प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
 
नव्याचें जुन्यावर आवरण घालण्याची पद्धति.- मांत्र संस्कृतीचा देश्य आर्यन् संस्कृतीशी जेव्हां प्रसंग आला त्या वेळी अनेक क्रिया झालेल्या दिसतात.

मंत्रसंस्कृतीतील यज्ञसंस्था जेव्हा कमी कमी होऊं लागली तेव्हां सार्वजनिक वर्गण्यांवर किंवा राजाश्रयावर मोठाले यज्ञ करणारा वर्ग तयार झाला आणि त्यामुळें त्रयी हें वाङमय तयार झालें आणि ॠत्विजांमध्यें विशिष्टीकरण होऊन अनेक वेदांचे ब्राह्मण ग्रंथ तयार झाले. हे बरेच पांडित्ययुक्त होते असें दिसतें. अगोदरच्या आर्यन् राष्ट्रांमधील क्रिया नाहीशा झाल्या तशी यांची स्थिति झाली नाही. यांनी लोकांतील क्रिया नाहीशा होत आहेत असें पाहून आपल्या क्रिया पुष्कळ वाढविल्या. नवीन आलेले लोक क्रिया सोडीत होते आणि स्थानिक राष्ट्रांच्या क्रिया सुटल्याच होत्या. स्थानिक राष्ट्रांनां यज्ञसंस्थेत सामील व्हावयाचें म्हणजे केवळ प्रेक्षकांचे काम करावयाचें. तथापि त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी ॠत्विजांनीं आणखी एक क्रिया केली. स्थानिक लोकांचा इतिहास क्रियांच्या प्रसंगांशीं घुसडून दिला. पुष्कळ जुन्या यज्ञांचे उल्लेख म्हणून जे ब्राह्मण ग्रंथांत दिले आहेत ते पूर्वेकडील राजे लोकांच्या पूर्वजांसंबंधी आहेत. उदाहरणार्थ हरिश्चंद्राचा संबंध शुन:शेपाच्या आख्यानाशी जोडून दिला.

कांही तरी यज्ञक्रिया आपले पूर्वज करीत होते ही भावना देश्य आर्यन् राष्ट्रांस असावीच आणि अथर्व्यांचे देश्य वंशज क्रियाहीन झाले ही गोष्टहि त्यांस अवगत असावी आणि त्यामुळे आपल्याच वाडवडिलांचा धर्म सांगणारे हे अध्वर्युप्रधान ॠत्विज होत अशी जाणीवहि देश्य आर्यन् लोकांत उत्पन्न करुनं देण्यास मंत्रसंस्कृतीच्या ब्राह्मणांस अडचण पडली नसावी असें दिसतें.

धर्म या शब्दाचा अर्थ ॠग्वेदांत भिन्न आहे आणि महाभारतांत भिन्न आहे. धर्म याचा ॠग्वेदांत अर्थ क्रिया अगर कर्म असा आहे, तर महाभारतांत संरक्षणविषयक ज्ञान असा आहे. अशा अर्थभिन्नतेचें कारण एक तर मंत्रकालीनच अर्थभिन्नता असावी अगर मांत्रसंस्कृतीच्या अगोदरच्या संस्कृतीत धर्म शब्दाचा अर्थ भिन्न असावा.

सूतवाङमय ब्राह्मणांनीं यज्ञसंस्थेचे महत्व कमी होऊन इतिहासपुराणें यांचे महत्व स्थापन झाल्यानंतर हाती घेतलें असावें. ब्राह्मणांच्या  हातांत तें आलें तेव्हां त्यावर परिणाम हा झाला कीं ॠषींची महती या वाङ्मयांत शिरली.

पुराणोक्त दैवतें वैदिक दैवतांचें उत्तरकालीन पर्यवसान खास नाहीत. शिव आणि विष्णु यांस जें अग्रस्थान दिसतें, तें दुसरी एखादी उपसंस्कृति अगर राष्ट्र प्रधान झालें असें दर्शवितें. वैदिक वाङ्मयाचें पौराणिक वाङमय जर पर्यवसान असतें तर इंद्र पौराणिक वाङमयांत खालच्या प्रतीचा एक देव म्हणून शिल्लक न रहातां त्याचें विष्णुस्वरुपांत अगर शिवस्वरुपांत पर्यवसान होतें. तसें झालें मात्र नाहीं. यजु:कालीन प्रजापतीस देखील हलक्या प्रकारचें स्थान मिळाले. यज्ञसंस्थेचें आवरण ज्याप्रमाणें स्थानिक धर्मावर टाकलें गेले त्याप्रमाणे स्थानिक धर्म, इतिहास व पुराणें ही यज्ञसंस्थेत शिरलीं हे दाखविणारे उतारे अनेक आहेत. त्यांतील कांही येथें देतों.

