प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग


प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.

ग्रंथोल्लेखप्राचीनत्व व लोकप्राचीनत्व.- येथें एक गोष्ट अशी मांडली पाहिजे की ज्या लोकांचा उत्तरकालीन वाङमयांत उल्लेख येतो ते लोक उत्तरकालीन होत, हा जो समज आहे तो चुकीचा आहे. नवीन राष्ट्रांनी हिंदुस्थानांतील पूर्व भागांत वसाहत करणें शक्य दिसत नाही. आमच्या मतें जे लोक अधिक पूर्वेकडे दिसतात ते अधिक प्राचीन वसाहत करणारें होत. ॠग्वेदांत उल्लेखिलेलीं राष्ट्रे नंतर आलेली असावीत व आली ती सवाङमय असावीत. त्या सवाङमय आर्यन् लोकांबरोबर आलेल्या लोकांतून निघालेल्या वाङमयोत्पादक ब्राह्मणांचा फैलाव जसजसा अधिकाधिक होत चालला तसतसा पूर्वेकडील व दक्षिणेकडील राष्ट्रांचा वाङमयांत उल्लेख येऊं लागला असावा, म्हणजे ॠग्मंत्रदृष्ट राष्ट्रें प्राचीन राष्ट्रांतील प्राचीन नसून अर्वाचीन आहेत. ज्यांस भाषेनें आर्यन् म्हणतां येईल अशा लोकांचा फैलाव चोहोंकडे झाल्यानंतर ब-याचशा उत्तरकाली ॠग्मंत्र म्हणणारांचे पूर्वज आर्यन् आले असावेत आणि त्यांच्यातील सवाङमयवर्गाचाच प्रसारकम ॠग्वेदांतील व यजुर्वेदांतील स्थानोल्लेख दाखवितात, अशी एक शक्यता आम्ही येथें मांडीत आहों. शेकडों राष्ट्रांनी एकदम येण्याची अशक्यता, त्या अशक्यतेमुळें देश्य कृष्ण आणि आगंतुक गौर यांच्या युध्दाची अशक्यता यांवरच ॠग्मंत्रदृष्ट रांष्ट्रांचें अर्वाचीनत्व अवलंबून नाही. ॠग्मंत्रपूर्व राष्ट्रांचे अस्तित्व श्रौतधर्माच्या इतिहासासारख्या दुस-या अनेक सांस्कृतिक प्रमाणांनी सिद्ध होतें. ज्यास आपण श्रौतधर्म म्हणतों त्याच्या उद्भवापूर्वी बहुतेक हिंदुस्थान व्यापलें गेलें होतें असें दिसतें.

संस्कृतीच्या प्रसाराच्या इतिहासामध्यें ज्या एका महत्वाच्या गोष्टीचा निर्णय केला पाहिजे ती ही की, श्रौत व स्मार्त धर्माचा विकास ज्या काळांत झाला त्या काळानंतर म्हणजे श्रौतस्मार्तधर्म बरोबर घेऊनच आर्यन् लोक चोहोंकडे पसरले की तो विकास होण्यापूर्वीच पसरले. विकास झाल्यानंतर चोहोंकडे पसरले तर चोहोंकडे श्रौतधर्म अगर त्याची उत्तर स्वरुपेंच प्राचीन ग्रंथांतून दिसलीं पाहिजेत ती तशीं दिसत नाहीत. ज्या वेळेस श्रौतस्मार्त धर्म विकसित झाले नव्हते, आणि ज्या वेळेस ब्राह्मण ही जात (किंवा ब-याच आनुवंशिक परंपरेनें चालू रहाणारा वर्ण) तयार झाली नव्हती, परंतु आर्याच्या म्हणजे वेदभाषेशी सादृश्य असणा-या भाषा बोलणा-यांच्या वसाहती मात्र चोहोंकडे झाल्या होत्या असा एखादा काल आपल्या देशांतील निरनिराळया प्रांतांच्या इतिहासांत होता काय? असल्यास तो काल किती विस्तृत होता, त्यावेळची लौकिक परिस्थिति काय होती आणि किती प्रदेशभर श्रौतस्मार्तधर्म व ब्राह्मण यांच्याशिवाय असलेल्या आर्यांचा प्रसार झाला होता? हें आपणांस पहावें लागेल.

असा काल होता असा आम्ही आमचें विधान खंडन होईपर्यत पूर्वपक्ष करितो आणि विधानाच्या साहाय्यार्थ खालील प्रमाणें देतों.

