प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
''आर्य'' शब्दाचा अर्थनिश्चय.- पुढील ॠग्वेदांतील अर्य, आर्य व तत्साधित शब्दांविषयींच्या उता-यांवरुन स्पष्ट होईल, की अर्य किंवा आर्य या दोन्ही शब्दांनीं महावंशवाचक (म्हणजे रेस Race हा अर्थ देणारा) एकहि उतारा वेदांत नाहीं. अर्थ सायणानुसार दिला आहे व इतर पंडितांचा अर्थाविषयीं मतभेद असल्यास तोहि दिला आहे.
प्रथमत: अर्य शब्द घेतला आहे आणि त्याचा वाक्यांत अर्थ जाडया अक्षरांनी दिला आहे.
अर्य हा शब्द आर्यवाचक अनेक ठिकाणीं नसून केवळ अरि शब्दाचें अनेकवचन म्हणून आला आहे. तथापि वाचकांच्या प्रत्यक्ष अवलोकनासाठीं म्हणून तसेहि उतारें दिले आहेत.
निसर्वसेन इषुधीरँसक्त समर्यो गा अजति यस्य वष्टि
[ॠ, १.३३.३.]
शकल सेनायुक्त श्रेष्ठ (इंद्र) भाता पाठिवर चढवितो. ज्याला गाई देण्याची इच्छा करतो त्याच्या घरीं चांगल्या रीतीनें गाई आणतो.
[अर्य = पालयिता (पंडित) ].
वनेम पूर्वीरर्यो मनीषा अग्नि: सुशोको विश्वान्यश्या:
(ॠ. १.७०.१)
(आम्हीं) स्तोत्रानें पुष्कळ शत्रूंना संहारुन टाकूं. सुप्रकाश अग्नि सर्व कर्में व्यापो.
दधन्नृतं धनयन्नस्य धीतिमादिदर्यो दिधिष्वो विभृत्रा:|
(ॠ. १.७१.३.)
आड्रि·रस ख-या (अग्नी) ला स्थापिते झाले. आणि अग्नीसंबंधी पूजाअर्चा धन समजूं लागले श्रेष्ठ अग्निहोत्र धारण करणारे अग्नीला भजूं लागले.
सनेम वाजं समिथेश्वर्यो भागं देवेषु श्रवसे दधाना: |
(ॠ. १.७३.५)
आम्हांला संग्रामांत शत्रूचें धन मिळो; मग यश मिळावें म्हणून आम्ही देवांना हविर्भाग देत जाऊं.
[अर्य: = अरि म्हणजे शत्रु याचें अनेकवचन (ग्रिफिथ, सायण व पंडित.) ]
यो अर्यो मर्तभोजनं पराददाति दाशुषे |
इन्द्रो अस्मभ्यं शिक्षतु..... ...... ||
(ॠ.१.८१,६)
जो प्रभु (इंद्र) हविर्दात्या उपासकाला उपर्युक्त अन्नादि पदार्थ देतो, ते पदार्थ तो इंद्र आम्हांला देवो.
[अर्य:=प्रभु=(इंद्र) पंडित ].
अन्तर्हिख्यो जनानामर्यो वेदो अदाशुषाम् |
(ॠ. १.८१.९)
हवि न अर्पण करणा-या लोकांच्या घरीं असलेलें धन तुला प्रभूला माहित आहे.
[अर्य:=सवेषां स्वामि: (प्रभु=इंद्र)पंडित]
पैद्वो वाजी सदमिद्धव्यो अर्य: |
(ॠ. १.११६.६).
पेदू नामक उपासकाच्या अश्वाची नेहमी धांवा करण्यासारखी (बोलावण्यासारखी) योग्यता आहे.- (पंडित)
[अर्य: = शत्रूणां प्रेरयिता (सायण) ]
युवं श्वेतं पेदव इन्द्रजूतमहिहनमश्विना दत्तमश्वम् |
जोहूत्रमर्यो अभिभूतिमुग्रं सहस्त्रसां वृषणं वीड्वड्गम् |
(ॠ. १.११८.९).
हे अश्वी हो, तुम्ही पेदूला शुभ्रवर्णाचा, इंद्रानें पाठविलेला शत्रूंना मारणारा, मोठयानें खिंकाळणारा, सामर्थ्यवान सहस्त्रावधि धन देणारा तरुण बळकट घोडा देते झालेत.
[अर्य: = अरे: शत्रो: अभिभूतिम् (ग्रिफिथ, सायण व पंडित)]
आनो भज मघवन् गोश्वर्यो (ॠ. १.१२१.१५). हे स्वामी (धनपती इंद्रा), तूं आम्हांला गाई मिळवून दे.
[अर्य: = स्वामी (सायण); अर्यः = धनपतिः (पंडित). अर्य: = शत्रु foe (ग्रिफिथ)]
अर्यो गिर: सद्य आजग्मुषी रोस्त्राश्वाकन्तूभयेश्वस्मे
(ॠ. १.११२.१४).
हे दैदिप्यमान (देव) आम्ही भाविकपणानें केलेल्या स्तुती आम्हां उभयतांवर कृपा करुन मान्य करोत.
[अर्य: = अरी: देवान्प्रति गन्त्री: = भाविका (पंडित).
अर्य: = अरणीयो विश्वेषां देवानां संघ: जग्मुषी: सायण ]
अध यदेषां पृथुबुध्नास एतास्तीर्थे नार्य: पौस्यानि तस्थु:
(ॠ.१.१६९,६)
ज्याप्रमाणें युद्धभूमीवर शत्रूंचीं सैन्ये उभीं असतात त्याप्रमाणें हे स्थूलजघन हरीण उभे आहेत.
[अर्य: = अरे: शत्रो: (सायण) अर्य: = रणोद्युक्तस्य स्वामिन: (पंडित, ग्रिफिथ) ]
तावामद्यतावपरं हुवेमोच्छन्त्यामुषसि वन्हिरुक्थै: |
नासत्या कुहचित् सन्तावर्यो दिवो नपाता सुदास्तराय ||
(ॠ.१.१८४,१)
हे नासत्य हो (अश्वीहो), तुम्हां द्युपुत्रांनां, तुम्ही कोठेहि असला तरी, उषःकाळ होतांच हवींनी व स्तोत्रांनी भक्तिपूर्वक यजमानासाठी आवाहन करुं. आज आव्हान करुं व उद्यां करुं,
[अर्य: = स्त्रोत्रशील (पंडित). अर्य: = ईरयिता (सायण) ]
भूरिचिदर्य: सुदास्तरायेषा मदन्त इषयेम देवा |
(ॠ.१.१८५.९).
देव हो स्तोते आम्ही अन्नयुक्त असें यजमानाला पुष्कळ धन इच्छितो.
