प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
''आर्य'' शब्दाचा अर्थनिश्चय.- पुढील ॠग्वेदांतील अर्य, आर्य व तत्साधित शब्दांविषयींच्या उता-यांवरुन स्पष्ट होईल, की अर्य किंवा आर्य या दोन्ही शब्दांनीं महावंशवाचक (म्हणजे रेस Race हा अर्थ देणारा) एकहि उतारा वेदांत नाहीं. अर्थ सायणानुसार दिला आहे व इतर पंडितांचा अर्थाविषयीं मतभेद असल्यास तोहि दिला आहे.
प्रथमत: अर्य शब्द घेतला आहे आणि त्याचा वाक्यांत अर्थ जाडया अक्षरांनी दिला आहे.
अर्य हा शब्द आर्यवाचक अनेक ठिकाणीं नसून केवळ अरि शब्दाचें अनेकवचन म्हणून आला आहे. तथापि वाचकांच्या प्रत्यक्ष अवलोकनासाठीं म्हणून तसेहि उतारें दिले आहेत.
निसर्वसेन इषुधीरँसक्त समर्यो गा अजति यस्य वष्टि
[ॠ, १.३३.३.]
शकल सेनायुक्त श्रेष्ठ (इंद्र) भाता पाठिवर चढवितो. ज्याला गाई देण्याची इच्छा करतो त्याच्या घरीं चांगल्या रीतीनें गाई आणतो.
[अर्य = पालयिता (पंडित) ].
वनेम पूर्वीरर्यो मनीषा अग्नि: सुशोको विश्वान्यश्या:
(ॠ. १.७०.१)
(आम्हीं) स्तोत्रानें पुष्कळ शत्रूंना संहारुन टाकूं. सुप्रकाश अग्नि सर्व कर्में व्यापो.
दधन्नृतं धनयन्नस्य धीतिमादिदर्यो दिधिष्वो विभृत्रा:|
(ॠ. १.७१.३.)
आड्रि·रस ख-या (अग्नी) ला स्थापिते झाले. आणि अग्नीसंबंधी पूजाअर्चा धन समजूं लागले श्रेष्ठ अग्निहोत्र धारण करणारे अग्नीला भजूं लागले.
सनेम वाजं समिथेश्वर्यो भागं देवेषु श्रवसे दधाना: |
(ॠ. १.७३.५)
आम्हांला संग्रामांत शत्रूचें धन मिळो; मग यश मिळावें म्हणून आम्ही देवांना हविर्भाग देत जाऊं.
[अर्य: = अरि म्हणजे शत्रु याचें अनेकवचन (ग्रिफिथ, सायण व पंडित.) ]
यो अर्यो मर्तभोजनं पराददाति दाशुषे |
इन्द्रो अस्मभ्यं शिक्षतु..... ...... ||
(ॠ.१.८१,६)
जो प्रभु (इंद्र) हविर्दात्या उपासकाला उपर्युक्त अन्नादि पदार्थ देतो, ते पदार्थ तो इंद्र आम्हांला देवो.
[अर्य:=प्रभु=(इंद्र) पंडित ].
अन्तर्हिख्यो जनानामर्यो वेदो अदाशुषाम् |
(ॠ. १.८१.९)
हवि न अर्पण करणा-या लोकांच्या घरीं असलेलें धन तुला प्रभूला माहित आहे.
[अर्य:=सवेषां स्वामि: (प्रभु=इंद्र)पंडित]
पैद्वो वाजी सदमिद्धव्यो अर्य: |
(ॠ. १.११६.६).
पेदू नामक उपासकाच्या अश्वाची नेहमी धांवा करण्यासारखी (बोलावण्यासारखी) योग्यता आहे.- (पंडित)
[अर्य: = शत्रूणां प्रेरयिता (सायण) ]
युवं श्वेतं पेदव इन्द्रजूतमहिहनमश्विना दत्तमश्वम् |
जोहूत्रमर्यो अभिभूतिमुग्रं सहस्त्रसां वृषणं वीड्वड्गम् |
(ॠ. १.११८.९).
हे अश्वी हो, तुम्ही पेदूला शुभ्रवर्णाचा, इंद्रानें पाठविलेला शत्रूंना मारणारा, मोठयानें खिंकाळणारा, सामर्थ्यवान सहस्त्रावधि धन देणारा तरुण बळकट घोडा देते झालेत.
[अर्य: = अरे: शत्रो: अभिभूतिम् (ग्रिफिथ, सायण व पंडित)]
आनो भज मघवन् गोश्वर्यो (ॠ. १.१२१.१५). हे स्वामी (धनपती इंद्रा), तूं आम्हांला गाई मिळवून दे.
[अर्य: = स्वामी (सायण); अर्यः = धनपतिः (पंडित). अर्य: = शत्रु foe (ग्रिफिथ)]
अर्यो गिर: सद्य आजग्मुषी रोस्त्राश्वाकन्तूभयेश्वस्मे
(ॠ. १.११२.१४).
हे दैदिप्यमान (देव) आम्ही भाविकपणानें केलेल्या स्तुती आम्हां उभयतांवर कृपा करुन मान्य करोत.
[अर्य: = अरी: देवान्प्रति गन्त्री: = भाविका (पंडित).
