांत्रवाङ्मय यांस जोडणारे आहे.- हें विधान चांगले लक्षांत ठेवून त्याचें स्पष्टीकरण ऐकावें.

श्रौतवाङ्मयांतर्गत मंत्र आणि ब्राह्मण यांचा किंवा मंत्र आणि इतिहासपुराणें यांचा परस्परसंबंध आम्ही येणेंप्रमाणें व्यक्त करितो: मंत्रवाङ्मय हें एका विशिष्ट काली पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवेश करणा-या आर्यन् लोकांचे होतें. हा प्रवेश दाशराज्ञयुध्दाच्या आसपासच्या काळांतील होय जें मंत्रवाङमय तयार झालें त्यांतील बहुतेक दाशराज्ञ युद्धकाली किंवा तदुत्तरकालीं आहे. दाशदाज्ञ युध्दाच्या वेळेस उत्तर हिंदुस्थान बहुतेक आर्यन् महावंशांतील परंतु मंत्रकालापूर्वी अनेक शतकें आलेल्या लोकांनी वसला होता. हे वेदपूर्व आर्यन् कोणच्या काळांत आले, त्यांच्या वसाहती कशा झाल्या यांचा पत्ता प्राकृत भाषाशास्त्र अतिशय वाढल्यास कदाचित् लागल्यास लागेल पण आज तें अज्ञातच आहे, आणि त्याची माहिती देणारें वाङ्मय अस्तित्वांतच नाही. त्या लोकांची भाषा वेदभाषेहून फारशी भिन्न नसावी पण त्यांची संस्कृति मंत्रांत दिसणा-या संस्कृतीपासून बरीचशी भिन्न झालेली असावी. त्यांच्या संस्कृतीत यज्ञसंस्था बरीचशी बुडालेलीच असावी. म्हणजे जी यज्ञसंस्था यजूंच्या पूर्वी ॠग्मंत्रांत केवळ प्राथमिक स्वरुपांत दृष्टीस पडते तिच्याहि पेक्षां अगोदरचें एखादें स्वरुप घेऊन ते लोंक हिंदुस्थानांत आले असावे, आणि ती विकसित न होतां मृत झाली असावी. मंत्र आणणारे आर्यन् त्यांच्या संस्कृतीस आपण मंत्रसंस्कृति म्हणूं, आणि त्या वेळेस जे लोक देश्य होते परंतु आर्यन् होते त्यांच्या संस्कृतीस देश्य आर्यन् संस्कृति म्हणूं. या देश्य आर्यन् संस्कृतीचें वाङ्मय तत्कालीन स्वरुपांत आज जरी उपलब्ध नाही तरी तें कसें असावें याविषयीची थोडीसी कल्पना आपणांस करतां येईल. त्यांच्यामध्यें इतिहासपुराणें उर्फ सूतवाङ्मय बरेंचसें वाढलेलें असावें. त्यांच्यामध्यें व्यापक विचारांचा म्हणजे जे विचार उत्तर कालीन ॠग्मंत्रांत किंवा आरण्यक व उपनिषदांतून दृष्टीस पडतात त्या प्रकारचे विचार त्यांत वाढले असावे आणि बौद्ध व जैन ग्रंथांतून ज्यांचा प्रारंभ वेदांत सांपडत नाही अशा ज्या अनेक गोष्टी दिसतात त्या देखील देश्य आर्यन् संस्कृतीत असाव्या. देश्य आर्यन् संस्कृतीत ब्राह्मणांची जात नसावी आणि जो अथर्वणांचा वर्ग त्यांच्याबरोबर पूर्वकालीच आला असेल तो वर्ग मंत्र संस्कृतीतील अथर्व्यांप्रमाणें फारसा विकसित न होतां निदार पूर्वेकडील लोकांत भाट, गारपगारी यासारख्या कनिष्ठ वर्गाच्या स्वरुपाचा झाला असावा किंवा सर्वसामान्य लोकांत मिसळून गेला असावा. देश्य आर्यन् समाज कदाचित क्षत्रियप्रधान असतील.

देश्य आर्यन् संस्कृति म्हणून जी वर्णन केली ती मंत्रसंस्कृतीपासून अगदीच भिन्न झाली नसावी. भाषासादृश्याशिवाय देश्यसंस्कृति व मंत्रसंस्कृति यांत सारखेच शोभणारे कांही लोकसमुदायहि असतील. एकामागून एक अशी अनेक आर्यन् लोकांची आगमनें आपण कल्पिली तर हें अत्यन्त स्वाभाविक आहे की अधिक उत्तरकालीन लोकांमध्यें मंत्रसंस्कृतीच्या सदृश अशी संस्कृति असावी.