विश्वा इदर्यो अभिदिप्स्वो मृधो बृहस्पतिर्विववर्हा रथाँइव
(ॠ.२.२३.१३).
स्वामी बृहस्पति, आमचा पराभम करणा-या; उपद्रव करणा-या व हिंसक अशा शत्रूंना रथाप्रमाणें तोडतो. (अनुपासक पंडित).
बृहस्पते अतियदर्यो अर्हाद्द्द्युमद्विभाति | तद्.... धेहि.....
(ॠ.२.२३,१५)
हे बृहस्पते, श्रेष्ठ मनुष्य जें योग्य मानील जें तेजोयुक्त असेल. तें दे.
अपां नपादसुर्यस्य मह्नाविश्वान्यर्यो भुवना जजान
(ॠ.२.३५,२).
स्वामी अग्नि बलसामर्थ्याने सर्व जग उत्पन्न करता झाला.
आ याहि पुर्वीरति चर्पणीराँ अर्य आशिष उप नो हरीभ्यास् |
(ॠ.३.४३,२).
(हे इंद्र) पुरातन लोकांना सोडून ये. (आणि आमचा) स्वामी तूं आमच्या प्रार्थना घोडयासह येऊन स्वीकार.
[अर्य: गमन करणा-या (पंडित).]
अनंन्ते अन्त: परिवीत आगाच्छुचि: शुक्रो अर्यो रोरुचान: |
(ॠ.४.१,७).
शुद्ध, तेजस्वी, देदीप्यमान (आणि) अनन्त अन्तरिक्षांत (स्वतेजानें) वेष्टिलेला प्रभु (अग्नि) येवो.
अतस्त्वं दृश्याँ अग्न एतान्पड्भि: पश्येरद्भुताँ अर्य एवै: |
(ॠ.४,२,१२).
म्हणून हे अग्ने (यज्ञाचा) स्वामी तूं अद्भुत व रम्य अशा देवांना पायांनी (ज्वालांनी) पाहतोस.
आ यूथेव क्षुमति पश्वो अख्यद्देवानां यज्जनिमान्त्युग्र |
मर्तानां चिदुर्वशीरकृप्रन्वृधे चिदर्य उपरस्यायो: ||
(ॠ.४.२.१८).
हे प्रबल अग्ने शब्द करणा-या पशूंच्या कळपांत पशु पहिल्या प्रमाणें मेघ पाहिले म्हणजे मनुष्याच्या कामना पूर्ण होतात, आणि अर्य (स्वामी) पेरलेल्या धान्याच्या आणि भृत्यांच्या संरक्षणाविषयीं समर्थ हातो.
[अर्य = गमनशील (पंडित).]
स ते जानाति सुमर्ति यविष्ठ य ईवते ब्रह्मणे गातुमैरत् |
विश्व्रान्यस्मै सुदिनानि रायो द्युन्नान्यर्यो विदुरो अभि द्यौत् ||
(ॠ.४.४,६).
हे सदा तरुणा अग्ने, जो गमन करणा-या स्तोत्याप्रीत्यर्थ स्तोत्रें म्हणतो. त्यावर तुझा अनुग्रह होतो ईश्वर असणारा तूं स्तोत्र करणा-या यजमानाला सर्व उत्तम संपत्ति, वैभव व चांगले दिवस दे.
यास्कानें अर्य शब्दाचा ईश्वर असा अर्थ केला आहे. निघण्टु मध्यें तसेंच आहे. सायणाचार्य बहुतेक ठिकाणीं स्वामि व क्वचित् स्थलीं शत्रु असा अर्थ करितात. रा. पंडित बहुतेक शत्रु व कांही ठिकाणी स्वामी असा अर्थ करितात. गमन करणारे चालून जाणारे किंवा येणारे असाहि अर्थ आहे.
एभि र्नृभिरिन्द्र त्वायुभिष्ट्वा मघवद्भि र्मघवन् विश्व आजौ |
द्यावो न घुन्मैरभि सन्तो अर्य: क्षपो मदेम शरदश्व पूर्वा: ||
(ॠ. ४.१६, १९).
हे इंद्र, सर्व संग्रामांत, धनवान् अशा तुझ्या भक्ताबरोबर द्युप्रदेशाप्रमाणें प्रकाशणारे आम्ही शत्रूंचा पराभव करण्याकरितां पुष्कळ रात्रीं व पुष्कळ वर्षे तुला स्तवूं.
इमं यज्ञं त्वमस्माकमिन्द्र पुरो दधत्सनिष्यसि क्रतुं न: |
श्वघ्नीव वाज्रिन्त्सनये धनानां त्वया वयमर्य आजिं जयेम ||
(ॠ.४.२०,३).
हे अर्य (स्वामी) इन्द्रा, तूं आमचा पुरस्कर्ता होऊन आमचा यज्ञ सेवन कर. हे वज्रधरा, धनलाभाकरितां पारध्याप्रमाणें युद्ध जिंकू असें क.
यदा समर्ये व्यचेदृघावा दीर्घे यदाजिमभ्यख्यदर्य: |
अचिक्रदद्दृषणं पत्न्यच्छा दुरोण आ निशितं सोमसुभ्दि: |
(ॠ.४.२४.८).
ज्या वेळी शत्रूंना मारणारा इन्द्र रणांत जातो, ज्या वेळीं स्वामी इन्द्र पुष्कळ युद्ध करितो, त्या वेळीं सोम पिऊन तर्र झालेल्या इन्द्रास त्याची पत्नी हांका मारते.
आ न: स्तुत उप वाजेभिरुती इन्द्र याहि हरिभिर्मन्दसान: |
तिरश्विदर्य: सवना पुरुण्याड्·गूषेभिर्गृणानं: सत्यराधा: |
(ॠ.४.२९,१).
हे इन्द्रा, आनंदी, स्वामी, गायलेला, व सत्यधन असा तूं, अन्नासह पूर्ण अशा आमच्या यज्ञांत संरक्षणाकरितां घोडयासह ये.
उत वाजिनं पुरुनिष्षिध्वानं दधिक्रामु ददथुर्विश्वकृष्टिम् |
ॠजिप्यं श्येनं प्रुषितप्सुमाशुं चर्कृत्यमर्यो नृपतिं न शूरम् ||
(ॠ.४.३८,२).
आणि बलवान्, पुष्कळ शत्रूंचा पराभव करणा-या दधिका देवाला सकल लोक ज्याची आज्ञा मानतात, सरळ व स्तुत्य गमन करणारा दीप्तरुपी शत्रूंचा नाश करणा-या शूर राजाप्रमाणें असणा-या देवाला द्यावापृथिवी धारण करितात.