अश्वमेध यज्ञांत होत्यानें यजमानास दहा दिवस प्रत्यहीं निरनिराळें आख्यान सांगावयाचें असतें. आणि ते दहा दिवस झाले म्हणजे तेंच पूर्वीचें प्रतिदिवशीं सांगितलेलें आख्यान पूर्ववत् पुन्हां दहा दिवस सांगावयाचें याप्रमाणें वर्षभर कार्यकम चालू ठेवावयाचा. याला 'पारिप्लवाख्यान' असें नांव आहे.

(१)    प्रथम दिवशीं मनुवैवस्वत राजा व मनुष्य ही त्याची प्रजा, ती ही मानुषप्रजा येथें आहे, असें म्हणून होत्यानें मनुष्यांच्याकडे बोट दाखवावयाचें. या दिवशी ॠग्वेद हा वेद आहे तो हा, असें म्हणून ॠग्वेदांतील एक सूक्त पठण करावें.

(२)    दुस-या दिवशी यम वैवस्वत हा राजा व पितर ही त्याची प्रजा. ते हे पितर येथें आहेत, असें म्हणून वृद्धांचा निर्देश करावयाचा. आजचा वेद यजुर्वेद असून तो हा, असें म्हणून यजुवेंदांतील अनुवाक पठण करणें.

(३)    तिस-या दिवशी वरुण आदित्य हा राजा व गंधर्व ही त्याची प्रजा. ती ही प्रजा येथें आहे, असें म्हणून तरुणांच्याकडे बोट दाखविणें. आजचा वेद आथर्वण आहे व तो हा असें म्हणून अथर्व वेदांतील ओषधिप्रतिपादक मंत्र पठण करावा.

(४)    चवथ्या दिवशी सोमवैष्णव राजा व अप्सरस् ही त्याची प्रजा, व ती येथें आहे म्हणून सुंदर स्त्रियांचा निर्देश करणें. आजचा वेद आंगिरस वेद आहे व तो हा, असें म्हणून अभिचार प्रतिपादक मंत्र पठण करावे.

(५)    पांचव्या दिवशी अर्बुदकाद्रवेय राजा व सर्प ही त्याची प्रजा; आणि ती ही येथें आहे, म्हणून सर्पविद्या जाणणा-यांचा निर्देश करणें, आजचा विषविद्या वेद आहे, असें म्हणून विषविद्येतील मंत्र पठण करावे.

(६)    सहाव्या दिवशीं कुबेर वैश्रवण राजा व राक्षस ही त्याची प्रजा; आणि ती ही येथें आहे म्हणून पापाचरण करणा-यांचा निर्देश करावा. आजचा पिशाचवेद आहे व तो हा, असें म्हणून पिशाचसंबंधी मंत्र पठण करावे.

(७)    सातव्या दिवशीं असुरधान्वन् राजा व असुर ही त्याची प्रजा, आणि ती ही येथें आहे म्हणून वार्धुषिक अथवा व्याजखोर लोकांचा निर्देश करावा. आजचा असुरविद्या वेद व तो हा असें म्हणून असुरमाया प्रकार करुन दाखविणें.

(८)    आठव्या दिवशी मत्स्य सांमद राजा व जलचर त्याची प्रजा व ती ही आहे, असें म्हणून कोळयांचा (जातीचा) निर्देश करावा, आजचा पुराणविद्या हा वेद व तो हा, असें म्हणून पुराण पठण करावें.

(९)    नवव्या दिवशीं तार्क्ष्य वैपश्चित् राजा व पक्षी ही त्याची प्रंजा, आणि ती ही येथें आहे म्हणून पक्षी आणि नैष्टिक ब्रह्मचारी यांचा निर्देश करावा. आजचा वेद इतिहास व तो हा, असें म्हणून इतिहासपठण करावें.

(१०) दहाव्या दिवशी धर्म इंद्र राजा व देव ही त्याची प्रजा आणि ती येथें आहे म्हणून प्रतिग्रह न करणा-या विद्वान् व तरुण ब्राह्मणांचा   निर्देश करावा. आजचा सामवेद व तो हा असें म्हणून सामगायन करावें.

वरीलप्रमाणेंच आणखी शांखायन श्रौतसूत्र अध्याय १६ खंड २ व शतपथ ब्राह्मण १३.३.१,१ येथें हि उल्लेख आढळतो.

मैत्रायणीय संहितेत उत्तरकालीन महादेव, गणपति इत्यादि देवतांचा उल्लेख पुढें दिलेल्याप्रमाणें आढळतों.

