प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
दासविषयक ऐतिहासिक सत्य.- दासविषयक ऐतिहासिक सत्य काढावयाचें म्हणजें वेदपूर्वकालीन दास व दस्यु शब्दांची व त्या शब्दांनी ज्ञेय होणा-या कल्पनांची स्थिति अवगमिली पाहिजे. तशीच या शब्दांची उत्तरकालीन स्थिति लक्षांत घेतली पाहिजे. वैदिक साहित्य पूर्वकालीन आणि उत्तरकालीन स्थितीशी तुलिलें पाहिजे.
उत्तरकालीन स्थिति थोडक्यांत वर्णितां येते. पूर्वकालीन स्थिति शोधण्यासाठीं तौलनिक पद्धतीत शिरावें लागतें.
दास हा शब्द उत्तरकालीन वाङमयांत शत्रुवाचक नाहीं. दस्यु हा शब्द तर लुप्तच झाला आहे.
अवेस्तामध्यें दास शब्दांशी सद्दश शब्द पहावयाचे म्हणजे अवेस्ताभाषेंत सचा ह होतो हें लक्षांत घेतलें पाहिजे.
तेथें दास शब्दाशी सद्दश शब्द येणेप्रमाणें आहेत :-
(१) दह्, क्रियापद याचे अर्थ नाश करणें किंवा दंश करणें असे आहेत.
(२) दहक, म्हणजे दंश करणार.
(३) दहके म्हणजे (वाईटाचा) नाश करणारा.
(४) दहाक-दंश करणारा साप. याशिवाय पार्शी लोकांच्या पौराणिक परंपरेतं अहि दहकाची गोष्ट आली आहे ती अशी: अहिदहक हा एक अनार्य शत्रु होता. त्यानें जमशीद राजाचें सिंहासन बळकावलें व आपल्या संपत्तीच्या मदानें तो आपणांस देव मानूं लागला. त्याचें स्वरुपवर्णन तीन तोडांचा, तीन डोक्यांचा, सहा डोळयांचा, असत्यभाषी मायावी बलाढय राक्षस असें आहे. त्यास द्रुज म्हटलें आहे. शहानाम्यांत त्याचें वर्णन त्याच्या खांद्यांचे शैतानानें (अहरिमन्) चुंबन घेऊन तेथें दोन सर्प उत्पन्न केले असें आहे.
या गोष्टीवरुन आपणास ज्या कांही गोष्टी स्पष्ट होतात त्या येणें प्रमाणें:
(१) दासाचें अस्तित्व पर्शुभारतीय काली देखील असले पाहिजे, त्याशिवाय दोन्ही राष्ट्रांच्या प्राचीन कथांत थोडया फरकानें दासकल्पना नसती.
(२) दास हा सर्पस्वरुपी आहे ही कथा फार प्राचीन असावी. हिब्रूंच्या ग्रंथांत देखील शैतान सर्पस्वरुपी आहे त्या अर्थीहि ही कल्पना हिब्रूंच्या प्राचीन इतिहासकल्पना ज्या काळांत तयार झाल्या त्याच्याहि पूर्वीची असावी.
(३) हा दास तीन डोक्यांचा, सहा डोळयांचा मायावी आहे हें वर्णन वैदिक वाङमयांत तसेच अवेस्त्यांत सामान्य आहे. वैदिक वाङ्मयांत हा उल्लेख दासांसंबंधी एकदांच आला आहे. त्या अर्थी वैदिक ग्रंथ तयार होत गेले त्यावेळेस ही कल्पना मरत चाललेली असावी. पण या कल्पनेचें अस्तित्व इराणांत अधिक काळपर्यंत जिवंत राहिलें.
(४) दंश करणें आणि दाह करणें याच्या मुळांशी एकच क्रियापद पर्शुभारतीय काळांत असावें.