विहि होत्रा अवीतां विपो न रायो अर्य: |
वाय वा चन्द्रेण रथेन याहि सुतस्य पीतये ||
(ॠ.४.४८,१).
जसा एखादा शत्रूंना कांपविणारा अर्य संपत्ति (उपभोगितो) त्याप्रमाणें तूं अभक्षित आहुति भक्षण कर. तूं आल्हादकारक रथानें सोमरस पिण्यासठी ये.
बृहस्पत इन्द्र वर्धतं न: स चा सा वां सुमतिर्भूत्वेस्म |
अविष्टं धियो जिगृतं पुरंधीर्जजस्तमर्यो वनुषामराती: |
(ॠ.४.५०,११).
हे बृहस्पते, हे इन्द्रा, तुम्ही आमची अभिवृद्धि करा. तुमची अनुग्रह बुद्धि आमचेवर होवो. कर्मे रक्षा आमची स्तुति ग्रहण करा, आमचे शत्रु (अर्य) नष्ट करा.
[अर्य देवहीन (विशेषण) पंडित]
तुविग्रीव्रो वृषभो वावृधानो शत्र्वर्य: सग्नजाति वेद: |
(ॠ.५.२,१२).
बहुज्वालायुक्त, (इच्छा) पूर्ण करणारा व वाढणारा अग्नि शत्रूंचें (अर्य:) धन सहज प्राप्त करुन देतो.
या इत्था मघवन्ननु जोषं वक्षो अभिप्रार्य: सक्षि जनान् |
(ॠ.५.३३,२).
हे इन्द्रा, जीं स्त्रोत्रें तूं प्रेमपूर्वक म्हणतोस तीं म्हणून आमच्या शत्रूला पराभूत कर.
प्रार्य स्तुषे तुविमघस्य दानम्
(ॠ.५.३३,६).
मी श्रेष्ठ व धनवानाच्या दानाची स्तुति करितों.
सहस्त्रा मे च्यवतानो ददान आनुकमर्यो वपुषेनार्चत् |
(ॠ.५.३३,९).
मला अपरिमित धन देणा-या च्यवतानानें शरीरावर घालण्याचे अलंकार दिले.
सहस्त्रसामाग्निवेशिं गृणीषे शत्रिमग्न उपमां केतुमर्य: |
(ॠ.५.३४.९).
हे अग्ने अर्य असा मी अपरिमित धन देणारा अग्निवेशसुत शत्रीला स्तवितो.
तं नाकमर्यो अगृभीतशोचिषं रुशत्पिप्पलं मरुतो विधूनुथ |
(ॠ.५.५४,१२).
हे मरुतांनो गमन करणारे तुम्ही ह्या आदित्याला (आणि) शुभ्रवर्ण तेजस्वी उदकाला हलवा (म्हणजे तें खाली पडेल).
नाना ह्य १ ग्नेवसे स्पर्धन्ते रायो अर्य: |
तुर्वन्तो दस्युमायवो व्रतै: सीक्षन्तो अव्रतम् |
(ॠ.६.१४,३).
अग्ने शत्रूंची संपत्ति तुझ्या स्तोत्यांच्या रक्षणाकरितां अनेक प्रकारें स्पर्धा करिते. दस्यूंचा क्षय करणारे व व्रतांनी व्रतविरोधी लोक पराभूत करण्याची इच्छा करणारे स्तोते लोक आहेत.
स त्वं दक्षस्यावृको वृधोभूरर्य: परस्यान्तरस्य तरुष: |
(ॠ.६.१५,३).
अग्ने, त्रास न देणारा तूं अनुष्ठानसमर्थ लोकांस उत्कर्षयुक्त करतोस आणि दूरच्या आणि जवळच्या शत्रूंपासून रक्षण करणारा होतोस.
तरन्तो अर्यो अरातीर्वन्वन्तो अर्यो अराती: |
(ॠ.६.१६,२७).
गमन करणा-या शत्रुसेना उल्लंघून जाणारे व गमन करणा-या शत्रूसेनांचे हिंसा करणारे होतात.
द्यौ र्नय इन्द्राभिभूमार्य स्तस्थौ |
(ॠ.६.२०,१).
द्यौ ज्याप्रमाणें भूतमात्राचें आक्रमण करितो, त्याप्रमाणें इंद्र संग्रामांत शत्रूचें अतिक्रमण करील.
मित्रोनो अत्र वरुणश्व पूषार्यो वशस्य पर्ये तास्ति |
(ॠ.६.२४,५).
मित्र, वरुण, पूषा आणि प्रेरक सूर्य हे देव, हे इंन्द्रा आमच्या इच्छित फलाला पूर्ण करणारे होवोत.
अधस्मा ते चर्पणयो यदेजानिन्द्र त्रातोत भवा वरुता |
अस्माकासो ये नृतमासो अर्य इन्द्रसूरयो दधिरे पुरो न: ||
(ॠ.६.२५,७).
आणि हे श्रेष्ठ (अर्य) इंन्द्रा, तुझे लोक ज्यावेळीं (भीतीने) कंपित होतात त्यावेळीं तूं त्यांचा त्राता हो, आणि परामर्श घेणारा हो तुझ्याकडे येणा-या आमच्या लोकांचा व स्तोत्र करणारांचा संरक्षण करणारा हो.
स तु श्रुधि श्रुत्या यो दुवोयुर्द्यो र्न भूमाभिरायो अर्य: |
(ॠ.६.३६,५).
हे इन्द्रा मजेदार स्तोंत्रे ऐक आमची सेवा इच्छिणारा शत्रूंचें धन अभिभूत करतोस, तो तूं आमचीं स्तोत्रें ऐक.
तत्सुनो विश्वे अर्य आ सदा गृणन्ति कारव: |
(ॠ.६.४५.३३).
(त्या बृबला) आमचे सर्व स्तुति (प्रे्ररित) करणारे अर्य गातात.
मानस्तारीन्मघवन्रायो अर्य: |
(ॠ.६.४७,९).
हे इन्द्र, दुसरा कोणीहि धनाचा स्वामी आमचीं धनें नाहींशीं न करो.
आमापूषन्नुपद्रवशंसिष न्नुते अपि कर्ण आवृणे अघा अर्यो अरातय: |
(ॠ.६.४८,१६).
हे पूषन् माझ्या रक्षणाकरितां धांव. हे प्रकाश देणा-या हिंसक आणि चालून येणा-या शत्रूंना पीडा दे. मी तुझ्या कानाजवळ प्रशंसा करितों.
अभिचष्टे सूरो अर्य एवान् |
(ॠ.६.५१,२).
स्वामी (होऊन) सर्व इच्छा प्रकाशित करतो.