अर्य: = अरणीयो विश्वेषां देवानां संघ: जग्मुषी: सायण ]
अध यदेषां पृथुबुध्नास एतास्तीर्थे नार्य: पौस्यानि तस्थु:
(ॠ.१.१६९,६)
ज्याप्रमाणें युद्धभूमीवर शत्रूंचीं सैन्ये उभीं असतात त्याप्रमाणें हे स्थूलजघन हरीण उभे आहेत.
[अर्य: = अरे: शत्रो: (सायण) अर्य: = रणोद्युक्तस्य स्वामिन: (पंडित, ग्रिफिथ) ]
तावामद्यतावपरं हुवेमोच्छन्त्यामुषसि वन्हिरुक्थै: |
नासत्या कुहचित् सन्तावर्यो दिवो नपाता सुदास्तराय ||
(ॠ.१.१८४,१)
हे नासत्य हो (अश्वीहो), तुम्हां द्युपुत्रांनां, तुम्ही कोठेहि असला तरी, उषःकाळ होतांच हवींनी व स्तोत्रांनी भक्तिपूर्वक यजमानासाठी आवाहन करुं. आज आव्हान करुं व उद्यां करुं,
[अर्य: = स्त्रोत्रशील (पंडित). अर्य: = ईरयिता (सायण) ]
भूरिचिदर्य: सुदास्तरायेषा मदन्त इषयेम देवा |
(ॠ.१.१८५.९).
देव हो स्तोते आम्ही अन्नयुक्त असें यजमानाला पुष्कळ धन इच्छितो.
विश्वा इदर्यो अभिदिप्स्वो मृधो बृहस्पतिर्विववर्हा रथाँइव
(ॠ.२.२३.१३).
स्वामी बृहस्पति, आमचा पराभम करणा-या; उपद्रव करणा-या व हिंसक अशा शत्रूंना रथाप्रमाणें तोडतो. (अनुपासक पंडित).
बृहस्पते अतियदर्यो अर्हाद्द्द्युमद्विभाति | तद्.... धेहि.....
(ॠ.२.२३,१५)
हे बृहस्पते, श्रेष्ठ मनुष्य जें योग्य मानील जें तेजोयुक्त असेल. तें दे.
अपां नपादसुर्यस्य मह्नाविश्वान्यर्यो भुवना जजान
(ॠ.२.३५,२).
स्वामी अग्नि बलसामर्थ्याने सर्व जग उत्पन्न करता झाला.
आ याहि पुर्वीरति चर्पणीराँ अर्य आशिष उप नो हरीभ्यास् |
(ॠ.३.४३,२).
(हे इंद्र) पुरातन लोकांना सोडून ये. (आणि आमचा) स्वामी तूं आमच्या प्रार्थना घोडयासह येऊन स्वीकार.
[अर्य: गमन करणा-या (पंडित).]
अनंन्ते अन्त: परिवीत आगाच्छुचि: शुक्रो अर्यो रोरुचान: |
(ॠ.४.१,७).
शुद्ध, तेजस्वी, देदीप्यमान (आणि) अनन्त अन्तरिक्षांत (स्वतेजानें) वेष्टिलेला प्रभु (अग्नि) येवो.
अतस्त्वं दृश्याँ अग्न एतान्पड्भि: पश्येरद्भुताँ अर्य एवै: |
(ॠ.४,२,१२).
म्हणून हे अग्ने (यज्ञाचा) स्वामी तूं अद्भुत व रम्य अशा देवांना पायांनी (ज्वालांनी) पाहतोस.
आ यूथेव क्षुमति पश्वो अख्यद्देवानां यज्जनिमान्त्युग्र |
मर्तानां चिदुर्वशीरकृप्रन्वृधे चिदर्य उपरस्यायो: ||
(ॠ.४.२.१८).
हे प्रबल अग्ने शब्द करणा-या पशूंच्या कळपांत पशु पहिल्या प्रमाणें मेघ पाहिले म्हणजे मनुष्याच्या कामना पूर्ण होतात, आणि अर्य (स्वामी) पेरलेल्या धान्याच्या आणि भृत्यांच्या संरक्षणाविषयीं समर्थ हातो.
[अर्य = गमनशील (पंडित).]
स ते जानाति सुमर्ति यविष्ठ य ईवते ब्रह्मणे गातुमैरत् |
विश्व्रान्यस्मै सुदिनानि रायो द्युन्नान्यर्यो विदुरो अभि द्यौत् ||
(ॠ.४.४,६).
हे सदा तरुणा अग्ने, जो गमन करणा-या स्तोत्याप्रीत्यर्थ स्तोत्रें म्हणतो. त्यावर तुझा अनुग्रह होतो ईश्वर असणारा तूं स्तोत्र करणा-या यजमानाला सर्व उत्तम संपत्ति, वैभव व चांगले दिवस दे.
यास्कानें अर्य शब्दाचा ईश्वर असा अर्थ केला आहे. निघण्टु मध्यें तसेंच आहे. सायणाचार्य बहुतेक ठिकाणीं स्वामि व क्वचित् स्थलीं शत्रु असा अर्थ करितात. रा. पंडित बहुतेक शत्रु व कांही ठिकाणी स्वामी असा अर्थ करितात. गमन करणारे चालून जाणारे किंवा येणारे असाहि अर्थ आहे.
एभि र्नृभिरिन्द्र त्वायुभिष्ट्वा मघवद्भि र्मघवन् विश्व आजौ |
द्यावो न घुन्मैरभि सन्तो अर्य: क्षपो मदेम शरदश्व पूर्वा: ||