दास शब्दाच्या इतिहासाविषयीं पूर्वगत पुराव्यावरुन जे आपणांस निर्णय काढतां येतात ते येणे प्रमाणें:- आर्य आणि दास हे परस्परांचे विरोधी आहेत ही कल्पना वेदांत तशीच अवेस्त्यांतहि असल्यामुळें यांचा संग्राम झाल्याचें वर्णन ॠग्वेदांत आहे व हा संग्राम भारतभूमीवर झाला ही कल्पना ग्राह्य होत नाही, तर वाईट आचरण करणारे दुष्ट शत्रु ते दास, चांगलें आचरण करणारे ते आर्य ही कल्पना घेऊनच मंत्रवक्ते हिंदुस्थानांत आले. आर्य व दास यांच्या युध्दाचे जे उतारे आहेत त्यांपैकी बरेचसे उतारे इंद्राच्या पराक्रमाच्या वर्णनपर असल्यामुळें त्या उता-यांचें स्पष्टीकरण करण्यासाठी भारतीय इतिहासाकडे धांव न घेता लो .टिळकांनी ज्याप्रमाणें मूलगृहकालाकडे धांव घेतली तिकडे घेतली पाहिजे.
आर्य आणि दास यांचा विरोध म्हणजे काळयांचे गो-यांनीं केलेलें हनन असा अर्थ सर्वत्र लावतां येणार नाही हे लो . टिळकांनी 'आर्टिक होम इन दि वेदाज' या ग्रंथांत दाखविलेंच आहे. आर्य आणि दस्यु यांचा विरोध यजनविषयक आहे. जे यजन करतात ते आर्य आणि जे यजन करीत नाहीत ते दस्यु, अशी कल्पना ॠग्वेदांत सर्वत्र आढळते. तथापि दास म्हणजे शत्रु असा अर्थ दासाविषयीं मात्र आढळतो. भारतीय मंत्रवक्त्यांत दास व दस्यु यांमध्ये कांही कल्पना सामान्य आहेत आणि कांही भिन्न आहेत यांचे कारण मंत्रवक्त्यांच्या पूर्वजांच्या काळांत पाहिलें पाहिजे. इराणी लोकांत दस्यु हा शब्द फार स्पष्ट रीतीनें आला नाही, किंवा आर्य आणि दस्यु यांचा विरोधहि दाखविला नाहीं. दस्यु किंवा दह्यु असे शब्द आले आहेत. पण ते भिन्नदेशीय अशा अर्थानें आले आहेत.
ज्या आर्यांचा दासांशी विरोध झाला ते लोक देशांत येत होते हें वरील उता-यांत आलेल्या उल्लेखांवरुन मुळीच सिद्ध होत नाही. ते पंजांबात होते एवढेंच दिसतें.
मंत्रवक्ते लोक देशांत होते त्या वेळेस त्यांस लोक विरोध करीत, तेव्हां त्यांनी जर त्यांस दास म्हटलें तर तेथें तो शब्द शत्रुवाचकच होईल. परंतु जेव्हां कोणी आर्य आणि दास यांचा दोघांचाहि शत्रूंमध्यें उल्लेख करितो तेव्हां दास हा शब्द केवळ शत्रुवाचक आहे असें होत नाही. शत्रूंतील दोन वर्गामध्यें कांही तरी फरक वक्ता करीत आहे असें स्पष्ट होतें. हा फरक आचार वाचक आहे की, वर्गवाचक आहे की, वंशवाचक आहे हें उपलब्ध पुराव्यावरुन स्पष्ट होत नाही. असें शक्य आहे की, निराळया राष्ट्राचे लोक ज्याअर्थी निराळया आचारांचे असतात त्याअर्थी दास हे निराळया राष्ट्रांचे व निराळया आचारांनी युक्त असे असतील. दास काळे आहेत असा उल्लेख एकच आहे. पण तो उल्लेख इंद्राच्या शौर्यासंबंधानें असल्यामुळें म्हणजे काळोखाच्या नाशाविषयीच्या उल्लेखाचा असल्यामुळें काळी जात व पांढरी जात यांच्या लढाईचा इतिहास त्यांतून निघत नाही. जेथें दास आर्य होण्याची शक्यता आहे (६.२२,१०) तेथें वंशविषयक अर्थ दास शब्दांतून काढण्यापेक्षां यजनविषयक काढणें अधिक योग्य होईल.
थोडक्यात सांगावयाचें म्हटल्यास दास, आर्य, दस्युवर्ण इत्यादि विषयीं उल्लेख आर्यन् राष्ट्रांनी नान आर्यन् लोकांपासून हिंदुस्थान जिंकलें अशा इतिहासाचे सूचक मुळीच नाहीत.