इन्द्राग्नी तपन्ति माघा अर्यो अरातय: |
अपद्वेषांस्याकृतं युयुतं सूर्यादधि ||
(ॠ.६.५९,८).
हे इन्द्राग्नी हो, हिंसक आणि चालून येणा-या शत्रु (सेना) पीडा देतात. त्यांना नाहींसे करा. शत्रूंना (मारुन टाक) सूर्यापासून वेगळे कर.
इन्धे राजा समर्यो नमोभि: |
(ॠ.७.८,१)
तेजस्वी, (आमचा) स्वामी अग्नि स्तुति करुन प्रज्वलित केला जातो.
स शर्धदर्यौ विषुणस्य जन्तो: |
(ॠ.७.२१,५).
स्वामी इन्द्र भयंकर प्राण्यांच्या (हिंसेविषयीं) उत्सुक होवो.
वन्वन्तु स्माते वसासमीके भीतिमर्यो बनुषां शवांसि |
(ॠ.७.२१,९).
हे इन्द्र, तुझ्या कृपेनें युध्दांत शत्रूंची स्वारी आणि हिंसकांचीं बलें यांचा स्तोते नाश करितात.
मानो निदे च वक्तवेर्यो रम्धी रराव्णे
(ॠ.७.३१,५).
हे स्वामी (अर्य:) ! आम्हाला निंदकाच्या, मर्मभेदी भाषण करणा-याच्या व अनुदाराच्या स्वाधीन करुं नकोस.
उत न एषु नृषु श्रवोधु: प्रराये यन्तु शर्धन्तो अर्य: |
(ॠ.७.३४,१८).
(आमच्या) ह्या लोकांत देवांना अन्न दिलें जावो. धनाकरितां हपापलेले आमचे शत्रू नष्ट होवोत.
ते चिद्धि पूर्वीरभिसन्ति शासा विश्वाँ अर्य उपरताति वन्वन् |
इन्द्रो विभ्वाँ ॠभुक्षावाजो अर्य: शत्रोर्भिथत्या कृष्णवन्वि नृम्णम् |
(ॠ.७.४८,३).
ते देव पुष्कळ (आमच्या शत्रुसेना) आयुधानें पराभूत करितात. आणि त्यांनी आयुधानें युध्दांत शत्रुला पराभूत केलें. शत्रूंवर गमन करणारे विभ्वन्, ॠभुक्षा, वाज हे देव शत्रूचें बल हिंसेनें नाहीसें करोत.
अधस्मानो मरुतो रुद्रियासस्त्रातारोभूत पृतनास्वर्य: |
(ॠ.७.५६,२२).
आतां हे रुद्रपुत्र मरुतहो, युध्दांत शत्रुसेनेपासून आमचें रक्षण करा.
सीक्षन्त मन्युं मधवानो अर्य उरु क्षयाय चक्रिरे सुधातु |
(ॠ.७.६०,११).
स्तोत्याची स्तोत्रें उदार देव ऐकतात. व त्याला राहण्याकरितां स्थान करितात.
मित्रस्तन्न्नो वरुणो देवो अर्य: प्रसाधिष्ठेभि: पथिभिर्नयन्तु
(ॠ.७.६४,३).
मित्र, वरुण आणि अर्यमा हे तीन देव (योग्यासाठीं) साधक मार्गानें प्राप्त होवोत.
तिरो अर्यो हवनानि श्रुतं न: |
(ॠ.७.६८,२.)
(आमच्या) शत्रूंचीं बोलावणीं टाकून आमचीं बोलावणीं ऐका.
इन्द्रावरुणावभ्यातपन्ति माघान्यर्यो वनुषामरातय:
(ॠ.७.८३,५)
हे इन्द्रावरुणहो, शत्रूंचीं शस्त्रें मला त्रास देतात. आणि हिंसकांपैकीं (जे) शत्रु (ते) त्रास देतात.
अचेतयदचितो देवो अर्य: |
(ॠ.७.८६,७)
स्वामी आम्हां अज्ञानांस ज्ञान देवो.
आदेवासो नितोशनासो अर्य: |
घ्नन्तो वृत्राणि सूरिभि: ष्याम |
(ॠ.७.९२,४).
जे देवयुक्त (म्हणूनच) शत्रूला मारणारे त्या स्तोत्याकडून शत्रूला मारणारे आम्ही होऊं या.
प्रतत्ते अद्य शिपिविष्ट नामार्य: शंसामि वयुनानि विठाम् |
(ॠ.७.१००,५),
हे प्रकाशव्याप्त, श्रेष्ठ व ज्ञातव्य जाणणारा मीं आज तुझी अत्यन्त स्तुति करितों.
वितर्तूर्यन्ते मघवन्,विपश्चितोर्यो विपो जनानां
(ॠ.८.१,४)
हे मधवन्, तुझे स्तोते चाल करुन जाणारे (अर्य:) व शत्रूंना कांपवणारे होत्साते त्यांच्यावर अनेक संकटें आणतात.
अदान्मै पौरुकुत्स्य: पश्चाशतं त्रसदस्युर्वधूनाम् |
मंहिष्ठो अर्य: सत्पति: |
(ॠ.८.१९,३६).
मोठा उदार, स्वामी किंवा अभिगम्य, स्तोत्यांचा चहाता अशा पुरुकुत्सपुत्र त्रसदस्यूनें मला पन्नास दासी दिल्या.
दृह्ळाचिदर्य: पसृशाभ्याभर न ते दामान आदभे
(ॠ.८.२१,१६).
हे इन्द्र, आमचा स्वामी असणारा तूं आम्हाला स्थिर संपत्ति दे. आम्हाला थोर कर, (कारण) तुझीं दानें कोणीहि काढून घेऊं शकत नाहीं.
अर्यो गयं मंहमानं विदाशुषे
(ॠ.८.२४,२२).
श्रेष्ठ इन्द्र हविर्भाग देणारांनां मोठें गृह (देतो).
आयाह्यर्य आपरिस्वाहा सोमस्य पीतये |
(ॠ.८.३४,१०).
ईश्वर असणारा तूं सर्व बाजूंनी ये. तुला पिण्याकरितां सोम अर्पण करितों.
न्यरातीरराव्णां विश्वा अर्यो अरातीरितो युच्छन्तु
(ॠ.८.३९,२).
हे अग्ने, हविर्भाग देणा-यांच्या शत्रूंस नाहीसें कर. सर्व (अर्य) शत्रू नाहीसे होवोत.
अलर्ति दक्ष उत मन्युरिन्दो मा नो अर्यो अनुकामं परादा :
(ॠ.८.४८,८).
हे इन्द्रो, (आमचा) बलाढय शत्रु जावो. क्रोध नाहींसा होवो आणि अशा शत्रूस आमच्या इच्छेप्रमाणें नाहीसें कर.