(१) देवानांच ॠषीणांचासुराणांच पूर्वजं |
   महादेव्ँ सहस्त्राक्ष्ँ शिवमावाह्याम्यहं ||
(२) तत्पुरुषाय विद्महे महादेवायधीमहि |
   तन्नो रुद्र:प्रचोदयात्
(३) तत् गांगौच्याय विद्महे गिरिसुतायधीमहि |
   तन्नो गौरी प्रचोदयात |
(४) तत् कुमाराय विद्महे कार्तिकेयाय धीमहि |
   तन्न: स्कंद: प्रचोदयात् |
(५) तत् कराटाय विद्महे हस्तिमुखाय धीमहि |
   तन्नो दंतीरप्रचोदयात |
(६) तत् चतुर्मुखाय विद्महे पद्मासनाय धीमहि |
   तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् |
(७) तत् केशवाय विद्महे नारायणाय धीमहि |
   तन्नो विष्णु: प्रचोदयात् |
(८) तत् भास्कराय विद्महे प्रभाकराय धीमहि |
    तन्नो भानु: प्रचोदयात् |
(९) तत् सोमराजाय विद्महे महाराजाय धीमहि |
    तन्नश्वंद्र: प्रचोदयात् |
(१०) तत् ज्वलनाय विद्महे वैश्वानराय धीमहि |
   तन्नो वन्हि: प्रचोदयात् |
(११) तत्यजपाप विद्महे महाजपाय धीमहि |
     तन्नो ध्यान: प्रचोदयात् |
(१२) तत् परमात्माय विद्महे बैनतेयाय धीमहि |
      तन्न: सृष्टी: प्रचोदयात् |
                                  (मै. सं. २.९,१.)

अशाच प्रकारचे आणखी उल्लेख तैत्तिरीय आरण्यक प्रपाठक १० अनुबाक १ व परिशिष्ट अनुवाक १ मध्यें आहेत.

मागें झालेल्या विवेचनाचें आतां सिंहावलोकन करुं.

आर्यन् आणि आर्य या कल्पना भिन्न आहेत. आर्य हा शब्द वंशवाचक नाही. हा दोन अर्थांनीं वापरला आहे; एक अर्थ सद्वर्ग आणि दुसरा अर्थ यजनशील.

'दस्यु' ही शिवी जुनी आहे. कां की, अवेस्तांत ती रुपांतरानें सांपडते. कांही दस्यु चपट्या नाकाचे असतील {kosh अनास याचा अर्थ चपटया नाकाचा असा न करतां अनुनासिकयुक्त उच्चार न करणारा असाहि संभवतो. हिंदुस्थानांत ब-याच शब्दांचा उच्चार कांही जाती सानुनासिक करतात, तर कांही निरनुनासिक करतात. या दृष्टीनें भारतीय भाषाशास्त्राचें व मानववंशशास्त्राचें संकलित अध्ययन व्हावयास पाहिजे.}*{/kosh} पण चपट्या नाकाच्या लोकांस दस्यू म्हणत असत असें मात्र नाही. 'चपटया नाकाचा' हें वर्णन द्राविडांनां तर लागू पडतच नाहीं. कारण द्राविडांमध्यें चपटया नाकाचे लोक कमी. ते बंगालकडे म्हणजे मंगोलियन वंशांतले असणार. तेव्हा, ज्या काळया द्राविडी लोकांनां गो-या आर्यन् लोकांनी जिंकलें त्यांस ते प्रथम दस्यू व मग पुढें दास म्हणत ही कल्पना निराधार आहे.

आर्य आणि दास असें शत्रुसमुदायांचें वर्णन स्तोता पुष्कळदां करतांना आढळतो, म्हणजे दोन लढणा-या पक्षांपैकी एक आपल्या विरुद्ध असलेल्या पक्षांत स्वतंत्र आणि त्यांचे अंकित असलेले असे दोन प्रकारचे लोक आहेत ही जाणीव दाखवितो.

आर्यन् लोकांची व्याप्ति फार व चोहोंकडे होती. ती होतांना एका मोठया आर्यन् सम्राटानें येऊन सर्व हिंदुस्थान काबीज केला, आणि जमीन जिंकून ती आर्यन् लोकांस दिली आणि त्या लोकांची शिस्तवार वसाहत चोहोंकडे करविली अशी धाडशी व खोटी कल्पना केल्याखेरीज एका बाजूनें आर्यन् आणि दुस-या बाजूनें देशांतील काळे लोक लढत होते आणि देश्यांस गो-यांनीं जिंकले असे इतिहासाचें स्पष्टीकरण ग्राह्य होणार नाही जर क्रमाक्रमानें आर्यन् लोकांची आगमनें होत असतील तर नवीन येणारांची प्रथम जुन्या आर्यन् लोकांशीच गांठ पडणार. या त-हेनेंच क्रिया झाली असून त्या क्रियेचा एक उत्तरकालीन अंश वेदोल्लिखित दाशराज्ञ युद्ध होय. आणि बहुतेक मंत्ररचना त्यानंतरची होय.