पहिलें प्रमाण.- पंजाब, बंगाल आणि सिंहलद्वीप येथें देश्य ब्राम्हणांचे अस्तित्व नाही. तथापि तेथील भाषा मात्र आर्यन् आहे.

दुसरे प्रमाण.- वेद बरोबर आणणरे आर्य इतर लोक आपणांपेक्षां भिन्न भाषेचे आहेत असा त्यांच्यावर आरोप न करितां ते अस्पष्ट उच्चार करणारे आहेत असा आरोप त्यांजवर करीत; आणि ग्लेच्छ याचा अर्थ अस्पष्ट उच्चार करणारा असाच ते मनांत आणीत.

शूद्रवर्गाच्या समोर वेदाक्षराचा उच्चार करण्याची ज्या दिवसांत मनाई उत्पन्न झाली त्या दिवसांत शूद्रांची भाषा द्राविडी भाषांसारखी फारशी भिन्न नसावी.

तिसरें प्रमाण.- श्रौतस्मार्तधर्माचा विकास संहितीकरणापूर्वी म्हणजे भारतीय युध्दाच्या पूर्वी पूर्णत्वानें झालेला दिसत नाही आणि लोकविस्तार मात्र बराच झालेला दिसतो आणि श्रौतवर्नांच्या विकासाचा क्रम दाखविणारें वाङमय जे मंत्र आणि ब्राह्मणें त्यामध्येंच अनेक लोक चोहोंकडे पसरल्याची स्थिति दृष्टीस पडते. शिवाय भारतीयुध्दामध्यें ज्या ज्या ठिकाणच्या राजांचे अंग दाखविलें आहे ते ते राजे सर्व देशभर पसरले होते असेंहि त्यांत दाखविलें आहे. ज्या राष्ट्रांचा संबंध भारतीयुध्दांत आणला आहे अशांची संख्या साडेतीनशेंपासून चारशेंपर्यंत महाभारतांत आहे. रामायण व महाभारत यांतील व्यक्तींच्या ठायी श्रौतस्मार्तधर्मांच्या पूर्वीच्या किंवा भिन्न परंपरेच्या धर्मांचा आरोप केला आहे. उदाहरणार्थ सीतेस संध्यावंदनार्थ बसविलें आहे. खुद्द यजूंच्या काळाकडे पाहिलें तर स्त्रियांचे यज्ञोपवीत हिसकावून घेऊन इष्टीच्या वेळेपुरता त्यांच्या कमरेला यज्ञोपवीताऐवजीं योक्त्र नांवाचा मोळाचा दोर बांधून इष्टी संपल्याबरोबर तो पुन्हा हिसकावून घेण्यांत आला आहे. आणि श्रौतगृह्यकर्मांत यजमानाच्या यज्ञास सहाय्य करण्याखेरीज कोणताहि धर्माधिकार उर्फ कुलंगडी स्त्रियांच्या गळयांत बांधलेली दिसत नाहीत.

श्रौतधर्मांच्या विकासापूर्वी जर चोहोंकडे आर्यन् राष्ट्रांच्या वसाहती दिसतात तर पश्न असा उपस्थित होतो की श्रौतधर्मपूर्व ॠग्वेदीय मंत्रधर्म असतां प्रसार चोहोंकडे झाला की त्या पूर्वीच झाला. आमचें मत हा प्रसार मंत्रधर्मोद्भवापूर्वी झाला असें आहे. ॠग्वेदांतील क्रियांशीं यजुर्वेदोक्त श्रौतधर्माचें निकट नातें मागल्या विभागांत ॠग्वेदाचें पृथक्करण करुन दाखविलेंच आहे. यजुर्वेदधर्म तयार होण्यापूर्वी म्हणजे ॠग्मंत्रधर्माचा प्रचार असतां जर लोकांचा प्रसार चोंहोकडे झाला असता तर पूर्वकालीन धर्मांचें स्वरुप सर्वत्र दृष्टीस पडतें. पण दिसतें काय तर ब्राह्मणांच्या बाबतीत अध्वर्युप्रधान धर्म आणि इतरांच्या बाबतीत पुराण धर्म. या त-हेची परिस्थिति प्रसारकाळ ॠग्मंत्रपूर्व होता असें दर्शविते.