येन वंसाम पृतनासु शर्धतस्तरन्तो अर्य आदिश: |
(ॠ.८.४९,१२).
ज्याच्या योगानें संग्रामांमध्यें शस्त्रें फेंकणा-या शत्रूंनां आम्ही जिंकतों.
विपोर्यो मानस्य स क्षय: |
(ॠ.८.५२,७).
तो श्रेष्ठ इन्द्र स्तोत्याच्या मानाचें स्थान आहे.
विश्वाँ अर्यो विपश्चिवितो तिख्यस्तूयमागहि |
अस्मे धेहि श्रवो बृहत्
(ॠ.८.५४,९).
(हे इन्द्र) स्वामी तूं सर्व स्तोत्यांकडे पहा. त्याकरितां तूं जलदीनें ये व आम्हांला यश दे.
तिरश्चिदर्य: सवना वसो गहि शविष्ट श्रुधिमे हवम् |
(ॠ.८.५५,१२).
शत्रूंच्या यज्ञाचा तिरस्कार करुन हे अर्य इन्द्र ये. आणि हे बलवन् मी केलेली स्तुति ऐक.
आपवमान नो भरार्यो अदाशुषो गयम् | कृधि प्रजावतीरिष: ||
(ॠ.९.२३,३).
हे पवमान, सोम न देणा-यांचें शत्रूंचे धन आम्हाला दे व आम्हांस प्रजा व अन्नयुक्त कर.
एना विश्वान्यर्य आद्युम्नानि मानुषाणाम् |
सिषासन्तो वनामहे |
(ॠ.९.६१,११).
ह्या सोमानें मनुष्याचीं सर्व अन्ने, चालून जाणारे आणि उपभोगणारे आम्ही उपभोगूं.
अर्यो नशन्त सनिषन्त नो धिय: |
(ॠ.९.७९,१).
शत्रू नष्ट होवोत. आणि आमचीं कर्मे आमचे आवडते देव उपभोगोत.
[अर्य: =नास्तिक-ग्रिफिथ.]
अर्यो विशां गातुरेति प्रयदानड् दिवो अन्तान् कविरभ्रं दीद्यान: |
(ॠ.१०.२०,४).
यजमानांचा गमनशील तेजस्वी व मेधावी अग्नि ज्या वेळीं वर जातो त्यावेळी तो आकाश व्यापितो.
गावो यवं प्रयुता अर्यो अक्षन्ता अपश्यं सह गोपाश्वरन्ती: |
हवा इदर्यो अभित: समायन् कियदासु: स्वपतिश्र्छन्दयति ||
(ॠ.१०.२७,८).
धार्मिक लोकांनी दिलेले यव ह्या गाई खात आहेत आणि त्या गोपालांच्या भोंवतालीं जमल्या आहेत हें मी पहात आहें. ते धार्मिक लोक त्या गांईना आपल्याकडे हांक मारितात पण ते त्यांच्यापासून कसली अपेक्षा करीत आहेत ?
[१ अर्य=स्वामी (सायणाचार्य) २ वरील अर्थ ग्रिफीथ.]
सिषक्त्यर्य: प्र युगा जनानां सद्य: शिश्ना प्रमिनानो नवीयान्
(ॠ.१०.२७,१९).
तात्काल राक्षसवृन्दाला मारणारा, व तरुण असा स्वामी इन्द्र लोकांचे यज्ञांत येतो.
अक्षैर्मादीव्य: कृषिमित्कृषस्व वित्ते रमस्व बहु मन्यमान: |
तत्र गाव: कितब तत्र जाया तन्मे विचष्टे सवितायमर्य: ||
(ॠ.१०.३४,१३).
हे कितव, तूं जुगार खेळूं नकोस. शेतकीच कर. पैशाला जप. शेतकी केल्यानें पत्नी, गाई, बैल सर्व कांही मिळतें. असें सर्व प्रेरक ईश्वरानें मला सांगितलें आहे.
अस्तेव सु प्रतरं लायमस्यन् भूषन्निव प्रभरा स्तोममस्मै |
वाचा विप्रास्तरत वाचमर्यो नि रामय जरित: स्तोम इन्द्रं ||
(ॠ.१०.४२,१.)
ज्याप्रमाणें धनुर्धारी आपला बाण दूर सोडतो त्याप्रमाणें याला स्तोम भूषवून अर्पण कर; अहो विप्र ! तुम्ही आपल्या स्तुतीनें शत्रूंचें (अर्य:) तोंड बंद करा; हे जरित ! माझ्या सोमयागांत तूं इन्द्राला रमव.
अभीश्वsर्य: पौस्यैर्भवेम |
(ॠ.१०.५९,३).
आम्ही शत्रूला सामर्थ्यानें पराभूत करुं, असें कर.
विदद्धयsर्यो अभिभूति पौस्यं
(ॠ.१०.७६,२).
शत्रूंना पराभूत करणारें बल यजमान मिळवितो.
विहि सोतोरसृक्षत नेन्द्रं देषममंसत |
यत्रा मदद्रृषाकपिरर्य: पुष्टेषु मत्सखा विश्वस्मा-दिन्द्र उत्तर: ||
(ॠ.१०.८६,१.)
सोमयागाकरितां पाठविलेले स्तोते जेथें इन्द्राला देव मानीतनासे झाले; पण त्या ठिकाणी स्वामी (अर्य:) वृषाकपि माझा सखा सोमपानानें तृप्त झाला. तरी सुद्धां इन्द्र सर्व जगांत श्रेष्ठ आहे.
किमयं त्वां वृषाकपिश्चकार हरितो मृग: |
यस्मा इरस्यसी दुन्वर्यो वा पुष्टिमद् वसु विश्वस्मादिन्द्र उत्तर : ||
(ॠ.१०.८६,३.)
हरित वर्णाचा मृग जो वृषाकपि त्यानें तुझें काय केलें आहे ? की तूं त्याला उदार (अर्य:) होऊन पोषयुक्त धन देतोस. इन्द्र सर्व जगांत श्रेष्ठ आहे.
विय: पृष्ठेव जनिमान्यर्य इन्द्रश्चिकाय न सखायमीषे
(ॠ.१०.८९,३).
यज्ञांत उत्पन्न झालेलीं पृष्ठस्तोत्रें म्हटली म्हणजे इन्द्र शत्रूंचा नाश करितो. त्याला मित्राची जरुर लागत नाही.
[अर्य: = श्रेष्ठ: ग्रिफिथ.]
व्यर्थ इन्द्र तनुहि श्रवांसि
(ॠ.१०.११६,६)
हे इन्द्र स्वामी तूं आम्हांला अन्न दे.
