प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
भागवतशोधित इतिहासाचें पोर्वापर्य :- देवविषयक असुरविषयक कथा ऐतिहासिक असल्यास त्या गोष्टी दाशराज्ञ युध्दापूर्वी घडल्या असाव्यात.
इंद्राचीं युध्दे आम्ही सध्यां इतिहासाचा विषय धरीत नाही. ज्या ज्या युध्दांत दुसरे कोणी देव गुंतले असतील आणि माणसें अस्पष्ट असतील तोहि आम्ही इतिहासविषय धरीत नाही.
दाशराज्ञ युद्ध असें आहे की त्यांतील मानवी क्रिया अस्पष्ट नाहीत. जे मानव लढत त्यांना लढतांना जरी देवांनी मदत केल्याचा उल्लेख असेल तरी तेवढ्या उल्लेखानें त्या क्रियेचे ऐतिहासिकत्व नष्ट होतें असें नाहीं. इंद्राच्या लढाया व देवांनी ज्यांत भाग घेतला आहे अशा सरमासूक्तांत दृष्ट होणा-या लढाया यांचेहि आम्ही ऐतिहासिकत्व अस्पष्ट समजतों. दाशराज्ञ युद्ध मात्र पूर्ण ऐतिहासिक विषय धरतों.
दाशराज्ञ युद्ध हा मंत्रकालांतील जर अत्यंत अर्वाचीन विषय असेल, तर दाशराज्ञ युध्दापूर्वी बरीच वर्षे मांत्र संस्कृतीच्या लोकांचें आगमन झालें असें होईल. पण वस्तुत: तशी गोष्ट नाहीं. मंत्रवाङमयांच्या अगोदर दाशराज्ञ युद्ध झालें असलें पाहिजे असें आम्ही समजतों.
मंत्रदृष्ट कालाचे आम्ही भाग येणें प्रमाणें पाडतो.
पहिला विभाग- ज्या काळांत मंत्रांत उल्लेखिलेल्या इंद्रवृत्रादि
पौराणिक कथा तयार झाल्या असतील तो काल.
दुसरा विभाग- ज्याकालांत अर्ध्यामर्ध्या ऐतिहासिक व
मंत्रपूर्व युग अर्ध्यामुर्ध्या पौराणिक उदाहरणार्थ पुरुरवस् उर्वशी यांच्या
कथा उत्पन्न झाल्या असतील असा काळ
तिसरा विभाग- दाशराज्ञ युध्दाचा काल.
या तीन युगविभागांपैकी पहिला विभाग मूलगृहकालीन होता असें शक्य आहे. लोकमान्यांचा 'उत्तर ध्रुव प्रदेशी आर्यन् लोकांचे मूलस्थान' हा ग्रंथ मंत्रपूर्वयुगाच्या पहिल्या विभागाविषयी विवेचन करतो.
आर्यदासविरोध कल्पना ही याच युगांतील होय.
हे तीन काल मांत्र लोकांच्या पूर्वजांचे होते. मांत्र लोकांचें देशांत आगमन झालें त्याचा, मंत्रवाङमयाचा आणि दाशराज्ञ युध्दाचा परस्परसंबंध लक्षांत घेतला पाहिजे. पुढें आम्ही असें दाखवितो कीं, दाशराज्ञ युद्ध हें मंत्ररचनापूर्व आहे. तसेच ॠग्मंत्र कोणत्याहि त-हेनें देशांत आर्य म्हणवून घेणा-या लोकांचे आगमन दाखवीत नाहीत, एवढेच नव्हे तर मानवी राजकीय घडामोडी दाखविण्यांत आर्य शब्दाचे उल्लेख मुळीच उपयोगी नाहीत हे आम्हीं मागें दाखविलेंच आहे. आर्यन् नांवाच्या लोकांचे, किंवा ज्यांस आर्यन् म्हणतां येईल अशा लोकांचे आगमन ॠग्मंत्र दाखवितात असें आम्ही मुळीच कबूल करीत नाहीं आणि हें मत प्रतिपादन करणा-या विद्वद्वर्गास तें तुम्ही सिद्ध करा असें आव्हान करतों.
भरत नांवाच्या एका टोळीचें किंवा दिवोदास सुदास यांच्या अनुचरांचे मात्र आगमन आम्ही मानतों.
आर्यन् लोकांची हिंदुस्थानांत पहिली वसाहत ज्याकाळी झाली त्या काळाचे लेख आपणापाशी नाहीत तर आर्यन् वसाहतीचा हजारों वर्षाचा एकच काल धरला तर त्या दीर्घ कालाच्या अंतिम भागांत दाशराज्ञयुध्दानें व्यक्त होणारी भरतांची हिंदुस्तानांत स्वारी झालेली असावी. भरतांच्या स्वारीचा काल तोच मंत्रकाल होय एवढेंच नव्हे तर त्या स्वारीच्या नंतर कांही ब-याच वर्षांनी आजपर्यंत टिकलेले मंत्र तयार झाले. भरतांनी ज्या वेळेस स्वारी केली तेव्हां देश चांगला वसलेला होता. अर्थात आर्यन् राष्ट्रांच्या वसाहतीचा इतिहास हा वेदपूर्वकालीन आहे. मंत्रकालापूर्वी १००० वर्षे तरी देशांत एक विशिष्ट संस्कृति स्थिर झाली असावी. वेद म्हणजे आर्यन् महावंशानें हिंदुस्थान बसविला त्या काळांचे वाङमय मुळीच नाही.
आम्ही येथें जें मत व्यक्त करीत आहोत तें आज संशोधक वर्गात रुढ नाहीं. इतिहासविषयक प्रचलित कल्पना आमच्या मतांपासून भिन्न आहेत.
प्रचलित कल्पनांचें खंडण अनेक ठिकाणीं करणें प्राप्त होतें व तें केलेंहि आहे. उदाहरणार्थ, आर्यन् महावंशाचा इतिहास म्हणजे वेदांत आर्य या शब्दानें बोधिल्या जाणा-या वर्गाचा इतिहास नव्हे, ही गोष्ट मागें दाखविली आहेच. तसेंच आर्यन् राष्ट्राच्या भारतांतील इतिहासास वेदांतर्गत इतिहासापासून प्रारंभ झाला अशी जी प्रचलित समजूत आहे ती चुकीची आहे असेंहि दाखविण्यांत आलें आहे. आर्यन् राष्ट्रांचे देशांत आगमन वेद दर्शवितात अशी प्रचलित समजूत आहे. त्या समजुतीचें अयथार्थत्वहि पुढें वर्णिलें जाईल.