भाषाशास्त्राचा अभ्यास अधिक झाल्यास वरील विधानास साधक असा पुरावा आणखीहि सांपडणें शक्य आहे असें वाटतें ग्रिअर्सननें भाषांच्या अभ्यासावरुन तीन निरनिराळें मनुष्यांचे प्रवाह आर्यन् भाषांच्याच वसतिक्षेत्रांत दाखविले आहेत. बंगाली, मराठी, सिंधी व पंजाबी या बाह्य परिकरांतील भाषांस हिंदी, राजस्थानी, इत्यादि भाषांनी कोप-यांत ढकललेलें दाखविलें आहे. रा. राजवाडे यांचे असें मत आहे की महाराष्ट्री ही भाषा वैदिक भाषेपासून निर्माण झाली नसून वैदिक व महाराष्ट्री या दोन्ही एकाच इन्डोयूरोपीय भाषेचीं अपत्यें आहेत. या त-हेचें मत अधिक ग्राह्य होऊं लागले आहे. निदान एवढें म्हणतां येईल कीं मंत्रवक्त्या लोकांपूर्वी आर्यन् लोक येथें नव्हते या समजास वरील मत ग्राह्य झाल्यास बराच धक्का पोंचणार आहे.

मंत्रवक्त्या लोकांपूर्वी भिन्न लोक आपल्या देशांत होते हें सिद्ध करण्यास थोडासा पुरावा येथेंच देतां येईल. शक व मग या जाती वेदवक्त्या लोकांपूर्वी आल्या असाव्यात असें दिसते. शक नांवाचें राष्ट्र किंवा जाति ही बरीच उत्तरकालीं हिंदुस्थानांत आली असा व्हिन्सेंट स्मिथनें आधारास घेंतलेल्या ग्रंथकारांचा समज आहे. शकांचें आगमन ज्या उत्तरकालीं झालें असें संशोधक लिहितात त्या कालीं कांही शक हिंदुस्थानांत आले असतील तथापि तें आगमन पहिलेंच नव्हे. इसवी शकापूर्वी सात आठशे वर्षे शकांचे आगमन झालें होते ही गोष्ट गौतम आपणास शाक्य म्हणवितो येवढ्यावरुनच सिद्ध होईल. शाक्य म्हणजे ज्यांचा शक हा अभिजन म्हणजे मूळदेश आहे असे लोक. गौतमबुद्ध आपले अनेक पिढ्यांचे पूर्वज हिंदुस्थानांत होते अशी आपली समजूत व्यक्त करतो. त्यास आपले पूर्वज परक्या देशांतून आले अशी कल्पना देखील असल्याचें दिसत नाहीं (कस्सपसुत्त पहा).

गौतम बुध्दाचा वंश शक होता ही गोष्ट लक्षांत घेतां शकांचें भारतांत प्राचीनत्व सहज दृष्टीस पडतें. शकांच्या बरोबर त्यांचे उपाध्याय 'मग' आले असावेत, 'मग' हे देखील शकस्थानांतून आले ही समजूत भविष्योत्तरपुराणामंध्ये रेखाटलेली दिसते. मगध देशाचें नांव पूर्वी 'कीकट' होतें परंतु पुढें मगध हें पडलें. मगास धारण करणारा देश तो 'मगध' या त-हेची व्युत्पत्ति पतंजलीनें दिली आहे तथापि, मग याचा अर्थ मल अथवा पाप असा लाविला आहे. शकांचे उपाध्ये मग, त्यांचा देश तो मगध अशी व्युत्पत्ति राजवाडे आपल्या लोकशिक्षणांतील 'मगध' लेखांत व्यक्त करितात. 'मगध' हे नांव जितकें जुनें जितकें शकमगांचे अस्तित्व जुनें असें धरलें तर मगांचें अस्तित्व तैत्तिरीय संहितेंत वापरलेला मंत्र ज्या काळांत रचला गेला असेल त्याच्या पूर्वी कित्येक शतकें जाऊन पडतें. तेथे पुरुषमेधांत मागधाचा बली वर्णिला आहे. 'मागध' हें लोकवाचक नांव उत्पन्न व्हावयास 'मगध' देशाचें नांव बरेच अधिक जुनें धरिलें पाहिजे. आणि मगध हें नांव पडण्याच्या अगोदर शेंकडो वर्षे मगांची वस्ती तेथें पाहिजे. कुरुयुद्धकालीन वैशंपायन व याज्ञवल्क्य यांनी जुनाट म्हणून घेतलेला मंत्र ज्या काळांत रचला गेला असेल त्या काळीं 'मग' हे देशांत पूर्णपणे मुरले जाऊन देशास 'मगध' हें नांव पडून त्यावरुन इतर तत्रस्थांस 'मागध' म्हणण्याचा काळ येऊन ठेपला होता. याशिवाय, आणखी एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे ती ही की पुरुषमेध ही संस्था केवळ प्राचीन आणि जवळ जवळ विस्मृत अशी त्याच वेळेस झाली होती आणि, ती देखील इतकी कीं तैत्तिरीयांस किंवा शुक्लास तद्विषयक इतिकर्तव्यता ठाऊक नव्हत्या, यावरुन मगांचे प्राचीनत्व यजु:प्राधान्य काळापूर्वी किती शतकें असावें बरें ? {kosh सूर्यापासना मगांनी ब-याच उत्तर कालीं आणली या त-हेची विधान पाश्चात्यांनी केली आहेत आणि तीच डॉ. भांडारकरानीं गृहीत धरली आहेत. वेदांची ज्यास माहिती आहे आणि, अनेक दैवतांच्या मूळाशी सूर्य आहे हें हजारों वर्षे वेदांचा अर्थ लावणारे आपल्या देशांत कंठरवानें सांगत असतांना ते विधान खोडण्याचा यत्किंचित् प्रयत्न न करितां सूर्यापासनेच्या प्रचाराचें श्रेय उत्तरकालीन कोणातरी आलेल्या लोकांस डॉ. भांण्डारकरांनी कसें दिलें याचें आश्रर्य वाटतें. सूर्यापासना एकतर नवीन आली नसावी किंवा 'मग' हे देशांत इतके अगोदर उत्पन्न झाले असावेत की, वैदिक संस्कृतीच्या घटनेंतच त्यांचा अंश असावा असा निर्णय स्वाभविकपणेंच उत्पन्न होत नाही काय ?}*{/kosh}