विषुविश्वा अरातयोर्यो नशन्त नो धिय: |
(ॠ.१०.१३३,३.)
सर्व चाल करुन येणा-या (अर्य:) आमच्या शत्रूंना मारुन टाक व आमचीं कर्मे प्रवृत्त कर.
अर्यो वा गिरो अभ्यर्च विद्वान् ॠषीणां विप्र: सुमतिं चकान: |
(ॠ.१०.१४८,३).
मंत्रद्रष्टया ॠषींचा अनुग्रह इच्छिणारा ज्ञाता व स्वामी अशा इन्द्रा स्तोत्याची स्तुति ऐकून सत्कार कर.
संसमिद्युवसे वृषन्नप्रे विश्वान्यर्य आ |
(ॠ.१०.१९१,१.)
हे शूर अग्नं ! स्वामी (अर्य:) ! तूं सर्व भूतजात वस्तू एकत्र जमवितोस.
वरील ८८ उता-यांचे थोडेसे पृथक्करण करुं. अर्य याचे आपणांस जे अनेक अर्थ दिसतात, ते येणेंप्रमाणें:- अर्य याचा एक अर्थ शिष्ट, स्वामी किंवा श्रेष्ठ असा उच्च भावदर्शक आहे. अर्य: हा शब्द जेथें इन्द्र किंवा अग्नि यांचे विशेषण असेल तेथें तो शब्द अर्थात् गुणवाचक श्रेष्ठ, शिष्ट, प्रभु, स्वामी अशा अर्थीचं होय. या अर्थाचे व्यंजक उतारे येणेंप्रमाणें:-
१.३३,३; १.८१,६; १.८१,९; १.१२१,१५ (सा.पं).१.१२२,१४; १.१८४,१; २.२३,१३; २.२३,१५; २.३५,२; ३.४३,२; ४.१,७; ४.२,१२ ;४.४,६; ४.२०,३; ४.२४,८; ४.२९,१; ४.३८,२; ४.४८,१; ५.३३,६; ५.३३,९; ५.३४,९; ६.२४,५; ६.२५,७; ६.४७,९; ७.८,१; ७.२१,५; ७.३१,५; ७.८६,७; ७.१००,५; ८.१९,३६; ८.२१,१६; ८.२४,२२; ८.३४,१०; ८.५५,१२; १०.२०,४; १०.२७,८; १०.२७,१९; १०.३४,१३; १०.८६,१ व ३; १०.१९१,१; १०.११६,६; १०.१४८,३;
अर्य: हें अरि शब्दाचें अनेकवचन जेव्हां असेल तेव्हां तो उतारा विचारास अग्राह्य होय. तथापि आम्ही ते सर्व उतारे अशाकरितां घेतले आहेत कीं, कांही ठिकाणी दुसरा अर्थ निघणें शक्य आहे. शत्रुवाचक अर्य: शब्द वापरणारे उतारे येणेप्रमाणें.
१.७०,१; १.७३,५; १.११८,९; १.१२१,१५ (ग्रि.); १.१६९,६; ४.१६,१९; ५.३३,२; ६.१४,३; ६.१५,३; ६.२०,१; ६.३६,५; ७.२१,९; ७.३४,१८; ७.४८,३; ७.५६,२२; ७.६८,२; ७.९२,४; ८.४८,८; ८.४९,१२; ९.२३,३; ९.७९,१; १०.४२,१; १०.५९,३; १०.७६,२; १०.८९,३;
मालक, वैश्य, नागरिक अशा अर्थी शब्दाचा उपयोग अनेक ठिकाणी आला आहे. जेथें वक्ता स्वत:च्या वर्गासंबंधानें बोलत आहे, तथापि जेथें कोणत्याहि विशिष्ट विधानानें त्याचें वर्गस्वरुप निश्चित होत नाहीं. व जेथें टीकाकारांनी स्तोता असा त्याचा अर्थ लावून काम भागविलें आहे असेहि उतारे आहेत ते ४.२,१८; ४.२०,३.
जेथे शत्रुवाचक अर्य: शब्दाचा उपयोग झाला आहे. तथापि शत्रुवाचक दुसरा शब्द आहे असेहि उतारे आहेत. ४.५०,११; ६.१६,२७; ६.४८,१६; ७.८३,५; ८.३९,२.
गमन करणारे चालून येणारे हाहि एक अर्थ आहे. कांही ठिकाणीं (उ.९.६१,११) एकाच शब्दसमुच्चयाचे भिन्न अर्थ व्यक्त झाले आहेत. राय: अर्य (अर्यो राय:) या ठिकाणी दोन अर्थ केलेले आहेत. धनांचा स्वामी किंवा शत्रूंचें धन उ. ६.४७,९
अर्य हे पुष्कळदां इंद्र वगैरेंचें विशेषण केलें आहे. जेथें शत्रूचा असाहि अर्थ केला आहे त्या ॠचांत देखील तो शब्द शत्रूचा अशा अर्थी न लावतां इन्द्राचें विशेषण या अर्थी लावण्यासारखा असतो. अर्यमा असाहि एक (७.६४,३) अर्थ आहे.
वरील उता-यांवरुन असें दिसून येईल कीं, अर्य या शब्दाचें वेदकालीन लोकांच्या वंशनिश्चयास अगर राष्ट्रनिश्चयास पोषक असे उतारें नाहींतच.
आतां अर्य या शब्दाचीं दुसरीं रुपें घेऊं
योदेह्यो ३ अनमयद्वधस्नैर्योअर्यपत्नीरुषसश्चकार |
सनिरुध्यानहुषो यह्वो अग्निर्विशश्चक्रेबलिहृत:सहोभि: ||
(ॠग्वेद:७.६,५).
ज्या अग्नीनें आयुधांनी आसुरी विद्येचा मोड केला व उषांस सूर्यपत्नी केलें त्यानें बलानें प्रजांचा निरोध करुन नहुषाच्या हस्तगत केल्या.
वृषान कुद्ध: पतयद्रजस्वा यो अर्यपत्नी रकृणोदिमां अप: |
(ॠग्वेद १०.४३,८; अथर्व २०.१७,८)
तो क्रुद्ध वृषभाप्रमाणें लोकांत जोरानें गेला आणि हें पावसाचें पाणी त्यानें (जगाचा) स्वामी (इंद्र) त्याच्या ताब्यांत आणलें.
वहन्तुत्वा रथेष्ठामाहर यो रथयुज: |
तिरश्चिदर्ये सवनानि वृत्रहन्नन्येषां या शतक्रतो ||
(ॠ.८.३३,१४).
हे शतक्रतो ! वृत्रहंत्या ! रथांत बसलेल्या तुला ईश्वराला (अर्य), रथाला जोडलेले घोडे इतरांच्या सवनांना बाजूला सारुन, आमच्या सवनांकडे आणोंत.