वर सांगितल्याप्रमाणें दोन मित्र संस्कृति कल्पिण्यास प्रमाणें काय?

(१)    असें मानण्याचें पहिलें कारण हें की कथापुराणादि वाङमयांतून जो आपणांस इतिहास सांपडतो त्यांत पुष्कळ जुनी माहिती जतन करण्याचा यत्न उघड दिसत आहे, आणि हा सर्व इतिहास दाशराज्ञ युध्दाच्या बराच पूर्वीचा असला पाहिजे.

(२)    ॠग्वेदामध्येंच पुढें सरकरणारीं राष्ट्रें अगोदरचा देश सुमारें वीस राष्ट्रांनी व्यापलेलाच असून त्यांतून कष्टानें मार्ग काढीत आहेत असें दाखविलें आहे.

(३)    ब्राह्मणजातीच्या उद्भवापूर्वी देशभर जो आर्यन् लोकांचा विस्तार झाला तो त्या विस्तार पावलेल्या लोकांच्या संस्कृतीचें उत्तरकालीन म्हणजे ॠग्मंत्रदृष्टसंस्कृतीपासून भिन्नत्व दर्शवितो.

(४)    वेदांमध्ये गार्हस्थ्य पूर्णपणें प्रथापित झालेलें दिसतें आणि अर्वाचीन काळच्या गार्हस्थ्यापासून भिन्न प्रकारचें गार्हस्थ्य किंवा कुंटुंबस्वरुप इतिहासपुराणांतून दृष्टीस पडतें.

(५)    जैनामध्यें रामकथा आहे पण ती निराळी आहे. बौध्दांची रामकथा निराळी आहे. म्हणजे ही सर्व अत्यंत जुन्या कथेची पर्यवसानें होत.

(६)    जैनांच्या संप्रदायाची एकंदर कल्पना अशी आहे कीं वर्धमान महावीरानें नवीन विचारसंप्रदाय स्थापन केला नसून पूर्वीच्याच विचारास वळण दिलें. त्याच्या अगोदरचा त्यांचा तीर्थंकर ॠषभ याचा भागवतानें गौरवपर उल्लेख केला असल्यामुळें कदाचित् ॠषभ हा एक जुना पण विशिष्ट पंथातलाच नसून सर्वानांच मान्य असा पुरुष असणें शक्य आहे. म्हणजे सर्वसामान्य संस्कृतीपैकीच यज्ञधर्मानें अस्पृष्ट अशा प्राचीन संस्कृतीची परंपरा आपण राखीत आहों आणि वाढवीत आहों अशी जी जैनांची भावना आहे ती केवळ चुकीची नसावी. वैदिक लोकांच्या आगमनापूर्वी आणि त्यांचा यज्ञधर्म तयार होण्यापूर्वी भारतांत जी संस्कृति होती तिचे यज्ञधर्मानें अलिप्त असे जे लोक असतील ते जैन होत असें म्हणतां येणार नाही; पण त्यांची परंपरा वैदिक परंपरेइतकी किंबहुना तीहूनहि जुनी ठरण्याचा संभव आहे.

जैनांच्या ग्रंथांतील एकंदर अंगें पहातां असें दिसतें की काहीं विचार औपनिषद विचाराशी जुळतात. त्यांच्या दृष्टीनें रामकथा कृष्णकथा हा इतिहासच आहे. त्यांच्या संप्रदायांतील कांही भाग नकलेच्या स्वरुपाचा आहे. म्हणजे तुमच्याकडे एक नारायण तर आमच्याकडे सात नारायण, तुमच्याकडे एक सूर्य तर आमच्या कडे इतके जास्त सूर्य. त्यांच्या ग्रांथिक प्रयत्नांत कांही लोकांस जैन ठरविण्यासाठी (उदाहरणार्थ कलिदासादि कवीस) झालेल्या खटपटीचा परिणाम दिसून येतो. परंतु विद्याधरांचा भाग असा दिसतो की जो जैनांत राहिला आणि ब्राह्मणी संस्कृतीच्या ग्रंथांत महत्व पावला नाही. या त-हेचा भाग कांही तरी पूर्वकालीन परंपरा ब्राह्मणी ग्रंथांत घेतली व कांही घ्यावयाची राहिली असा तरी एक सिध्दांत काढावयास लावील किंवा ब्राह्मणीधर्म युक्त समाजांतून फुटून बाहेर पडलेल्यांनी विद्याधर वर्ग आपल्या डोक्यांतून निर्माण केला असें होईल. या त-हेची कल्पना करण्यास विद्याधर वर्गाचा ब्राह्मणी ग्रंथांत पूर्ण अनुल्लेख पाहिजे पण तो तसा दिसत नाही.