ॠग्वेदांत मगांचा उल्लेख एका मंत्रांत आला आहे आणि तो कीकट देशाशीं संबद्ध असाच आला आहे. तेथें या ''मगंदाचे धन आम्हाला दे'' अशी प्रार्थना इंद्रास केली आहे 'मगंद' याचा पुष्कळ द्राविडी प्राणायाम करुन, 'व्याजखोर' असा अर्थ सायणाचार्य करतात आणि, तोच अर्थ गतानुगतिक पद्धतीनें शंकर पांडुरंगांनी घेतला आहे. येथे मगंद याचा अर्थ स्पष्टच आहे. मगास पैसे देणारे म्हणजे त्यांचे अनुयायी ते 'मगंद' ही 'मगध' शब्द कीकट देशास लागण्याची पूर्वपीठिका समजावी.

मगांचें अस्तित्व त्या प्राचीन काळी जर सिद्ध होत आहे, तर प्रश्न उपस्थित होतो तो हा की इंद्रानुयायी लोक कीकटांत अगोदर आले ही मगंद अगोदर आले? सूक्तकार मगंदांचे त्या स्थानी अस्तित्व गृहीत धरतो यावरुन मंत्रसमुच्चयकर्त्यांचें पूर्वज देशांत अगोदर येऊन शक्रमगादि लोक नंतर आले असा सिध्दांत कसा बांधणार?

ज्या ॠग्वेदमंत्रांत भरतांचा केवळ प्रवेश दृष्टीस पडतो त्याच मंत्रांत मगंदाचें पूर्वीच अस्तित्व गृहीत धरलें गेले आहे. त्यावरुन असें दिसते की श्रौतधर्माच्या संस्थापकांचे पूर्वज देशांत येण्यापूर्वीच 'मगंद' येथें येऊन बसले होते.

अत्यंत प्राचीन इतिहास तयार करावयाचा झाला तर तो निरनिराळया राष्ट्रजातीच्या संबंधाचे उल्लेख गोळा करुन तयार केला पाहिजे, आणि त्यांच्या हालचाली नोंदल्या पाहिजेत. दाशराज्ञयुध्दाचें वर्णन करितांना या गोष्टीकडे लक्ष दिलें जाईल. प्रस्तुतचें विवेचन एवढेच दाखवील कीं आर्य लोक तेच आर्यन् हें म्हणणें बरोबर नाही. आर्यन् महावंशाचा प्रथम प्रवेश ॠग्वेदांत वर्णिला आहे, आणि त्यांनी काळया लोकांना जिंकले हें म्हणण्यास आधार नाहीं.