तिरश्चिदर्यया परि वर्तिर्यातमदाभ्यामाध्वी मम श्रुतंहवम् ||
(ॠ.५.७५,७).
अहिंसकानो ! अहो स्वामीहो (अर्यया), दूर देशाहून आमच्या यज्ञगृहाला या; मधुविद्या जाणणारांनो ! माझें आव्हान ऐका !
कृष्णादुदस्थादर्या ३ विहायाश्चिकित्सन्ती मानुषाय क्षयाय ||
(ॠ.१.१२३,१).
ही पूजनीय (अर्या) व महान् उषा मनुष्यांच्या वसतीला प्रकाश द्यावा म्हणून अंधारातून उगवत आहे.
ताहि देवानामसुरा तावर्यातान: क्षिती: करत मूर्जयन्ती: ||
(ॠ.७.६५,२).
ते (दोघे) देवांमध्यें बलिष्ठ आहेत; ते ईश्वर (अर्या) आमची जमीन प्रजा वगैरे उर्जितावस्थेस आणोत.
अस्य स्तोमे मघोन: सख्ये वृद्धशोचिष: |
विश्वा यस्मिन्तुविश्वणि समर्ग्रे शुष्ममादधु: ||
(ॠ.५.१६,३.).
सर्व कांही या धनवान् व ज्याचें तेज वाढत आहे अशा (अग्नी) च्या स्तोमावर व सख्यावर अवलंबून आहे; सर्व ॠत्विज या बहुभावी स्वामी (अर्ये) च्या ठिकाणी बल घालतात.
यस्यायं विश्व आर्यो दास: शेवधिपा अरि: |
तिरश्चिदर्ये रुशमे पवीरवि तुभ्येत्सो अज्यते रयि: ||
(ॠ.८.५१,९).
हे सर्व आर्य व दास ज्याचे आहेत तो उत्तम धनेश्वर होय. हे धर्मिष्ट (अर्ये) रुशम पवीरवा ! तुला तें धन प्राप्त झालेलें आहे.
सन्ति ह्य १ र्य आशिष इन्द्र आयुर्जनानाम्
(ॠग्वेद ८.५४,७)
श्रेष्ठ व्यक्तीवर (अर्ये) आमच्या आशा अवलंबून आहेत लोकांचें जीवित इंद्राच्या ठिकाणीं आहे. (ग्रिफिथप्रमाणें अर्येचा अर्थ घेतला आहे.)
अर्यपत्नी या शब्दाचा सूर्यपत्नी असा अर्थ (७.६.५) होतो. पण दुस-या १०.४३,८ मध्यें अर्य याचा अर्थ स्वामी असा व पत्नी याचा अर्थ स्वाधीन असा केला गेला आहे. ८.३३,१४ मध्यें ईश्वर आणि ५.७५,७; ५.१६,३; मध्यें स्वामी असा अर्थ आहे. १.१२३,१ मध्यें अर्या हें विशेषण पूजनीय किंवा मानार्ह इ. अर्थानें उषेस लावलें आहे. ७.६५,२; ८.५१,९; ८.५४,७. मध्यें श्रेष्ठ असाच अर्थ आहे.
आतां आर्य शब्दाकडे वळूं. येथें ऐतिहासिक महत्वाचे कांही उतारे दृष्टीस पडतात.
इन्द्रो विश्वस्यदमिता विभीषणो ययावशं नयति दासमार्य:
(ॠ.५.३४,६).
विश्वाचें दमन करणारा भयजनक स्वामी (आर्य:) जो इंद्र ता इच्छेस येइल त्याप्रमाणें दासांनां वश करतो. (सायणाचार्य).(ज्याप्रमाणें आर्य दास लोकांनां इच्छेप्रमाणें वाकवितो त्याप्रमाणें इंद्र-असा ग्रिफिथ अर्थ करतो.)
योनो दास आर्योवा पुरुष्टुतादेव इंद्र युधये चिकेतति |
अस्माभिष्ठे सुषहा: सन्तु शत्रवस्त्वया वयं तान्वनुयाम संगमे |
(ॠग्वेद.१०.३८,३.).
हे बहुस्तुत इंद्रा ! जे दास किंवा आर्य अधार्मिक लोक आमच्याशीं युद्ध करतील, ते आमचे शत्रू तुझ्या प्रसादानें जिंकण्यास सुलभ होवोत. तुझ्या साहाय्यानें युध्दांत त्यांना आम्ही मारुं.
विसूर्योमध्ये अमुचद्रथं दिवोत्विददृासाय प्रतिमानमार्य: |
(ॠ.१०.१३८,३.)
द्युलोकाच्या मध्यें सूर्यानें रथ सोडला; वृत्रादि दासाला प्रति-कृति-तोड आर्याला (इंद्राला) लाभली (सायण). (ग्रिफिथच्या मतें इंद्र ही प्रतिकृति दासाशीं झगडण्याकरिता आर्यांला लाभली)
स जातूभर्मा श्रदृधान ओज: पुरो विभिदन्नचरद्विदासी: |
विद्वान् वज्रिन् दस्यवे हेतिम् अस्यार्यम् सहो वर्धया द्युम्नम् इंद्र ||
(ॠ.१०.१०३.३)
इंद्र आपलें वज्र घेऊन व स्वपराक्रमावर भिस्त ठेवून दासांचीं पुरें (दस्यूंची) नाश करीत चालला. ''हे इंद्रा दस्यूंवर आपलें आयुध सोड; व आर्यांचें (विद्वान् स्तोत्यांचे ) बल व कीर्ती वाढव''.
इंद्र: समत्सु यजमानमार्यं प्रावद्विश्वेषु शतमूति राजिषु स्वर्मीहूळेश्वाजिषु |
मनवे शासदव्रतान्त्वचं कृष्णामरन्धयत् |
दक्षन्न विश्वं ततृषाणमोषति न्यर्शसानमोषति ||
(ॠ.१.१३०,८)
इंद्र युध्दांमध्यें यजमान आर्यांचें (आर्य उपासकांचे) रक्षण करतो; समरांगणांत तो शेंकडो प्रकारांनी त्यांचें रक्षण करतो व अत्यंत उत्तम सुख (लूट) त्या समरांगणावर मिळत असतें. कर्महीन लोकांचें शासन करुन काळया कातडीच्या लोकांना तो आर्यांच्या अधिकाराखाली इंद्र आणता झाला. सर्व हिंसक शत्रूंना जाळून खाक करता झाला.
आ यो विवाय सचथाय दैव्य इंद्राय विष्णु: सुकृते सुकृत्तर: |
वेधा अजिन्वत् त्रिषधस्थ आर्यमृतस्य भागे यजमानमाभजत् ||
(ॠ.१.१५६,५)
दैव्य व महासुकृती जो विष्णु तो सुकृती इंद्राला सहाय करण्यासाठीं येतो. तो त्रैलोक्यस्थ प्रभु विष्णु आर्य यजमानाला सुखी करो, व यज्ञाच्या भाग्याचा उपभोक्ता करो.
ससानात्याँ उत सूर्यं ससानेंद्र: ससान पुरुभोजसं गाम्
हिरण्ययमुत भोगं ससान हत्वी दस्यून्प्रार्यं वर्णमावत् ||
(ॠ.३.३४,९ अथर्व . २०.११.९)
इंद्रानें (आर्यांना) अश्व, सूर्य व गाई दिल्या; व सुवर्णमय संपत्ति दिली. त्यानें दस्यूंनां मारुन आर्य वर्णाच्या लोकांचे रक्षण केलें.
इंद्रं वर्धन्तो अप्तुर: कृण्वन्तो विश्वमार्यभू |
अपन्घन्तो अराव्ण: ||
(ॠ.९.६३,५).
इंद्राचें बल वाढविणारा, उदकाचा वर्षाव करणारा व सर्व शुभ गोष्टी करणारा, नास्तिकांचा (अराव्णो दातृन) नाश करणारा सोम पवमान इ०
वयो न वृक्षं सुsपलाशमासदन्त्सोमास इंद्रं मन्दिन: चभूषद: |
प्रैषामनीकं शवसा दविद्युतत् विदत्स्वर्मनवे ज्योति: आर्यम् ||
(ॠ.१०.४३,४. अथर्व २०.१७,४).
ज्याप्रमाणे सुंदर पालवी असलेल्या वृक्षावर पक्षी बसतात त्याप्रमाणें इंद्र्राकडे भांडयांतला सोमरस जात असतो. सोमरसाचा पृष्ठभाग चकाकत आहे. हा इंद्र आपल्यामधील प्रेरक तेज मानवांना देवो.
आर्य = प्रैर्य (Aryas) light).
अहमत्कं कवये शिश्र्नथं हथैरहं कुत्समावमाभिरुतिभि: |
अहं शुष्णंस्य श्र्नथिता वधर्यमं न यो रर आर्यं नाम दस्यवे ||
(ॠ.१०.४९,३).
मी कवी (ॠषी) करितां अत्काला घातक प्रहारांनीं मारिलें. तसेंच मी मदत करुन कुत्साचें चांगले संरक्षण केलें. शुष्णाचा वध करणारा मी त्याच्या वधाकरतां माझें वज्राचा उपयोग करतों. मी आर्यांचें नांव दस्यूंना (शत्रूंना) दिलें नाही.
यस्ते मन्यो विधद्वज्रसायक सह ओज: पुष्यति विश्वमानुषक्
साह्याम दासमार्यं त्वया युजा (वयं) सहस्कृतेन सहसा सहस्वता ||
(ॠ.१०.८३,१. अथर्व. ४.३२,१.)
जो कोणी हे मन्यू, तुझी आराधाना करतो, त्यास तूं सर्वजेती शक्ति देतोस; तुझ्या साहाय्यानें आम्ही आर्य व दस्यु या दोघाहि आमच्या शत्रूंना जिंकू (हा मन्यु ? सूक्तकार आर्यांना आपले शत्रु म्हणतो.)
अयमेमि विचाकशद् विचिन्वन् दासमार्यभ् ||
(ॠ.१०.८६,१९; अथर्व २०.१२६,१९).
मी (इंद्र) यजमानांना पाहून आर्य माझे मित्र व दास शत्रु असा फरक लक्षांत घेऊन मित्रांकडे (आर्य लोकांकडे) (साहाय्यार्थ) जातो.
आयोनयत्सधमा आर्यस्य गव्या तृत्सुभ्यो अजगन्युधानृन् |
(ॠ.७.१८,७.)
सधमानें (इंद्रानें) कर्मशील लोकांच्या (आर्यस्य) गाई तृत्सूपासून परत आणल्या व युध्दांत शत्रूंना ठार मारलें (सायण).
उपोषुजातमार्यस्य वर्धनमग्निं नक्षन्त नो गिर: |
(ॠ.८.१०३,१.)
उत्तम वर्णाचा (आर्यस्य) वर्धयिता जो सुजात् अग्नि त्या प्रत आमच्या स्तुती पोंचतात (सायण); (ग्रिफिथ 'आर्यस्य' म्हणजे 'आर्याचा' असा अर्थ घेतो)
दासस्यवा मघवन्नार्यस्यवा सनुतर्यवयावधम् |
(ॠ.१०.१०२,३.)
हे मधवन् ! दासाचें किंवा आर्याचें (चाल क न योणाराचें) वज्र नाहीसें करुन टाक.
उतत्या सद्य आर्यो सरयोरिन्द्र पारत: |
अर्णाचित्ररथावधी: ||
(ॠ.४,३०,१८.)
हे इंद्रा ! आर्य (आर्यत्वाभिमानी) असे जे अर्ण आणि चित्ररथ यांना तूं सरयूच्या पैलतीरीं मारलेंस.
त्वं ताँ इन्द्रोभयाँ अमित्रान्दासावृत्राण्यार्या च शूंर |
वधीर्वनेवं सुधितेभिरत्कैरा पृत्मुदर्षि नृणांनृतम ||
(ॠ.६.३३,३.)
हे इंद्र ! तूं आर्य आणि दारा या दोघां अवरोध करणा-या शत्रूंनां मारुन टाकलेंस; हे शुर नेत्या ! संग्रामांत आपल्या आयुधांनी तूं वनाप्रमाणें शत्रूंना छाटून टाकतोस.
हतो वृत्राण्यार्या हतो दासानि सत्पती |
हतो विश्वा अपद्विष: ||
(ॠ.६.६०,६.)
हे सत्पालक इंद्राग्नी आम्हांला उपरोध करणा-या आर्यांना व तसेंच दासांना मारतात; वें आमच्या सर्व शत्रूंचा नाश करतात.
१ आर्याणि वृत्राणि आर्य शत्रू (ग्रिफिथ)
२ आर्या वृत्राणि आर्ये: कर्मानुष्ठातृभि: कृतानि उपद्रव जानानि (सायण)
एते धामान्यार्या शुक्रा ॠतस्य धारया |
वाजं गोमन्तमक्षरन् ||
(ॠ.९.६३,१४.)
सोमयज्ञ केला म्हणजे आर्ययजमानांच्या घरीं गाईबैल इत्यादि धन पाण्याच्या धारेप्रमाणें वाहूं लागतें.